बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Tuesday, 14 January 2014

मराठीला ‘विसर्गसंधी’ नियमांची मुळीच गरज नाही



युनिकोड ते साऊंडकोड – 11

मराठीला ‘विसर्गसंधी’ नियमांची मुळीच गरज नाही

मराठीच्या आणि संस्कृतच्या ‘अनुस्वार’ आणि ‘विसर्ग’ या संकल्पना अगदी भिन्न आहेत. मराठीने ‘अनुस्वार’ आणि ‘विसर्ग’ या संकल्पना अचूक नैसर्गिकपणे स्विकारल्या असून संस्कृतने अतिशय अनैसर्गिक आणि स्वतःच्या व्याकरणापुरत्या ‘संधी-नियमांतून’ वापरता येतील, अशा स्विकारल्या आहेत. ‘मराठी व्याकरणकारांनी संस्कृत व्याकरणाचा बालीश अंधश्रद्धेतून स्विकार केलेला आहे’, हे या लहानशा लेखातून नक्की स्पष्ट होईल. तसेच मराठी भाषा सहजसोपी असूनही तिला मुद्दाम ठरवून क्लिष्ट व कठीण बनविल्याचे लक्षात येईल. मराठीने देवनागरी चिन्हांचाच स्विकार याहीपुढे करावा पण मराठीच्या लिपीला मात्र यापुढे ‘मराठमोळी’ असे नाव घोषीत करणे किती गरजेचे आहे, हेही यातून ध्यानात येईल.
‘अक्षर’ हि संकल्पना तटस्थपणे साकारणारा ‘स्वर’ (अ, आ, इ, . . . अशी बारा स्वरांची बाराखडी) आणि ‘व्यंजन+स्वर’ (व्यंजनाला त्यानंतर स्वर-चिन्ह जोडून, प्रत्येक व्यंजनाची बनलेली बाराखडी) अशा रितीने मराठीने स्विकारली आहे. चौतीस व्यंजनांची प्रत्येकी बारा स्वर-चिन्हे जोडून तयार होणारी ‘व्यंजन+स्वर’ अशा बाराखडींतील एकूण अक्षरे चारशे-आठ (34 व्यंजने X 12 स्वर-चिन्हे = 408) होतात. त्यामुळे मराठीत ‘अक्षरे’ चारशे वीस (12 ‘स्वर’ अक्षरे + 408 ‘व्यंजन+स्वर’ अक्षरे = 420) आहेत.
अनुस्वार आणि विसर्ग प्रत्येक मराठी अक्षराला (‘स्वर’ अक्षर आणि ‘व्यंजन+स्वर’ अक्षर या प्रत्येकाला) लागतो. प्रत्येक मराठी अक्षरात स्वर असतो आणि तो अक्षराच्या केवळ शेवटीच येतो. ‘स्वर’ अक्षर आणि ‘व्यंजन+स्वर’ अक्षर या प्रत्येक अक्षरातील स्वराला त्यानंतर ‘अनुस्वार’ वा ‘विसर्ग’ जोडता येतात. मराठीत जर अक्षराला अनुस्वार जोडला तर त्याला पुढे विसर्ग उच्चारता येत नाही म्हणून अनुस्वारीत अक्षरानंतर विसर्ग येत नाही. तसेच अक्षराला जर विसर्ग जोडला तर त्यानंतर अनुस्वार उच्चारता येत नाही म्हणून विसर्ग दिलेल्या अक्षरावर मराठीत अनुस्वार नसतो.
या मराठीच्या व्याकरणाला सांभाळण्यासाठी, पुढील पिढ्यांसाठी, आम्ही सादर केलेली संगणकीय मोफत उपाय योजना - ‘स्वतः’ शब्दातील ‘तः’ या अक्षरावर अनुस्वार तुम्हाला संगणकात चुकूनही देता येणार नाही अशी सोय म्हणूनच आम्ही ‘जलद सोप्पी मराठी’ यातून केली आहे. तसेच अनुस्वार दिलेल्या अक्षराला विसर्ग जोडताच येणार नाही अशी सोय लागू केली आहे. याशिवाय आजवर व्याकरणकारांना संगणक आणि संगणककारांना व्याकरण नीट माहीत नसल्याने ज्या तृटी मराठीच्या संगणकीय सॉफ्टवेअर मधून समाजापर्यंत पोचत होत्या त्यांना ‘जलद सोप्पी मराठी’ सॉफ्टवेअरमधून आम्ही आळा घालण्यात यश मिळवले आहे. संगणकातून मराठी वापरता येणे हा प्रत्येक मराठी व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क असून तो पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, त्यासाठी ‘जलद सोप्पी मराठी’ सॉफ्टवेअर यावरील आमचा मालकी हक्क सोडून ते मराठीला दान केले आहे.
