बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Wednesday, 15 January 2014

मराठी भाषा शिक्षणाचे अत्याधुनिक टप्पे – जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण



युनिकोड ते साऊंडकोड – 12
मराठी भाषा शिक्षणाचे अत्याधुनिक टप्पे – जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण
मराठी भाषा शिकणारे विद्यार्थी-गटाचे दोन भाग पडतात, (1) मराठी कुटूंबात जन्म झालेले मुल मराठी भाषा शिकते, (2) ज्यांना आयुष्यात कोणत्याही वयात मराठी शिकायची इच्छा होते अशा व्यक्ती. मराठी भाषा शिक्षणाचे, खास केवळ मराठीसाठीचे, तीन नाविन्यपूर्ण अत्याधुनिक टप्पे सादर करत आहे. हे टप्पे केवळ निव्वळ फक्त मराठीचे ठरतात. त्यासाठी मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर केला तरी मराठी लिपीला ‘मराठमोळी’ नाव देणे गरजेचे ठरते. यातून आजचे ‘चुकीचे-पुस्तकी-व्याकरण’ आणि त्यामुळे लागू केलेली ‘शुद्धलेखन नियमावली’ पूर्णपणे नेस्तनाबूत होते. हे सारे अघटीत, कल्पनातीत, स्वप्नील वाटेल, पण ते सत्य व वास्तव ठरणार आहे. ‘उपजत मूलभूत मराठी = आधुनिक मराठी’ हे समिकरण यातून नक्कीच प्रस्थापीत होईल.
कोणत्याही अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचे तीन भाग आपण जाणतो, (1) प्राथमिक, (2) माध्यमिक, (3) कॉलेज वा उच्च-शिक्षण. ‘वयोमाना’प्रमाणे या टप्प्यातून शिक्षण दिले जाते. यातील ‘वयोमान’ हा शब्द ‘आकलन क्षमता’ याच्याशी निगडीत आहे आणि ‘आकलन क्षमता’ याचा संबंध वर वर्णन केलेल्या ‘लहान मुलांना मराठी शिकवणे’ वा ‘कोणत्याही वयोगटातील इतर भाषीक व्यक्तींना मराठी शिकवणे’ या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो.
अगदी असेच तीन टप्पे ‘मराठमोळी’ लिपीतून मराठी शिकवताना करता येतात. ‘देवनागरी’ या नावाने आधुनिक युगात ‘युनीकोड’ नावाखाली एकत्रीत केलेली चिन्हे संस्कृत, हिन्दी आणि मराठी या प्रमुख भारतीय भाषांना वापरावी लागतात. युनीकोडच्या ‘देवनागरी’ साठी एकूण 128 कोनाड्यातून (Slots) दिलेली सर्व चिन्हे संस्कृत, हिन्दी आणि मराठी यातील प्रत्येक भाषा वापरत नाही. याशिवाय काही समान चिन्हांचा भाषीक वापर संस्कृत, हिन्दी आणि मराठी भाषा भिन्न प्रकारे करतात. संस्कृत, हिन्दी आणि मराठी भाषांच्या प्रत्येक भाषकाला आपली भाषा कशी आहे? कशी वावरते? याचे निश्चीत ज्ञान होणे गरजेचे आहे. तरच त्या भाषा तटस्थपणे टिकणार आहेत. नाहीतर त्यांच्यातील ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन, अर्थ’ या पाची स्वरूपात गूंता होऊन ‘ना ऐलतीरावर, ना पैलतीरावर’ अशी टांगती, निष्प्रभ, केवीलवाणी, असहाय्य अवस्था होणार आहे, झाली आहे. त्यासाठी मराठीने यापुढे मराठी लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव घोषीत करणे हाच केवळ एकमेव उपाय ठरतो. यातून 128 कोनाड्यातून (Slots) दिलेल्यांपैकी केवळ मराठीसाठीची चिन्हे कोणती ते केवळ युनिकोडपुरतचेच नव्हे तर मराठी भाषेच्या ‘ध्वनी, कागद व संगणक’ अशा तिन्ही माध्यमांसाठी घडेल. युनिकोड यातून स्क्रिपट म्हणजे लिपी असे कळत नकळत मांडले व सांगितले जाते. मराठीचे खरे अस्तित्व यातून प्रगट होत नाही. जगातील जास्त बोलणार्‍या भाषांपैकी एक भाषा अशा सर्वसामान्य स्वरूपातून ती जगासमोर युनीकोड मुळे आली आहे.
