बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Saturday, 18 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड लेख 13 - उच्चाराची व्याप्ती आणि शब्द निर्मितीची मराठी संकल्पना



युनिकोड ते साऊंडकोड – 13
उच्चाराची व्याप्ती आणि शब्द निर्मितीची मराठी संकल्पना
आजवर मराठीत संस्कृत-प्रचूर पाणिनींच्या व्याकरणाचाच केवळ शिरकाव झाल्याने अचूकपणे मराठी-उच्चार-शास्त्र मांडले गेले नाही. संस्कृतने वर्ण स्विकारले आणि त्यांच्या उच्चाराचा संबंध केवळ ‘कंठ, तालू, मूर्धा, दात, ओठ’ अशा अवयवांच्या संबंधावर निर्भर ठेऊन स्वर आणि व्यंजन या दोघांचाही भाषेतील वावर एकाच पद्धतीतून सांगितला. खरे पाहता मानवाच्या उच्चारात हे असे घडत नाही.
स्वराचा संबंध केवळ मुखाच्या गाभार्‍यातील जिभेच्या ‘मागे-पुढे’ व ‘वर-खाली’ अशा विवक्षीत स्थितीशीच संबंधीत राहतो. संस्कृतला हे व्याकरणातून मांडता आले नाही. संस्कृतच्या वर्ण उच्चारांबाबतचे स्विकृत धोरण आणि मराठीच्या व्यंजन-स्वर उच्चाराबाबतचे स्विकृत धोरण यात बराच फरक आहे. संस्कृतच्या ‘वर्ण’ या संकल्पनेचे मराठीला निश्चित असे ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ असे दोन विभाग मांडता व भाषेतून वापरता आले आहेत. दोन्ही भाषांच्या अस्तित्वात पडणारा मूलभूत फरक याच्याशी निगडीत आहे. आजवरच्या मराठी-पुस्तकी-व्याकरणाने हा विचार केला नाही, व्याकरणकारांना कळला नाही आणि म्हणून मराठीत मांडला गेला नाही.
संस्कृतच्या पाणिनींनी मांडलेले धोरण, मराठी व्याकरणात नक्कल करून जसेच्या तसे आणले गेले –

संस्कृत भाषेच्या प्रत्येक व्याकरणीय पुस्तकाने मांडलेले आणि आजच्या चुकीच्या मराठी-पुस्तकी-व्याकरणाने तंतोतंत नक्कल करून तसेच स्विकारलेले धोरण पुढील तक्त्यात पहा.
स्वर
व्यंजने
स्थान
वर्णाचे नाव
अ - आ
क-वर्ग, ह्
कंठ
कंठ्य
इ - ई
च-वर्ग, य्, श्
तालु
तालव्य
ऋ, ॠ
ट-वर्ग, र्, ष्, ळ्
मूर्धन्
मूर्धन्य
लृ
त-वर्ग, ल्, स्
दन्त
दन्त्य
उ - ऊ
प-वर्ग
ओष्ठ
ओष्ठ्य
ए - ऐ
-
कंठ+तालु
कंठतालव्य
ओ - औ
दंत+ओष्ठ
दंतौष्ठ्य
केवळ मराठी >>>
च्, छ्, ज्, झ्, ञ्
वर्त्स
दंततालू
तक्त्यातील चुका शुल्लक नसून मराठी भाषेत अनाठाई, अवास्तव, अनावश्यक आणि अमुलाग्र बदल करणार्‍या ठरतात. लाल रंगात त्यातील केवळ मराठी ठरणारा खास भाग दाखवल आहे. निळ्या रंगात मराठी न ठरणारा भाग दाखवला आहे. त्यामुळे आजच्या शिक्षण क्षेत्रात शिकवले जाणारे पुस्तकी-व्याकरण मराठीचे ठरत नाही. हे साध्यासोप्या शब्दातून येथे सांगत आहे. मराठीलाच बदलण्याचा झालेल्या या व्याकरणीय प्रयत्नामुळे त्यानंतर सादर झालेली ‘शुद्धलेखन नियमावली’ मराठीची ठरत नाही. याच कारणामुळे ती केवळ अठरा नियमांची असूनही सहजपणे, आपसूकपणे, मराठीच्या मानसिकतेतून, पाळता न येणारी ठरते. मराठीच्या अधोगतीचे, पिछेहाटीचे, र्‍हासाचे हे महत्त्वाचे कारण आहे. ते सहजतेने दूर करणे शक्य आहे.

