युनिकोड ते साऊंडकोड –
10
संस्कृत आणि मराठीची कुठेही
न जुळणारी कुंडली!
मराठी आणि संस्कृत भाषेत
साम्यखुणांपेक्षा भिन्नता प्रचंड, पराकोटीची आणि अस्मानी आहे. यात मराठी भाषा अतिशय
मुक्त, ओघवती, नैसर्गिक आणि शास्त्रीय तर संस्कृत बंदीस्त, कुपमंडीत आणि स्वतःपुरत्या
अनैसर्गिक नियमात गुंतलेली ठरते. हे येथे लिहीत असलेले विधान पूर्ण विचारान्ती आणि
संशोधनातून सिद्ध केल्यामुळे मांडत आहे. त्याबाबतचा थोडक्यात व आटोपशीर मांडणीतून आढावा
घेणे गरजेचे ठरते. आजवर संस्कृत भाषेचा मराठीवर झालेल्या अतिक्रमणामुळे मराठीला पुस्तकी-व्याकरणातून
बदलण्याचा प्रयत्न झाला. आज शाळांशाळांतून शिकवले जाणारे पुस्तकी-व्याकरण कसे धादांत
चुकीचे आहे हे यातून कळू लागेल. त्यात संस्कृतचा प्रादुर्भाव व्याकरणातून केला जाऊन
मराठीला बदलुन संस्कृतसारखे बनविण्याचा जणु घाट घातला गेला असेच म्हणावे लागते. कोणतीही
भाषा दुसर्या भाषेवर आक्रमण वा अत्याचार करत नाही. पण मराठी व्याकरणकारांनी संस्कृताचा
उदोऽऽउदो करत मराठीवर व्याकरणाच्या मार्गाने आक्रमण व अत्याचार घडवले आहेत.
ज्ञानेश्वरांनी मराठीला संस्कृतच्या जाचातून मुक्त केले आणि पुन्हा इंग्रजांच्या
काळात मराठी व्याकरणकारांनीच मराठीला संस्कृतचे गुलाम बनविण्यासाठी मराठीचे
व्याकरणच संस्कृतच्या ताब्यात दिले. मराठीची मराठीतच ‘तत्सम’ आणि ‘तत्भव’ अशी फाळणी केली. या सार्या इतिहासाला वाच्यता
देऊन मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरताच विचार करण्याचे ठरविल्याशिवाय मराठी
भाषा जगाला ‘युनिकोड ते साऊंडकोड’ या अतीभव्य क्षितीजापर्यंत पोचवू शकणार नाही. संस्कृत
भाषेला जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे पण याचा अर्थ संस्कृतला मराठीवर आक्रमण
व अत्याचार करायची परवानगी देणे नव्हे.
मराठी आणि संस्कृत भाषेत
साम्यखुणांपेक्षा भिन्नता प्रचंड, पराकोटीची आणि अस्मानी आहे, यासाठी आपण भाषेतील मोजक्या
आणि सर्वात महत्त्वाच्या बारा भागांचा विचार या लेखात करून घेणार आहोत. हा विचार आटोपशीर
स्वरूपात नोंदणी म्हणून येथे करत आहे कारण याबाबतच्या सविस्तर माहितीच्या संशोधनातील
शेकडो पानांचा मोठा ग्रंथ होईल.
1) निसर्ग-ध्वनीचा मागोवा –
मराठीने निसर्गात ध्वनी कसा
निर्माण होतो याचा मागोवा घेऊन, मराठीच्या भाषीक जडणघडणीचा अत्याधुनिक युगातील सायन्स
पध्दतीचा विचार शेकडो सालांपूर्वीच केलेला आढळतो. याबाबतीतला माझा स्फोट-ध्वनी कंप-ध्वनी
सिद्धांत (NS and
BS theory) भारतीय पातळीवरच्या एकतीसाव्या व्याकरणीय परिषदेत, डेक्कन
कॉलेज, पुणे येथे सादर केला. परिषदेच्या स्मरणीकेत तो प्रसिद्धही झाला. या सिद्धांतावर
मराठीने स्विकारलेले भाषीक धोरण अवलंबून आहे. संस्कृतला उमगलेला ‘स्फोट-ध्वनी’ अतिशय
प्राथमिक स्वरूपातील ठरतो. संस्कृतने स्विकारलेल्या वर्ण संकल्पनेला तो जोडता येत नाही.