Unicode 6.3 Character Code Charts यातून Devanagari वा Devanagari Extended  या नावाखाली मराठीला वावरावे लागत आहे. मराठीला मराठी म्हणून वेगळे स्थान तरच मिळेल जर मराठीने स्वतःच्या लिपीचे नाव मराठमोळी असे घोषीत केले. मराठीला स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने, गौरवाने, प्रतिष्ठेने , अभिजात-भाषा म्हणून जर जगायचे असेल तर हे घडवणे गरजेचे आहे. आपल्या पिढीने पुढाकार घेऊन जर हे केले नाही तर पुढच्या पिढ्यांना ते शक्य होणार नाही आणि मराठीच्या नामशेष होण्याला आपली पिढी कारणीभुत ठरेल. हा मराठीच्या जीवन-मरणाचा प्रश्न ठरतो. युनिकोडच्या देवनागरी स्क्रिप्टच्या 128 कोनाड्यांचा (Slots) आराखडा आटोपशीरपणे दिला आहे.
मराठीसाठी लिपी म्हणजे ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन, अर्थ’ यांचे एकरूपत्व, अजोड संलग्नता आणि अतूट अनोखे अद्धितीय नाते ठरते. हे केवळ मराठीलाच शक्य आहे. संस्कृत आणि हिन्दी या भाषांना मुळीच नाही. बदकांच्या कळपात वाढलेल्या मराठी राजहंसाला मोठे होऊन दिमाखाने मिरवता यावे, कावळ्याच्या घरट्यातून बाहेर पडून मराठी कोकीळेने गोड गोड गाऊ लागावे, यासाठी आधी मराठीने स्वतःच्या लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव घ्यावे.
आज ‘भिक नको पण कुत्रा आवर’ अशी ‘मराठी नको पण व्याकरण व शुद्धलेखन आवर’ अशी मराठीची अवस्था तिच्या व्याकरण आणि शुद्धलेखन नियमावली मुळे झाली आहे. याचा कायमचा बंदोबस्त करून मराठीला उपजत मूलभूत शास्त्रीय आणि आधुनिक बनवणे सहज शक्य आहे.
आजच्या वर्तमान काळात अनेक नामवंत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, व्यावसाईक, कारखानदार, संशोधक, . . . वगैरे मराठी व्यक्ती विविध क्षेत्रात अत्युच्च अलौकीक कामे करत आहेत. त्यांना मराठी बोलता येते. या व्यक्ती म्हणजे मराठीचा खराखुरा अत्याधुनिक ज्ञान संग्रह ठरतो. अशा व्यक्तींना मराठीतून लेखन करणे ही शिक्षा वाटते. त्यांच्या उच्च पदस्थपणाला ‘किती अशुद्ध मराठी लिहीता?’ अशा ताशेर्‍यांना सामोरे जाऊन स्वतःच्या पदाला व इभ्रतीला डाग द्यायचा नसतो. त्यांना सहजपणे मराठीतून लेखन करणे शक्य होणार आहे कारण ‘मराठमोळी’ लिपीमुळे मराठीचे आजचे ‘चुकीचे-पुस्तकी-व्याकरण’ आणि ‘शुद्धलेखन नियमावली’ पूर्णपणे नेस्तनाबूत होणार आहे.
प्रत्येक शिक्षकाला मराठीची ‘जडणघडण, व्यवस्थापन व व्याकरण’ अशी संपूर्ण व्यवस्था नीट कळल्याने आत्मविश्वासाने आणि मराठीच्या जाज्वल्य अभिमानाने शाळेतून मराठी शिकवणे साध्य होणार आहे.