मराठीचे भाषीक धोरण – ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ या दोन मूलभूत भिन्न संकल्पना आहेत. ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ या दोघांतून ‘अक्षर’ बनते. ‘अक्षर’ बनताना वापरलेल्या हवेचा प्रवाहात केलेल्या बदलातून ‘अनुस्वार, विसर्ग, . . .’ वगैरे साकारतात. यातून बनते मराठीच्या शब्दांची व्याप्ती, अगदी साधीसुधी आणि कळण्यास सरळसोपी. ध्वनीच्या उच्चारातून वाक्यापर्यत पोचण्याची मराठीची पद्धत शास्त्रीय व नैसर्गिक आहे.
मराठी भाषा विज्ञानाची शब्द निर्मितीची संकल्पना
व्यंजन व स्वर
अक्षर
शब्द
वाक्य
संस्कृतचे भाषीक धोरण - ‘वर्ण’ या एकाच संकल्पनेत व्यंजन, स्वर, अनुस्वार, विसर्ग अशा सगळ्यांचा शिरकाव होतो. संस्कृतसाठी ‘वर्ण’ हा भाग ‘धातु’ या संकल्पनेच्या अंतरंगाचे केलेले पृथक्करण ठरते. ‘धातु’ या संकल्पनेला अर्थ प्रदान केलेला असतो. ‘धातु’ म्हणजे ध्वनीचा उच्चार एकक नव्हे, व्यंजन नव्हे, स्वर नव्हे, अक्षर नव्हे वा शब्द ही नव्हे.  
संस्कृतचा धातु – त्यातून बनलेले संस्कृतचे पद (शब्द) – त्या शब्दाचा मराठी अर्थ पुढे देत आहे.
निव्वळ स्वर धातु असु शकतो (नी – नयति – नेणे),
व्यंजनाने शेवट होणारे अक्षर धातु असु शकतो (अद् – अत्ति – खाणे),
स्वराने शेवट होणारे अक्षर धातु असु शकतो (पा – पिबति – पिणे),
स्वराने शेवट होणारे जोडाक्षर धातु असु शकतो (प्री – प्रीणयति – खूष करणे),
दोन व्यंजने असलेला उच्चार धातु असु शकतो (भिद् – भिनत्ति – फुटणे),
तीन व्यंजने असलेला उच्चार धातु असु शकतो (क्रुश् – क्रोशति – ओरडणे),
चार व्यंजने असलेला उच्चार धातु असु शकतो (प्रच्छ् – पृच्छति – विचारणे),
थोडक्यात सांगायचे तर, ‘धातु म्हणजे उच्चारीत ध्वनींचे आदीकारण मुल-रुप’ होय (Dhatus are verbal roots). धातु कसे असावेत? याबाबत त्यांची विशिष्ठ ‘ठेवण, बैठक, धाटणी’ ठरलेली वा निश्चितपणे मांडता येईल अशी नाही, येथपर्यंत आपण येऊन पोचतो. जगाची जडणघडण जशी अणुरेणूंतून बनते तशी संस्कृत नावाच्या भाषा-जगताची रचना पाणिनींनी 2115 ‘धातुं’तून बनवली. यातून एक महत्त्वाची गोष्ट संस्कृतसाठी बनवली गेली ती म्हणजे ‘संस्कृतच्या शब्दांना बदलण्याची वा नवीन शब्द भाषेत आणण्याची अनुमतीच नाकारली गेली’. त्यामुळे संस्कृत जरी बंदिस्त भाषा ठरत असली तरी साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारतात निर्माण झालेल्या वेद-उपनिषदे अशा सर्व गोष्टी कायम स्वरूपातून टिकण्याची संधी प्राप्त झाली. संस्कृतचा हा खुप मोठा वारसा जपणे एवढ्याच पुरत्या उपयोगाची संस्कृत भाषा ठरते. बस्स, यापुढे संस्कृतला एवढ्यासाठीच एवढ्यापुरतेच जपायचे आहे. संस्कृत भाषेतून नवे शोध, वेद-उपनिषदांनंतरच्या गेल्या हजारो वर्षात कोणालाही लावता आले नाहीत. कळत नकळत, संस्कृत बाबतच्या आदरयुक्त भितीतून, ‘देवभाषा’ समजून निर्माण झालेल्या पापभिरू वृत्तीमुळे, एकप्रकारच्या अंधश्रद्धेने पिडीत होऊन, संस्कृतचे इतर भाषांवर होणारे व झालेले आक्रमण आजवर सहन केले गेले. पण आता ते थांबवले गेले पाहीजे.