आजच्या मराठी पुस्तकी व्याकरणात दिलेला ‘विसर्गसंधी’ हा भाग पुढे जसाच्या-तसा दिला आहे. त्यानंतर त्याची मुळीच गरज कशी नाही आणि खरी मूलभूत उपजत मराठी कशी आहे ते सांगितले आहे.
आजच्या चुकीच्या मराठी पुस्तकी व्याकरणात दिलेली माहिती –
विसर्गसंधी
(1)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
यशः+धन = यश++धन = यशोधन
मनः+रथ = मन++रथ = मनोरथ
अधः+वदन = अध++वदन = अधोवदन
तेजः+निधी = तेज++निधी = तेजोनिधी
नियम – विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिळुन त्याचा ‘ओ’ होतो. (याला ‘विसर्ग-उकार-संधी’ म्हणतात.)
(2)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
निः+अंतर = नि+र्+अंतर = निरंतर
दुः+जन = दु+र्+जन = दुर्जन
बहिः+अंग = बहि+र्+अंग = बहिरंग
नियम – विसर्गाच्या मागे अ, आ, खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ‘र्’ होऊन संधी होतो. (याला ‘विसर्ग-र्-संधी’ म्हणतात.)
आता पुढील शब्दांचे संधी पाहा –
निः+रस = नि+र्+रस = नीरस
निः+रव = नि+र्+रव = नीरव
येथे मागील नियमाप्रमाणे विसर्गाचा र् झाला. पण अशा ‘र्’ च्या पुढे र् हा वर्ण आल्यास कहिल्या ‘र्’ चा लोप होतो व त्याच्यामागील स्वर र्‍हस्व असल्यास दीर्घ होतो. येथे नि+र्+रस यातील ‘र्’ लोप होऊन त्याच्यामागील ‘नि’ ही दीर्घ झाली.
(3)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
मनस्+पटल = मनःपटल               तेजस्+कण = तेजःकण
नियम – पदाच्या शेवटी स् येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स् चा विसर्ग होतो.
(4)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
अंतर्+करण = अंतःकरण   सतुर्+सूत्री = चतुःसूत्री
नियम – पदाच्या शेवटी र् येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र् चा विसर्ग होतो.
(5)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
पुनर्+जन्म = पुनर्जन्म     अंतर्+आत्मा = अंतरात्मा
नियम – विसर्गाच्याऐवजी येणार्‍या ‘र्’ च्या मागे ‘अ’ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो ‘र्’ तसाच राहून संधी होतो.
(6)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
प्रातः+काल = प्रातःकाल     इतः+उत्तर = इतउत्तर
तेजः+पुंज = तेजःपुंज        अतः+एव = अतएव
नियम – विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क्, ख्, प्, फ्, यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो; मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
(7)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
निः+कारण = निष्कारण     निः+पाप = निष्पात
दुः+परिणाम = दुष्परिणाम              दुः+कृत्य = दुष्कृत्य
नियम – विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ्, यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो. जसे – निष्कर्ष, निषपन्न, दुष्कीर्ती, आयुष्क्रम, चतुष्कोण, बहिष्कृत.
(अपवाद - दुः+= दुःख  निः+पक्ष = निःपक्ष)
(8)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
निः+चल = निश्चल                  मनः+ताप = मनस्ताप
दुः+चिन्ह = दुश्चिन्ह         निः+तेज = निस्तेज
नियम – विसर्गाच्या पुढे च्, छ्, आल्यास विसर्गाचा ‘श’ होतो, त्, थ्, आल्यास ‘स’ होतो.
(9)   पुढील शब्दांचे संधी पाहा –
दुः+शासन = दुःशासन       निः+संदेह = निःसंदेह
नियम – विसर्गाच्या पुढे श्, स्, आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप पावतो, जसे – चतुःशृंगी, पुरःसर, रजःस्त्राव, प्रातःस्मरण, अंतस्थ.