संस्कृतपासून मराठीला वेगळे आणि दैदिप्यमान स्थान देण्याचे कार्य ज्ञानेश्वरांनी केले त्याच मायमराठीला मराठी व्याकरणकारांनी पुन्हा संस्कृतच्या गोठ्यात नेऊन बांधले. ‘संस्कृत शिकलात तर मराठी चांगले येईल’ असे सांगण्यापर्यंत व्याकरणकारांची आणि त्यांना सामील असलेल्या मराठी व्यक्तींची मजल गेली. भाषावार प्रांत रचनेत संस्कृत-भाषा-प्रांत म्हणून कोणत्याही भागाला भारतात संस्कृत-प्रांत निर्माण करता आला नाही. प्रत्येक भारतीयाने संस्कृतची केवळ पुजा बांधली. व्यवहारात भाषा म्हणून कोणत्याही राज्याने तिचा स्विकार केला नाही. ‘संस्कृतला चांगले दिवस यावेत, संस्कृत टिकावी या उद्देशाने’ आणि ‘मराठीचा मराठीसाठी मराठीपुरता अभ्यास करता न आल्याने’ व्याकरणकारांनी पाणिनींच्या संस्कृतचे व्याकरण मराठीत घुसडून मराठीची मराठीतच ‘तत्सम’ आणि ‘तत्भव’ अशी फाळणी केली आणि मराठीचे व्याकरण निर्माण केले. तेव्हा पासून मराठीच्या अधोगतीला सुरवात झाली. आता ही अधोगती रोखण्यासाठी केवळ एकच रामबाण उपाय आहे. तो म्हणजे मराठी लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव तातडीने, युद्धपातळीवरील त्वरेने घोषीत करणे.
हे घडल्यावर मराठीला ‘जडणघडण, व्यवस्थापन आणि व्याकरण’ अशा तीन टप्प्यातून मराठी भाषा शिकविण्याचे नवे अचूक तंत्रज्ञान ‘ध्वनी, कागद आणि संगणक’ या तिन्ही माध्यमातून वापरता येणार आहे. समाजाच्या भाषीक गरजा सर्वार्थाने मराठी भाषा यातून पूर्ण करू शकेल.
मराठी शिक्षणाचे टप्पे आणि त्यांचे आटोपशीर मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. त्याबाबत ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन, अर्थ’ या ‘मराठमोळी’ लिपीच्या अंतरंगातील अविभाज्य गुणधर्म त्याच क्रमाने कसे शिकवले जातील ते एकेका ओळीतून मांडत आहे. अर्थात याचे सर्व स्पष्टीकरण सविस्तरपणे पुढील काही लेखांतून क्रमाने सांगण्यात येणार आहे.
1)    जडणघडण –
उच्चार >>>>> अक्षर >>>>> छोट्या शब्दांचा अर्थ >>>>> केवळ ध्वनी व संगणकीय माध्यम
अगदी दोन वयाच्या मुलांपासून ‘मराठमोळी’ लिपीतून संगणकातून मराठी शिकविण्याचे नाविन्यपूर्ण धोरण घराघराला वापरता येईल.
2)    व्यवस्थापन –
उच्चार >>>>> अक्षर, जोडाक्षर, खास-जोडाक्षर >>>>> शब्दांचा अर्थ >>>>> ध्वनी-संगणक-कागद माध्यम
अत्याधुनिक युगात वयोमानाप्रमाणे वा आकलनाच्या क्षमतेप्रमाणे मराठी भाषेच्या माध्यमांची चढतीभाजणी आधी ध्वनी, नंतर संगणक, आणि त्यानंतर कागद अशी ठरणार आहे. प्रत्येक मराठी कागद हा संगणकातून निर्माण होणार आहे. हाताने कागदावर लिहीणे ही खास-कला ठरणार आहे, एवढा त्याचा वापर पुढील पिढीत कमी होणार आहे. वाचक-संस्कृतीची जोपासना इलेक्टॉनिक माध्यमांतून, मोबाईल-पॅड-लॅपटॉप-संगणक-स्क्रीन, यातून होणार आहे.
3)    व्याकरण –
जगातील इतर भाषांशी उच्चार शास्त्राच्या आधारे संबंध स्पष्ट करत, मराठीचे अलौकीक श्रेष्ठत्व स्पष्ट करणारे, मानवी भाषांशी संबंध ठेवणारा परिसर म्हणजे मराठीचे व्याकरण असेल. भाषांच्या जागतिकीकरणात मराठीला वैश्वीक-दर्जा सायन्स म्हणून प्राप्त करून देणारी नैसर्गिक-भाषा-पद्धत असेल. केवळ मराठीसाठीचेच नव्हे तर मानवी भाषांना सर्वसमावेशकाची भूमिका देणारी ही नवी सुरवात असेल. इंग्रजीला डिक्शनरीतून मुक्त करणे, जपानी भाषांना उच्चारानुसार वावरण्याची सोय करून देणे, युनीकोड ऐवजी जगाला साऊंडकोड प्रदान करणे हे ‘मराठमोळी’ लिपीतून साध्य होणार आहे.