जगाची जडणघडण जशी केवळ ठरावीक अणुरेणूंतूनच बनते आणि नवे अणुरेणु अस्तित्वात येऊच शकत नाहीत, तसेच संस्कृतच्या जगतातील शब्द (पदे) केवळ याच संस्कृत भाषेपुरत्याच मर्यादीत राहणार्‍या ‘धातुं’पासून बनतात. हे सारे पूर्णपणे अनैसर्गिक आणि केवळ संस्कृतपुरतेच मर्यादीत राहते.
मराठी मात्र स्वतःचा भाषीक आब, व्यवहार आणि उपजत-मूलभूतपणा सांभाळत शब्दांना स्विकारण्याची मुक्त, स्वच्छंद, स्वैर ‘धमक व क्षमता’ ठेवते. ‘वर्ण’ आणि ‘धातु’ या संकल्पनांमुळे संस्कृतला ‘अक्षर’ ही निसर्गदत्त देणगी भाषेतून व्यवस्थीतपणे मांडता, दर्शवता, सांगता, वापरता आली नाही. संस्कृतने शब्द (पद) येथपर्यंत पोचण्याची अनैसर्गिक वृत्ती जोपासली आहे आणि त्यात शब्दाच्या आधी उपस्थीत राहणार्‍या ‘अक्षर’ या निसर्गदत्त संकल्पनेला जणू वगळले आहे. कारण ‘वर्ण’ यातून ‘धातू’ बनतात आणि त्यांना ‘गण-विकरण’ लावून शब्द बनतात.
संस्कृत मध्ये ‘धातु’शिवाय शब्द बनूच शकत नाहीत. ‘धातु’वर गण-विकरण यांच्या संस्कारातून मग शब्द (पद) बनतात. ‘धातु’ हे शब्द समजून वाक्यातून वापरता येत नाहीत. त्यामुळे संस्कृतच्या प्रत्येक शब्दाला ‘व्युत्पत्ती’ची ‘विपत्ती’ आवश्यक (!) ठरते. स्वर-व्यंजन-विसर्ग यांच्या संधी-नियमात अनेक शब्दांच्या झालेल्या संधी सोडवून वाक्याचा अर्थ कळतो. ‘धातुं’ना अर्थ प्रदान केलेला असतो. संस्कृत भाषेपुरताच यांचा अर्थ मर्यादीत राहतो. मराठीत वाक्यातील शब्द एकमेकांपासून तटस्थ दिसतात व वावरतात. त्यातील अक्षरे सुद्धा तटस्थ दिसतात व वावरतात. मराठीतील अक्षरे ही केवळ स्वर-अक्षरे आणि व्यंजन-अक्षरे यातून बनतात. अनुस्वार वा विसर्ग दिलेलेअक्षर सुद्धा तटस्थ दिसतात व वावरतात.
संस्कृतला ‘अक्षर’ ही संकल्पनाच कळलेली नाही. अर्च् (पूजा करणे), अर्ज् (मिळवणे), अर्थ् (याचना करणे), अर्द् (ठार मारणे) असे ‘धातू’ संस्कृत मध्ये आहेत. यातील स्वरापुढे ‘र्’ आणि ‘च्’ ही दोन व्यंजने आलेली आहेत. कोणत्याही मानवाला स्वरानंतर केवळ एकच व्यंजन उच्चारता येते. अ+त्, अ+ज्, अ+र् वगैरे उच्चारता येतात पण अ+त्+च्, अ+त्+क्, अ+ज्+स्, अ+र्+म्, . . . वगैरे उच्चारता येत नाहीत. या अशा संस्कृतच्या अज्ञानाने संस्कृतला ‘जोडाक्षर’ याचीही कल्पना प्राप्त झालेली नाही. मराठीची जोडाक्षर ही योजना अत्यंत नैसर्गिक, शास्त्रीय आणि सर्व मानवी भाषांना लागू होणारी सर्वसमावेशक ठरते. ‘अक्षर’ याचीच नैसर्गिक व शास्त्रीयता न कळल्याने आणि ‘धातु’ या कल्पनेवर आधारीत संस्कृत भाषा आणि तिचे व्याकरण आधारीत असल्याने संस्कृतची शब्द रचनेपर्यंत पोचण्याची पद्धत पुढीलप्रमाणे घडली आहे. ही अत्यंत अनैसर्गिक ठरते.