विसर्गसंधी या नावाखाली पुस्तकी-व्याकरणकारांनी मराठीला संस्कृतचे परावलंबी, मांडलीक आणि गुलाम बनविले. संस्कृत-व्याकरणाचा जास्तीतजास्त भाग मराठीत घुसडण्याची त्यांनी ‘सुपारी’च घेतल्याचे जाणवते. मराठीच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवून त्यांना काय मिळाले? स्वतःपुरती प्रतिष्ठा की संस्कृत भक्तांकडून मानसन्मान? मराठी समाजाने मात्र ‘‘पुस्तकात काय आहे ते आम्हाला काय कळते? आणि ते कसेही असले तरी त्यामुळे आम्हाला काय फरक पडतो?’’ असा विचार केला. शाळेतून भाषा शिकावी लागते, केवळ घरोघरी बोलून नाही, हे प्रत्येक गावागावात आणि घराघरात घडू लागले आणि मराठी मागे पडू लागली. नव्या लेखक आणि कवींना आपल्या लेखातून, कादंबरीतून, कथांतून, कवितांतून, काव्यातून वावरायचे होते. त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्या साहित्याला न्यायचे होते. मग त्यांनी मान्यवर प्रकाशक गाठले. उच्चभ्रु समाजाच्या दडपणाला बळी पडल्याने या सर्व मान्यवरांचा कल ‘शुद्धलेखन नियमावली’ पाळण्याकडेच होता. केवळ माननीय विनोबा भावे यांनी पवनार येथून देवनागरीतच केवळ ‘एक-वेलांटी एक-उकार’ स्विकारला आणि ‘पवनार’ येथून प्रसिद्ध होणारे सर्व साहित्य उपजत मूलभूत मोडीलिपीच्या ‘एक-वेलांटी एक-उकार’ पद्धतीतून प्रसिद्ध केले. सरकारने मात्र उच्चभ्रु समाजाच्या दडपणाला बळी पडून ‘शुद्धलेखन नियमावली’ला मान्यता दिली. ज्ञानेश्वरांनी मराठीला संस्कृतपासून मुक्त केले आणि परत मराठीच्या पुस्तकी-व्याकरणकारांनी मराठीला संस्कृतच्या गोठ्यात मायमराठीला कायमचे कोंडले.
मराठीत बाराखडी आहेत. त्यातील अक्षरांचा एकमेकात मिलाफ होत नाही. ती नेहमीच तटस्थ राहतात. त्यामुळे ‘अक्षरांच्या संधी’ मराठीत आणल्या तर ते मराठी समाजाला मान्य होणार नाही. त्यापेक्षा दोन शब्दांच्या मिलाफातून ‘अक्षरांच्या संधी’ मराठीत आणता येतात, असा शोध मराठी व्याकरणकारांना लागला असावा. मग ‘‘मराठीत बरेच शब्द संस्कृतमधून आले आहेत’’ हे घोषवाक्य उगाळत त्यांनी विसर्ग असलेल्या संस्कृत-शब्दांसाठी मराठीच्या व्याकरणातून ‘विसर्गसंधी’ हे नियम आणले. खरच, मराठी व्याकरणकारांनी आपली अक्कल संस्कृतकडे गहाण ठेवली असल्याचे यातून कळते. ज्या दोन शब्दांच्या विसर्गसंधी करण्यासाठी पुस्तकी व्याकरणकारांनी जे जे पहिले शब्द निवडले आहेत ते ते सर्व लाल रंगात वरती दर्शवले आहेत. त्यातील एकही शब्द मराठीचा नाही हे कोणीही ‘गीतेवर हात ठेऊन’ कोर्टात शपथ घेऊन सांगेल. चुकीच्या पुस्तकी व्याकरणाच्या निर्मितीसाठी न्यायालयात सरकारवर दावा दाखल करावा असे आता खरच वाटू लागले आहे. तुम्हाला काय वाटते? त्याशिवाय सरकारचे आणि समाजाचे डोळे उघडणार नाहीत. मराठी वाचवा असा नारा देत स्वतःचा स्वार्थ साधायला सर्व पुढे पुढे करतात पण मराठीला खरोखर वाचवायचे असेल तर तिच्या शरिराला लागलेला हा व्याकरणीय रोग दूर करायला कोणीच पुढे येत नाही. अजूनही सर्वांना व्याकरणाची आणि म्हणून व्याकरणकारांची धास्ती, दहशत, दडपण प्रचंड असल्याचेच लक्षात येते. ‘सुखी माणसाचा सदरा’ आणि ‘मराठी व्याकरण जाणणारा लेखक-कवी’ शोधूनही सापडत नाही. पण तरीही चुकीचेच व्याकरण शिकवले जाणार आहे.