जगातील कोणतीही भाषा तिने स्विकारलेल्या भाषीक ध्वनींपासून सुरवात करते पण मराठीला
त्याहूनही सुक्ष्मतेत जाऊन तेच भाषीक-ध्वनी का आणि कशासाठी मराठीने स्विकारले याची
कारणमिमांसा मांडता आलेली आहे. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’
याची अत्याधुनिक प्रचिती, परिचय, प्रत्यय, ओळख व जाणीव यातून करून देता येते.
उदाहरण – घंटेचा टोल आणि
त्यानंतरचा घुमणारा स्वर यातील ‘टोल’ आणि त्यानंतर अस्तित्वात येणारा ‘कंपीत ध्वनी’
म्हणजे मराठीचा ‘स्फोट-ध्वनी’ आणि ‘कंप-ध्वनी’ ठरतो. हा मराठीचा सिद्धांत कोणत्याही
मानवी भाषेला लागू पडतो.
2) स्वरांचा स्विकार –
‘उच्चारणे-ऐकणे’ या वर्तुळाकारी
प्रवासाचा अचूक मागोवा घेऊन ‘उच्चारातील’ आणि ‘ऐकू येण्यातील’ सुक्ष्म ध्वनींचा स्विकार
मराठीने केला आहे. संस्कृतला असा विचार मांडता आणि स्विकारता ही आलेला नाही.
संस्कृतने ‘ऋ, ॠ’ स्वर स्विकारून गद्य, पद्य, संगीत यातील आरोळी, आलाप आणि तान या
नैसर्गिक अविष्काराला संस्कृतने स्वतःच मर्यादा घातली आहे.
उदाहरण – संस्कृतच्या दृष्टीने
‘ए’ हा संयुक्त-स्वर ठरतो. मराठीने मात्र तो अचूकतेने ‘मूलभूत-स्वर’ म्हणून स्विकारलेला
आहे, कारण ‘ए’ स्वराचे दोन तुकडे पडत नाहीत आणि ‘ए’ स्वर श्वास टिकेपर्यंत ऐकून कोणत्याही
मानवाला तो सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंडीतपणेच ऐकू येतो. मराठीने ‘ऋ, ॠ’ या
चिन्हांचा स्विकार स्वर म्हणून केलेला नसून ‘खास-जोडाक्षर’ म्हणून केला आहे.
‘खास-जोडाक्षर’ म्हणजे ज्या जोडाक्षरांच्या चिन्हातून त्यात असणार्या व्यंजनांची
निश्चित ओळख होत नाही असे चिन्ह. मराठी समाजात ‘ऋषी, ऋण, ऋग्वेद’ यांचा उच्चार
‘रुषी, रूषी, हृषी’ होत असे. आता नव्या पिढीत त्यांचा उच्चार ‘र्हुषी, र्हूषी,
ह्रषी’ असा करण्याकडे अधिक कल असल्याचे लक्षात आले आहे. याचे कारण ‘हृदय’ मधला
‘हृ’चा उच्चार ‘र्हु’ उच्चाराशी जास्त जवळीक साधतो त्यामुळे ‘र्हु’ उच्चार
तरूणाईत जास्त लोकप्रिय ठरला आहे. ‘रु’ वा ‘रू’ यातून ‘ऋ’तील स्पष्ट ओळख पोचत
नाही. नव्या पिढीला म्युझिक (संगीत शब्दापेक्षा नव्या पिढीला हाच शब्द आवडतो)
आवडते आणि त्याला प्राप्त झालेली इंग्रजी छटा र्हिदम (Rhythm) शब्दातून अधिक चांगली
व्यक्त होते. इंग्रजीतील ‘Rhythm’ शब्दाचे उच्चारण इंग्रजी डिक्शनरीतून ‘riŦH́ əm’ (रिदम) असे जरी दिलेले असले तरी दृष्यपणातून स्पेलींगमध्ये दिसणारा ‘Rhy’ उच्चार तरूणाईतून ‘र्हु’
असा घडत आहे आणि त्याचा उच्चार पुढील पिढी ‘र्हिदम’ तसाच करत आहे. मराठी भाषा
ओघवती आहे. मराठीपेक्षा एका वेगळया भाषेतून (संस्कृत मधून) आलेल्या ‘ऋ’ चिन्हाचा
उच्चार आता दुसर्या परक्या भाषेतील (इंग्रजी तील) उच्चाराशी जोडला गेला तरी
त्याचा कोणताही वाईट परिणाम मराठीवर होणार नाही. मराठीतल्या ‘ऋ’ या खास-जोडाक्षराचा
उच्चार आता बदलून वेगळा होत आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे. जसे संस्कृतच्या ‘ज्ञ’
या जोडाक्षराचा संस्कृतमधला उच्चार ‘ज्+ञ्+अ’ होतो, हिन्दीत ‘ज्ञ’ चा उच्चार ‘ग्+य्’ आणि मराठीत ‘ज्ञ’ चा उच्चार ‘द्+न्+य्’ होतो. तसेच
आत्ताच्या मराठीत ‘ऋ’चा उच्चार ‘रु, र्हु’ असे होत आहेत. यातून मराठी भाषा
ओघवतेपणात किती सक्षम आहे, हेच कळते. दुसर्या भाषेतील उच्चार मराठी भाषा
स्वतःच्या मताप्रमाणेच घेते हेही कळते. इंग्रजीत ‘a,e,i,o,u’ ही चिन्हे स्वर (Vowels) म्हणून ओळखली जातात.