संस्कृत भाषा विज्ञानाची शब्द निर्मितीची संकल्पना
वर्ण
धातु
पद (शब्द)
वाक्य
मराठी भाषा ‘उच्चार अक्षर चिन्ह लेखन अर्थ’ यांना क्रमवार शास्त्रीयतेने अवगत करते. ध्वनी आणि कागद या भाषा माध्यमांतील ‘भाषेची ध्वनी वृत्ती’ आणि ‘भाषेची कागदी वृत्ती’ यांच्यातील मर्यादा साभाळत आजच्या युगातील ‘भाषेची संगणकीय वृत्ती’ सुद्धा अतिशय उत्तमपणे जपासू शकते एवढी सक्षम आहे. याचे केवळ एकमेव कारण म्हणजे ‘व्यंजन-स्वर >>>> अक्षर >>>> शब्द’ या निसर्गाने मानवावर लादलेल्या गोष्टींचा अतिशय नेसर्गिकपणे मराठीने केलेला स्विकार होय.
आजवरच्या मराठी पुस्तकी व्याकरणात आलेले याबाबतचे काही महत्त्वाचे चुकीचे अज्ञानी उल्लेख जसेच्यातसे पुढे देऊन त्याबाबतचे विश्लेषण देत आहे.
1970 सालापासून महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळांतून नवा सुधारित अभ्यासक्रम अमलात आला. व्याकरण व लेखन या विभागाला 50 गुण देण्यात आले. अभ्यासक्रमावर आधारित अशा अद्ययावत पाठ्यपुस्तकांची गरज तीव्रतेने भासू लागली. ‘सुगम मराठी व्याकरण लेखन’ या माननीय श्री. मो. रा. वाळंबे यांचे पुस्तक याच काळात प्रसिद्ध झाले. ‘‘‘सरकारने, ‘शुद्धलेखन नियमावली’ ची पुस्तिका तयार करताना प्रामुख्याने मराठी साहित्य महामंडळाने 1972 मध्ये प्रसिद्ध केलेली ‘लेखनविषयक नियम’ ही पुस्तिका आणि श्री. मो. रा. वाळंबे यांचे व्याकरणविषयक साहित्य यांची फार मदत झाली, असा स्पष्ट उल्लेख ‘शुद्धलेखन नियमावली’च्या पहिल्याच पानावर मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांच्या सहीने केलेला आहे.
त्यानंतर आलेल्या व्याकरणाबाबतच्या विविध पुस्तकांनी याचीच पुस्ती जोडलेली आढळते. त्यामुळे केवळ याच पुस्तकांतील व्याकरणाचे उल्लेख देत आहे.
‘सुगम मराठी व्याकरण लेखन’ या माननीय श्री. मो. रा. वाळंबे यांच्या, सुधारीत आवृत्ती 1990, या पुस्तकातील उतारे येथे देत आहे कारण या पुस्तकाच्या वापराचा उल्लेख, ‘‘‘माध्यमिक शाळेतील इयत्ता 8-9-10, माध्यमिक शालान्त परीक्षा, उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा, माहाविद्यालयीन परीक्षा, पदविका परीक्षा, साहित्य परिषद इत्यादींच्या अभ्यासक्रमावर आधारलेले पुस्तक’’’, असा केलेला आहे आणि ते त्याप्रमाणे महाराष्ट्रात वापरले गेले आहे. यातील ‘पाठ 1’ या पहिल्याच भागातील ‘आपली भाषा, लिपी व व्याकरण’ यात दिलेला पहिला विचारच मराठीच्या उपजत व मूलभूत प्रवृत्तीच्या विरोधी ठरतो.
 ‘‘‘‘आपल्याला मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. भाषेचा अभ्यास करायचा म्हणजे ती भाषा ज्या घटकांची बनली आहे, तिचा अभ्यास करायचा. आपण बोलताना अनेक संपूर्ण विचार क्रमाने मांडत असतो. या संपूर्ण विचारालाच ‘वाक्य’ असे म्हणतात. आपली भाषा ही अनेक वाक्यांची बनलेली असते.’’’’ अशा छान सुरवातीनंतरचा अत्यंत चुकीचा आणि संस्कृत-व्याकरणाने बरबटलेला भाग बघा.