विसर्गसंधी या नियमाखाली दिलेले शब्द मराठी नाहीत -
विसर्गसंधी नियमांखाली ‘‘‘यशः, मनः, अधः, तेजः, निः, दुः, बहिः, मनस्, तेजस्, अंतर्, सतुर्, पुनर्, प्रातः, इतः, तेजः, अतः’’’, हे मराठी शब्द असल्याचे सांगून त्यांची संधी नंतरच्या शब्दाशी होते असे सांगितले जाते. कोणत्या मराठी व्यक्तीला हे शब्द मराठी आहेत असे वाटेल? कोणत्या मराठी शब्दकोषात यांना शब्द म्हणून स्थान मिळालेले आहे? त्या शब्दांचा निव्वळ, केवळ, फक्त शब्द म्हणून कोणता अर्थ होतो? मराठीत शब्द त्यांना अर्थ घेऊन येतात व स्थिरावतात. समजा तुमच्या लहान मुलाला तुम्ही ब्रेड खायला देताना प्रत्येक वेळी ‘गाढव, गाढव’ असे म्हणालात तर त्याला ‘ब्रेड’ म्हणजे ‘गाढव’ असेच कळेल, उमगेल, लक्षात राहील. होय, मराठीत नवे शब्द येतात ते अगदी अशा पद्धतीने होय. पण तरीही मराठीच्या संपूर्ण उपजत मूलभूत व्याकरण त्याला लागू पडते आणि समाजात तो शब्द आपोआप व्यवस्थीत स्थीर होतो. मराठीत इंग्रजीतील बरेच शब्द आले आहेत आणि येत आहेत. म्हणून काही इंग्रजीचे व्याकरण त्या शब्दांना लागू पडत नाही. ‘रेल्वे, कार, स्कुटर’ सारखे असंख्य शब्द मराठीत आहेत. त्यांचा वापर मराठीतून ‘रेल्वे आली’, ‘कार आली’, ‘स्कुटर आली’ असा स्त्रीलिंगी होतो. कोना व्याकरणकाराने यांना मराठीसाठी स्त्रीलिंग दिलेले नाही. ते समाजाने आपसुकपणे मराठीसाठी स्विकारले. इंग्रजीत केवळ सजीवतेसाठीच्या शब्दांना लिंग प्रदान केले जाते, ‘रेल्वे, कार, स्कुटर’ अशा निर्जिव शब्दांसाठी नाही. तरीही मराठीने नागपूर पासून मुंबईपर्यंतच नव्हे तर जगभरच्या मराठीने या शब्दांना स्त्रीलिंगच दिल्याचे नक्की कळते. कोणत्याही एका भाषेला दुसर्‍या भाषेच्या व्याकरणात अडकविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वाघाला शेळी, शेळीला बेडूक, बेडकाला हरण, हरणाला वाघ बनविण्याचा प्रकार आहे. खरच, मराठी व्याकरणकार इतके अक्कल-शुन्य कसे? समाजातील माननीय कार्यकर्ते, महनीय संस्थाचालक, प्रसिद्ध लेखक-कवी, मान्यवर साहित्यीक अशा माझ्या मित्र-मैत्रीणंना आजवर, म्हणजे गेल्या तीस वर्षात जेव्हा जेव्हा हे सांगितले तेव्हा वैयक्तिक पातळीवर ते प्रत्येकाने मान्य केले. पण मराठी व्याकरणकार नावाच्या मांजराच्या गळ्यात सत्याचा जयघोष करणारी घंटा बांधायला यातील कोणीही उंदीर तयार नव्हता! होय प्रांजळपणे मला हे समाजापुढे मांडावे लागत आहे.
विसर्गसंधी या नियमात दिलेल्या शब्दांना ते नियम लागू होत नाहीत -
या विसर्गसंधी नियमातील ‘नियम 7’ यातील ‘अपवाद’ या मथळ्याखाली मराठीतील ‘दुःख, निःपक्ष’ असे दोन शब्द दिले आहेत. हे शब्दमात्र ‘अपवाद’ या नावाखाली नियमात वावरतात. पण त्यातही पुन्हा मखलाशी केलेली आहेतम त्यात सांगितले आहे की हे शब्द ‘दुः+= दुःख’ आणि ‘निः+पक्ष = निःपक्ष’ असे बनले आहेत. अहो, मराठीत ‘दुः, निः, ख’ हे शब्द नाहीत हो, कृपया व्याकरणकारांना हे कोणीतरी सांगेला का?