‘मराठमोळी’ लिपी या प्रस्तावाला मराठी समाजाच्याच विविध स्थरांचा मुक, अबोल व तटस्थ (याला आपण ‘मुखस्थ’ असे नाव देऊ) सहभाग अथवा संपूर्ण विरोधच (याला आपण ‘विरोध’ असे नाव देऊ) आजवर गेल्या पंचवीस वर्षात मला लाभला. याची कारणे पुढीलप्रमाणे मांडता येतात. त्यात आजवर जास्त प्रमाणात मिळालेला हमखास सहभाग ‘मुखस्थ’ की ‘विरोधी’ अशा गटांच्या नावाने देत आहे. हा सहभाग कोणत्या एका गटाचा की दोन्ही हे यातून कळेल.
क्रम
गट
परिक्षण
सहभाग
1
शिक्षक, प्राध्यापक
आम्ही आजवरच्या आमच्या आयुष्यात मराठीचे आजचे पुस्तकी-व्याकरण आणि शुद्धलेखन नियमावली शिकवत आलो. आता आयुष्यात आजवर हे जे शिकवले ते सारे चुकीचे होते हे मान्य करणे म्हणजे आमचीच मानहानी होते.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
2
लेखक
आजवर आमचे लेखन आम्ही ‘शुद्धलेखन जाणकारां’कडून तपासून घेत होतो वा आमचा प्रकाशक ते काम प्रकाशनाच्या आधी पूर्ण करून घेत होता. त्यामुळे आमचे आजवर काहीही अडले नाही आणि पुढेही अडणार नाही. खरे मराठी व्याकरण कसे आहे ते आता जाणून घेण्यापेक्षा आम्ही बोलतो त्यातच मराठी-व्याकरण असते आणि आम्ही तेच पाळतो. पुस्तकी-व्याकरण हा लेखन-संस्कार आमचे प्रकाशक घडवतात. शेवटी आम्हाला लेखक म्हणून समाजातील सर्व बोलींपर्यंत पोचायचे असते. आम्ही ‘मराठमोळी’ चळवळीत भाग घेतल्याने आजच्या प्रस्थापीत व्याकरण व लेखन-नियम यांच्याशी शत्रूत्व पत्करल्यासारखे होईल. आम्हाला ते झेपणारे नाही.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
3
डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, व्यावसाईक, कारखानदार, संशोधक, वगैरे.
आम्ही आमचे उच्च शिक्षणाचे सर्व ज्ञान इंग्रजीतून घेतले. त्यातून आमच्या बुद्धीमत्तेमुळे उच्चदर्जा मिळविण्यात यशस्वी झालो. हे सर्व ज्ञान आमच्यापाशी केवळ इंग्रजीतून सांगण्यासारखे आहे. मराठीत ते लिहून मराठी समाजाला याचे ज्ञान दिले तर मराठी समाजाला भरपूर फायदा होईल हे मान्य पण आम्ही लिहीलेल्या मजकूरात इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द न देता इंग्रजी शब्दच घातला तर मराठीचे व्याकरणकार त्यावर तुटून पडतात, असा अनुभव आहे. मग कशाला नको तो उपद्व्याप करायचा?  समजा आम्ही कष्ट करून मराठीच्या विकासासाठी लेखणी हाती घेऊन काय साधले जाईल? आमच्या लेखनाला प्रतिष्ठा मिळेल अशी खोटी आशा लावून बसायचे? मराठी लेखकांचा लेखन हाच व्यवसाय असतो. त्यांना त्यांच्या लेखनाला प्रतिष्ठा मिळेल अशा आशेवरच जगावे लागते, आमचे तसे नाही. पैसा मिळवून देणारा हा आमच्यासाठीचा व्यवसाय ठरत नाही. मग कशाला नसती उठाठेव करायची? जर ‘मराठमोळी’ मराठी समाजाने स्विकारली असे आमच्या लक्षात आले तर आम्ही विचार करू.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
4
युरोपीयन, अमेरीकन, आफ्रिकन, मंगोलीयन असे सर्व जागतीक भाषीक