‘‘‘‘शब्द हा वर्णाचा बनलेला असतो. भाषेचा विचार करायचा म्हणजे त्यातील वर्णाचा, शब्दांचा व वाक्यांचा विचार करायचा असतो; म्हणून आपण (1) वर्णविचार (2) शब्दविचार व (3) वाक्यविचार अशा क्रमाने मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करू.’’’’
काय आहे की नाही, ही केवळ, निव्वळ, फक्त संस्कृतच्या पाणिनी व्याकरणाची केलेली आळवणी व खुशामत? यात ‘अक्षर’ नावाच्या घटकाचा उल्लेखही नाही. ‘वर्णविचार’ यातच ‘अक्षरविचार’ येतो असे स्पष्टीकरण त्याच पुस्तकाचीच ‘रीऽऽऽ‘ ओढणार्‍या अनेक लेखकांनी म्हणून त्यावर पांघरूण टाकायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या कोणत्याही पुस्तकात मराठीचा ‘अक्षरविचारच’ आलेला नाही आणि हेच मी विविध लेखांतून सप्रमाण सिद्ध व स्पष्ट करत आहे.
अहो, कोणत्याही मराठीला व्यक्तीला विचारलेत तर त्याला व्याकरण न शिकताही काय कळते? वाक्यात शब्द असतात, शब्दात अक्षरे असतात आणि अक्षरात व्यंजन व स्वर असतात. बस्स, हेच तर मराठीचे वैशिष्ठ्य आहे. आपल्या मराठीच्याच व्याकरणात आजवर काय मांडले गेले?
मराठीच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणातील कल्पना
वर्णविचार
शब्दविचार
वाक्यविचार
खरे पाहत मराठीचे अंतरंग कसे आहे? याचे अगदी साधेसोपे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
आपण मराठी बोलतो त्यातच व्याकरण असते. आजवरचे ‘बोली-व्याकरण’ आणि ‘पुस्तकी-व्याकरण’ यात जो जमीन-अस्मानाचा प्रचंड फरक निर्माण झाला तो, ‘व्याकरण’ म्हणजे ‘संस्कृतच्या पाणिनींची विद्वत्ता’ असे समीकरण घडवले गेल्यामुळे घडला.
हा विचार आता नेस्तनाबूत करून मराठीचे मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरतेच व्याकरण आणणे, महत्त्वाचे ठरते.
मराठी भाषा विज्ञानाची शब्द निर्मितीची संकल्पना
व्यंजन व स्वर
अक्षर
शब्द
वाक्य
मराठीचे भाषीक धोरण व्यंजन व स्वर >>>> अक्षर >>> शब्द  अशा रितीने कसे घडले आहे याचे पुढीलप्रमाणे चित्रमय स्वरूप मांडता येते. त्यातून व्यंजनाच्या उच्चारात गुंतलेली जिभ सोडवून स्वराच्या उच्चारात कशी व कुठे न्यावी लागते, याची स्पष्ट कल्पना येते. त्यातून मराठीच्या ‘स्वर’ अक्षराच्या आणि ‘व्यंजन स्वर’ अक्षराच्या उच्चारात घडणारी मुखाच्या गाभार्‍यातील अवयवांची निश्चित हालचाल सर्वांना कळते.
हे उच्चार शास्त्र मराठी भाषेने, जगातील कोणत्याही भाषेला लागू करून, जागतीक पातळीवर मराठीला सर्वसमावेशकाची भुमिका घेता येईल. मराठीच्या या अचूक उच्चार शास्त्रातील सहजसोपेपणा विस्मयकारी असून त्याचा दूरगामी परीणाम मानवी भाषांवर होणार आहे.
मराठी स्वरांच्या उच्चारांची साधीसोपी शास्त्रीय व नैसर्गिक रचना –
केवळ जिभेच्या स्थितीवर स्वरांची निर्मिती मराठीने अवलंबून ठेवली आहे. म्हणून मराठीला, स्वरांच्या उच्चाराच्या निर्मितीच्या प्रक्रियेनुसार, स्वरांचे ‘मूलभूत’ व ‘ओघवते’ असे दोन भाग पाडता येतात.