मराठीतील ‘दुःख, निःपक्ष’ अशा शब्दांतील सुद्धा विसर्ग आता लोप पावत आहे. ‘स्वतः’ सारखा शब्द सुद्धा आता ‘स्वता’ असे रुप घेऊन आलेला दिसतो. कोणताही मराठीत नवा येणारा शब्द त्यात विसर्ग घेऊन येत नाही. ‘दुःख’ शब्द ‘दुख सुख’ असा काव्यातून येऊ लागला आहे आणि त्यातील ‘दुख’ शब्दाचा अर्थ सर्वांना कळतो. ‘निःपक्ष’ शब्दापेक्षा ‘तटस्थपणे’, ‘स्वतंत्र’ हे शब्द जास्त प्रचलीत होत आहेत. ‘तो दुःखी आहे’ यासाठी ‘तो फार सॅड आहे’, ‘तो फार अपसेट आहे’ अशी शब्द रचना मराठी ठरते. ‘तो निःपक्ष निर्णय घेतो’ यासाठी ‘तो इन्डिपेन्डन्ट निर्णय घेतो’ अशी वाक्यरचना घराघरात ऐकू येते. आता हे मराठी नाही असे व्याकरणकार म्हणतील. मराठी भाषा ओघवती आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. शब्दांना बदलण्याची संधीच न देणार्‍या संस्कृत भाषेशी संधी करून मराठीत संधी नियम आणण्याचे कारस्थान केले गेले. मराठी स्वतंत्र, स्वावलंबी, मुक्त, स्वच्छंदी आहे. तिचे हे स्वाभाविक नैसर्गिक रुपामुळेच ती जागतीक पातळीवर सर्वसमावेशकाची भूमिका घेऊ शकणार आहे. आता तरी संस्कृतप्रचूर पुस्तकी व्याकरणाचा त्याग झालाच पाहीजे.
विसर्गसंधी या नियमात दिलेल्या शब्दांचा अर्थ त्यांची फोड करून जाण्याची मराठीला गरज नाही -
वरती दिलेल्या विसर्गसंधी नियमात ‘यशोधन, मनोरथ, अधोवदन, तेजोनिधी, निरंतर, दुर्जन, बहिरंग, नीरस, नीरव, मनःपटल, तेजःकण, अंतःकरण, चतुःसूत्री, पुनर्जन्म, अंतरात्मा, प्रातःकाल, इतउत्तर, तेजःपुंज, अतएव, निष्कारण, निष्पात, दुष्परिणाम, दुष्कृत्य’ एवढे शब्द उदाहरणे म्हणून दिलेले आहेत. त्याच अर्थांसाठी त्या शब्दांच्या जागी मराठीत ‘यशधन, मनरथ, अधवदन, तेजनिधी, चिरंतर, दुष्टजन, बाह्यरंग, बेरस, निरव, मनपटल, तेजकण, अंतकरण, चारसूत्री, पुनरजन्म, अंतरआत्मा, प्रभातकाल, नंतर, तेजपुंज, असे, विनाकारण, बिमोड, वाईट परिणाम, वाईट कृत्य’ अशी रचना विसर्ग न वापरता उपयोगात आणून त्याच समान अर्थाने वापरता येते. संस्कृतला विसर्ग न वापरता ते शब्द वापरता येणार नाहीत कारण हे संस्कृतचे शब्द त्यांनी स्विकारलेल्या ‘धातु, गण, विकरण’ यातून बनलेले असतात. मराठीत असले काहीही नसते. मराठीत धातु नसतात. मराठीतील प्रथमेचे एकवचन म्हणजेच ‘धातु’ अशी चुकीची माहिती प्रसारीत केलेली आहे. काहीही करून संस्कृतच्या व्याकरणाच्या गोठ्यात मायमराठीला नेऊन बांधायचेच अशी ‘सुपारी’ मराठी व्याकरणकारांनी घेतल्याचेच यातून सिद्ध होते.