पण ‘about’ मधल्या ‘a’ चा, ‘taken’ मधल्या ‘’e चा, ‘pencil’ मधल्या ‘i’ चा, ‘come’ मधल्या ‘o’ चा, ‘but’ मधल्या ‘u’ चा उच्चार ‘अ’ होतो.
म्हणजेच इंग्रजीतील ‘a,e,i,o,u’ या स्वर (Vowels) यांचा उच्चार समान होण्याची सोय इंग्रजीत आहे. मग
सांगा, इंग्रजीला ‘स्वर’ याची व्याख्या किती कळली आहे? असे म्हणता येईल?. इंग्रजी
डिक्शनरीत मात्र ‘अ’ उच्चार ‘u’ या ‘Symbol’ चिन्हाने ‘pronunciation key’ मधून दर्शविलेला असतो.
म्हणजेच इंग्रजीला सामान्यपणे ‘u’ मधून ‘अ’ उच्चार कळतो असे म्हणता येते. पण आपण महाराष्ट्रात इंग्रजी
वापरताना ‘Gajanan’ (गजानन), ‘Karamarkar’ (करमरकर) अशा
व्यक्तींची नावे आणि ‘Navalanagar’ (नवलनगर), ‘Pavanagad’ (पवनगड) अशी शहरांची नावे लिहीतानाही ‘अ’
उच्चारासाठी बिनबोभाट सार्वजनिकपणे ‘a’ चा वापर करतो! मराठीने इंग्रजांच्या काळी ‘अॅ, ऑ’
स्विकारताना मराठी समाजाला, मराठी वा इंग्रजीच्या व्याकरणकारांची यासाठीची परवानगी
घ्यावीशी कधीतरी वाटली का? ! ! गुजराती आणि हिन्दी भाषांना ते अजूनही नीटपणे
स्विकारता आले नाहीत. यातूनच प्रत्येक भाषा तिला योग्य वाटेल तेच करते हे नक्की
लक्षात येते आणि मराठीची अनेक दृष्टींनी योग्य ठरणारी शास्त्रीयता कळते.
3) व्यंजनांचा स्विकार –
मराठीने आघातातून निर्माण
होणार्या आणि क्षणभर टिकणार्या व्यंजनाच्या वास्तव्यातही सुरवातीपासून शेवटपर्यंत
एकच अखंडीतपणेच ऐकू येणार्या उच्चार-ध्वनी एककाला व्यंजन मानले आहे. संस्कृतला एवढे
सुक्ष्म ध्वनी ज्ञान प्राप्त झालेले नाही.