मराठी व्यंजनाच्या उच्चारांची साधीसोपी शास्त्रीय व नैसर्गिक रचना –
‘स्पर्श, अंतस्थ, उष्मे, महाप्राण, घर्षण’ अशा वर्णनातून व्यक्त करता येणार्‍या स्पर्शातून व्यंजने निर्माण होतात. व्यंजनाचा उच्चार साधण्यासाटी मुखातील आतील अवयवांशी जिभेचा वा ओठांचा ओठांना स्पर्श होतो. ‘ह’ हे एकमेव मराठी व्यंजन हवेचा लाटेसारखा क्षणीक स्फोट घडून बनते. मराठीला, व्यंजनांच्या उच्चाराच्या निर्मितीच्या प्रक्रियेनुसार, व्यंजांचे सुद्धा ‘मूलभूत’ व ‘ओघवते’ असे दोन भाग पाडता येतात.
‘स्वर’ वा ‘व्यंजन+स्वर’ अशी अक्षरे मराठीत असतात. म्हणजेच मराठी अक्षरांचा शेवट केवळ स्वराने होतो. संस्कृतमधील सर्व अक्षरांचा शेवट स्वराने होत नाही. मराठी आणि संस्कृत भाषांतील अनेक महत्त्वाच्या फरकांपैकी हाही महत्त्वाचा फरक ठरतो. संस्कृत आणि मराठी भाषेत साम्यखुणा थोड्याशा पण मात्र फरक अस्मानी प्रचंड आहे.
स्वर आणि व्यंजने यांची निर्मिती स्थळे भिन्नपणे सांगता मांडता व वापरता आल्यामुळे त्यांच्या उच्चारांबाबत ‘मूलभूत’ व ‘ओघवते’ असे प्रत्येकी दोन गट करणे मराठीला शक्य झाले आहे. ‘उच्चार आणि ऐकणे’ यातील सर्वात सुक्ष्म ध्वनीला स्विकारणे मराठीला शक्य झाले आहे. संस्कृतला ते जमलेले नाही आणि म्हणून मराठी ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’ झेपावू शकते आणि भाषांच्या जागतिकीकरणात सर्व मानवी भाषांसाठी सर्वसमावेशकाची भूमिका हातु शकते.
व्यंजनाच्या स्पर्शात गुंतलेली जिभ सोडवून स्वराच्या उच्चार स्थानी नेताना घडणारी हालचाल अचूकतेने मराठीला मांडता, सांगता आली आहे. उच्चाराच्या वेळची जिभेची आणि ओठांची हालचाल अतिशय नैसर्गिकपणातून मनात कोरली जाते आणि शब्दांतील अक्षरांचा उच्चार करताना प्रत्येक अक्षरातील स्वराचा आपोआप नैसर्गिकपणे उच्चार तीन भिन्न कालमापनातून, म्हणजे ‘अपुरा, नियमीत व लांबट’, असा होतो. ‘गवत’ शब्दातील ‘ग’ मधला ‘अ’ उच्चार ‘नियमीत’, ‘व’ मधला ‘अ’ उच्चार ‘लांबट’ आणि ‘त’ मधला ‘अ’ यांचे उच्चार अपुरा’ होतो. कोणीही कोणाला हा उच्चार कसा करायचा ते शिकवायची गरज नसते. मेंदूतून निघणार्‍या शब्दांतील अक्षर-उच्चाराबाबतच्या आज्ञाच योग्य ती सुचना ‘स्वरयंत्र ते ओठ’ या उच्चारकर्त्या अवयवांना आपोआप देतात. कमीतकमी वेळेत शब्दाचा उच्चार त्यातून घडतोच पण गद्य-पद्य-संगीत यातील आरोळी-आलाप-तान यांनाही खास नैसर्गिकता प्राप्त करून देतो.
आजवरच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणातील प्रत्येक बाबींचा अथायोग्य परामर्श लेखांतून घेत मराठीची अद्वितीयता प्रकट करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातून उपजत मूलभूत मराठीची ‘जडणघडण व व्यवस्थापन’ कळून त्यामुळे मानवी भाषांसाठीचे नैसर्गिक व्याकरण लक्षात येणार आहे. यात तुमचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर सामिल व्हा.
आपला, शुभानन गांगल  मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com

No comments:

Post a Comment