‘धातु’ या संकल्पनेबाबतचे संस्कृतचे पुढील महत्त्वाचे खास नियम मराठीतील प्रथमेच्या एकवचनाला (नामाला) लागु पडत नाहीत. (1) संस्कृतमध्ये पाणिनींनी स्विकारलेले केवळ 2115 धातु आहेत, (2) संस्कृत मध्ये ‘धातु’ शब्दातून (पदातून) वापरता येत नाहीत, (3) ‘धातुं’वर ‘गण-विकरण’ यांचा संस्कार करून, त्यांना दिलेले नेमके प्रत्ययांबाबतचे नियम लावून वापरता येतात, (4) शब्दातील अन्त-अक्षरे आणि त्यातून निर्माण केलेले स्त्री-पुरुषी अनैसर्गिक भाव निश्चित केलेले खास नियम लावून मगच त्यांची पदे संस्कृतमध्ये बनतात. (5) तीन प्रकारच्या वचनांतून प्रत्येक शब्दाचा वावर तो शब्द ‘चालवून’ आणि ‘लक्षात ठेऊन’ होतो.
मराठीत हे काहीही नसताना ‘विसर्गसंधी’ हे नियम आणून पुस्तकी व्याकरणाने मराठीला क्लिष्ट व कठीण बनविण्याशिवाय काहीही वेगळे साध्य केलेले नाही. मराठीवर जरी नियम लादले तरीही मराठी भाषा त्याकडे दुर्लक्ष करूनच आजवर समाजातून वावरली. ‘शुद्धलेखन नियमावली’ सारखीच जर ‘शुद्धउच्चार नियमावली’ आणून ती व्याकरणकारांच्या सांगण्यावरून सरकारने समाजावर लादली असती तर? आज महाराष्ट्रातील मंत्री व उच्चस्थरीय व्यक्ती स्वतःच्या हाताने
विसर्गसंधी या नियमाबाबतचा एकमेव बिनतोड स्पष्ट व परखड निकष -
मराठीला विसर्गसंधी नियमांची मुळीच गरज नाही.
‘आम्हाला सरकारचे नियम पाळायला लागतात’, असे सांगत चुकीचे-पुस्तकी-व्याकरण शिक्षकांना शाळाशाळात शिकवायला लागत आहे. पालकांनाच नव्हे तर सर्व समाजाला सरकारच्या नियमांनी बनविलेले व्याकरणीय धोरण पाळायला भाग पडत आहे. त्यातून ‘चुकीच्या पुस्तकी व्याकरणामुळे खरे साधेसुधे व सोपे असलेले मराठी क्लिष्ट, कठीण बनले आहे’ आणि ‘इंग्रजीतील प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि अर्थ जरी शिकावा लागत असला तरी ती सोपी’ ठरत आहे. आता तरी सरकार जागे होणार का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? की अजूनही झोपेचे सोंग घेत राहणार आहे? आजवरच्या मराठीच्या अधोगतीला मराठीचे पुस्तकी व्याकरणकार जबाबदार ठरतात. हा अतिरेकीपणा ठरतो की क्रिमिनल गुन्हा? सरकारने अधिकृतपणे जे स्विकारले असेल तेच सर्वांना पाळावे लागते. सरकार जर म्हणत असेल की ते त्यांच्या क्षेत्राच्या बाहेरचे ठरते. याबाबतचा प्रस्ताव साहित्य-सम्मेलनाकडून यावा. पण गेल्या कित्येक साहित्यसम्मेलनातील मान्यवरांना हे सांगूनही हे शिचधनुष्य पेलायला कोणीही तयार झालेला नाही. समाजा तर्फेच यावर सरकार विरुद्ध कोर्टात अधिकृतपणे केस दाखल करायला कोणी पुढे येतील का? कोर्टात केस दाखल करून न्याय मिळवणे हे अभाग्य मराठीच्या नशिबी आले आहे असे समजायचे का?
मराठीच्या पुस्तकी व्याकरणातील पानापानात, वाक्यावाक्यात, शब्दाशब्दात केवळ संस्कृतचे पाणिनी वावरत आहेत. मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरता विचार करण्याचे आपल्याला केव्हा सुचणार आहे? मराठी नामशेष झाल्यावर की आत्ता?
‘मराठीतील ‘विसर्गसंधी’ ही संकल्पना नाही’, हा लेख 11, वाचा आणि तुमचे मत मांडा.
त्यासाठी ‘युनिकोड ते साऊंडकोड’ http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर अथवा ‘सर्वसमावेशक’ https://www.facebook.com/groups/togangal/ या फेसबुकवरच्या ग्रुपवर सामिल व्हा.
आपला, शुभानन गांगल  मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com

No comments:

Post a Comment