समजा आम्हाला मराठी शिकायचे आहे पण मराठीबाबत आमच्यासमोर बरेच प्रश्न आहेत. मराठी ही संस्कृतमधून निर्माण झाली आहे, म्हणजे नक्की काय? म्हणजे कमीतकमी आमच्या आयुष्यात आम्ही आजवर केवळ हेच ऐकले आहे. संस्कृत भाषा भारतातील कोणत्याही प्रांतात सामान्य व्यवहारात वापरली जात नाही. याचे कारण कोणते? संस्कृत मधून साडेतीन हजार वर्षांपूर्वी वेद-उपनिषदे निर्माण झाली. सगळे ज्ञान संस्कृतमध्ये आहे असे भारतीय लोक मानतात. पण गेल्या हजार वर्षातील मानवी प्रगतीतील सर्व संशोधन भारताबाहेर झाले. जरी त्यात भारतीय लोकांपैकी अधिक करून मराठी व्यक्तींचा भरणा अधिक असला तरी त्यांना इंग्रजीचाच आधार घ्यावा लागला. कुटूंबाची भाषा मानवाच्या बुद्धीचे सर्वात उत्तम वाहन ठरते. भाषा म्हणून मराठी भाषा इंग्रजीपेक्षा श्रेष्ठ आहे पण मराठीला आजवर ‘भाषेचे शिक्षण’ आणि ‘शिक्षणाची भाषा’ यांचा समन्वय साधता आला नाही. आम्हाला तुमच्या ‘मराठमोळी’ लिपीबाबत उत्सुकता आहे. कारण जर तिची मांडणी ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन, अर्थ’ अशी असेल तर ती मानवाची नैसर्गिक भाषा नक्कीच ठरेल. इंग्रजी भाषेच्या मर्यादा आता जगाला माहीत झाल्या आहेत. त्यामुळेच अधिक शास्त्रीय ठरणार्‍या भाषेचा शोध जगभर घेतला जात आहे. त्यासाठीच संस्कृत भाषेची विद्यालये अनेक ठिकाणी निर्माण झाली आहेत. पण संस्कृत ही बंदिस्त भाषा असल्याने नव्या युगासाठी ती सुद्धा अयोग्य ठरते. म्हणून मराठीच्या ‘मराठमोळी’ लिपीतून साकारणार्‍या आधुनिकीकरणाकडे आम्ही उत्सुकतेने बघत आहोत.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
5
पत्रकार
बातमीतील अचुकता बघण्याकडे आमचा दृष्टीकोन कटाक्ष असतो. पण आम्ही हैराण होतो ते ‘मराठीत किती हो शुद्धलेखनाच्या चुका करता?’ अशा समिक्षेमुळे. खर प्रामाणीकपणे सांगायचे तर वर्तमानपत्रात जसे संपादक, उपसंपादक, बातमीदार असावेच लागतात तसेच मराठी वर्तमानपत्रात ‘शुद्धलेखन जाणकार’ नावाची पोस्ट असते. याचाच अर्थ सामान्य पत्रकारांनाच काय पण अगदी संपादकांनाही हो शुद्धलेखन जमत नाही. हल्ली शुद्धलेखन जाणकार कमी झाल्यामुळे त्यांचे पगार भरमसाठ वाढवून द्यावे लागतात. पत्रकार ही आमची नोकरी आहे. पैसा व प्रतिष्ठा आम्हाला यातून मिळते. प्रतिष्ठा ही आम्हाला पैशापेक्षा महत्त्वाची वाटते. कोणत्याही दिशेने पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वर्तन करणे आम्हाला पचवता येणारे ठरत नाही. आत्ताचा समाजातील पायंडा बदलणारे आम्ही कोणी क्रांतीवीर नाही. समाजाचे अचूक निदान करणारे पत्रकार आहोत. या घडीला मराठीला समाजात आजचे ‘पुस्तकी-व्याकरण’ आणि ‘शुद्धलेखनाचे नियम’ पाळण्याची सक्ती आहे. आम्हाला तेच पाळण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरीही आम्ही तुमच्या ‘मराठमोळी’ प्रस्तावाची एखादी बातमी करून छापू. यापेक्षा काहीही करणे आमच्या हातात नाही. ‘मराठमोळी’च्या प्रस्तावाचा प्रसार-प्रचार करण्याच्या त्यादृष्टीने आमचा यापेक्षा अधिक उपयोग होईल असे वाटत नाही.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
6
प्रकाशक
पुस्तके, मासिके, कादंबर्‍या वगैरे मजकूर प्रकाशीत करून त्याच्या विक्रीतून व्यवसाय यशस्वी करणे हे प्रकाशक म्हणून आमचे कार्य आहे. लोकांना रुचेल, पटेल, आवडेल अशा नियमीत पण रुजकर ठरणार्‍या कौटूंबीक, सामाजीक, राजकीय, शैक्षणीक, आध्यात्मीक, . . क्षेत्रात आमचे योगदान असते. समाजात खदखदणार्‍या गोष्टींचा पाठपुरावा करून क्रांतीकारी बदलांची दखलही आम्ही प्रकाशक नात्याने  पुस्तके, मासिके, कादंबर्‍या वगैरेतून प्रकाशीत करतो पण यातील गोष्टी वा घटना व्यवहार, संस्कृती, समानता, सहजीवन, सहकार, शिक्षण, . . . यांच्या बाबतीतल्या असतात. या सर्व गोष्टींसाठी वापरलेली भाषा प्रचलीत मराठीच असते. तुम्ही जे करत आहात त्यातून मराठी-भाषा-प्रकृतीच बदलणार आहे. आमचा वाचक वर्ग याला मान्यता देईल का? हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. इतक्या प्रखर क्रांतीकारी विचारांचा प्रकाशक तुम्हाला मिळो ही सदिच्छा, पण आम्ही त्याबाबत लाचार, परावलंबी व अगतीक आहोत हे प्रांजळपणे मान्य करतो.
‘मुखस्थ’
वा
‘विरोधी’
आजवर मिळालेला तीस वर्षांतील सर्वसामान्य प्रतिसाद हा असा आहे. असा प्रतिसाद आजवर मिळूनही मराठी वरच्या प्रेमापेक्षा, जागतिकीकरणात मानवाला सहाय्यभूत होणार्‍या मराठीसाठी ‘मराठमोळी’ लिपीचा प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर आणत आहे.

त्यात तुमची भूमिका कोणती आहे?
(1)   ‘मुखस्थ’ भुमिका घेऊन केवळ मजा बघणार्‍यातील एक?
(2)   संस्कृत प्रेमी गटाच्या दबावाला व दडपणाला घाबरून तटस्थ राहणार्‍यांपैकी एक?
(3)   ‘मराठमोळी’ ला पाठींबा द्यायचा म्हणजे संस्कृत या देवभाषेला विरोध तर करण्याचे पाप लागण्याची भिती वाटणार्‍यांपैकी एक?
(4)   देवळात, शाळांत, संध्याकाळच्या गप्पांत वा बिअरच्या घोटाबरोबर चर्चा करायला, ‘चला एक केवळ नवी बातमी मिळाली’ असे वाटणार्‍यांपैकी एक?
(5)   आम्हाला काय करायचे आहे?, पण नवीन काय सुरू आहे? याची माहिती घेणार्‍यांपैकी एक?
(6)   एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देणार्‍यांपैकी एक?
(7)   झोपेचे सोंग घेऊन स्वतःपर्यंत हे पोचलेच नाही असे इतरांना आणि स्वतःला दर्शविणार्‍यांपैकी एक?
(8)   वयस्कर आयुष्याचे किती दिवस राहीले? मिळालेला मानसन्मान जपायचा सोडून तो यात पडून गमवायचा कशाला?, असे वाटणार्‍यांपैकी एक?
(9)   की आणखी कोणी?
मी माझ्यापरीने माझ्या उरलेल्या आयुष्याचे हे काम म्हणून घेतले आहे. बघूया किती दिवस नाउमेद होत ते करता येईल ते. आपण यात वैचारीक, सामाजिक, प्रसार-प्रचारात्मक वा आर्थिक पाठबळ असे कोणतेही सहाय्य करू इच्छीत असाल तर जरूर संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल  
मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com

No comments:

Post a Comment