उदाहरण – संस्कृतच्या दृष्टीने
‘चाणक्य’ मधले ‘च’ हे व्यंजन ठरते. संस्कृतमध्ये ‘चमचा’ मधले ‘च’ व्यंजन नाही. ‘चमचा’
मधले ‘च’ व्यंजन मराठीत आहे. मराठीच्या ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’ जाणार्या ध्वनी-विज्ञान
प्रवाहानुसार, ‘चाणक्य’ मधले ‘च’ हे ‘च्यायला’ शब्दातून व्यक्त होणार्या ‘च्य’ सारखे
जोडाक्षर ठरते. मराठीत चमचा, जसा, जहाज, पडझड, झबले, झाडू, झाकण, झडप, झपट, असे
‘च, ज, झ’ यांचे जे उच्चार होतात ती व्यंजने मराठीने स्विकारली आहेत. ‘च्यहा,
ज्यास्त’ असे शब्द मराठीत जरी ‘चहा, जास्त’ असे लिहीले जात असले तरी त्यांचा
उच्चार ‘च्य’ व ‘ज्य’ असाच होतो. हा मराठीचा दोष नसून मराठीच्या व्याकरणकारांनी
स्विकारलेल्या संस्कृतप्रचूर धोरणाचा दोष ठरतो. मला परदेशातील मराठी मंडळाचा बर्याच
वर्षांपुर्वी फोन आला होता. ‘‘‘आम्ही मराठी नाटक करत आहोत. भुमिकेतील संवाद
पात्रांना लिहून दिले आहेत पण त्यांना मराठी वाचनाची मुळीच सवय नाही. त्यांना ‘चव,
जहाज’ यातील ‘च’ व ‘ज’ चे उच्चार येतात पण लेखनातून न बघितलेल्या शब्दांच्या उच्चारात
गोंधळ होतो. ते ‘जसा’चा उच्चार ‘ज्यसा’, ‘चमचा’चा उच्चार ‘च्यमच्या’ करतात. काय
करावे?’’’. मी त्यांना सर्व भुमिकेतील संवाद त्यातील उच्चारानुसार ‘च्यहा, चव,
जरा, ज्यास्त’ असे लिहून द्या, असे सांगितले. नंतर त्यांचा पुन्हा फोन आला आणि
नाटक व्यवस्थीत पार पडल्याचे कळले. उच्चारानुसार मराठीतून लेखन करण्याचा हा मार्ग
मराठमोळा ठरत असल्याने तो स्विकारायला हवा असे मला वाटते. कमीतकमी ‘चहा’ शब्द
‘च्यहा’ वा ‘जास्त’ शब्द ‘ज्यास्त’ लिहीला तर चुकीचा मानला जाऊ नये कारण
दोघांतूनही शब्दाचा अर्थ बदलत नाही.
4) अक्षरांचा स्विकार –
मराठीने निसर्गातून जसा ‘स्फोट-ध्वनी’
आणि ‘कंप-ध्वनी’ साकारतो अगदी तशीच ‘भाषा-अक्षर-पद्धत’ स्विकारली आहे. निसर्गात आधी
‘स्फोट-ध्वनी’ आणि त्यानंतर ‘कंप-ध्वनी’ साकारतो. कोणताही निर्माण झालेला ध्वनी हा
ध्वनी-गोलातूनच वाहतो. कोणत्याही ध्वनी-गोलाचा विस्तार होताना त्यातील बिनीला, म्हणजे
सर्वात पुढे असणारा ध्वनी (Impinging Sound) हा ‘स्फोट-ध्वनी’च असतो. त्यामागोमाग कंपनांतून निर्माण झालेला
‘कंप-ध्वनी’ वहातो. मराठीने व्यंजनाशी निगडीत असलेले अक्षर केवळ ‘व्यंजन+स्वर’ असा रितीने,
म्हणजे आधी ‘व्यंजन’ आणि त्यानंतर त्याला ‘स्वर’ जोडून स्विकारले आहे आणि म्हणून
मराठी भाषेतील अक्षराची बाराखडी या अत्यंत विस्मयकारी, सहजसोप्या, विलक्षण अनोख्या
स्वरूपातून शिकवता येते. संस्कृतला हे ध्वनी-शास्त्र जाणून त्याचा वापर भाषेतून
करता आलेला नाही. ‘व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नाही’ हा निसर्गाने
मानवाला नेमून दिलेला नियम आहे. या निसर्ग-नियमाचा वापर आणि उपयोग, संस्कृत भाषेला
निसर्गातील ध्वनीची नैसर्गिक वृत्ती जोपासण्यासाठी करून घेता आला नाही. ध्वनीची
नैसर्गिक वृत्ती सोडून, मानवी उच्चारातील दोषांनाच प्रमाण मानून, संस्कृतने ‘व्यंजन+स्वर’ याच्या जोडीला ‘स्वर+व्यंजन’ आणि ‘व्यंजन+स्वर+व्यंजन’ अशा स्वरूपालाही
अक्षर मानले आहे. निसर्गात कोणताही ध्वनी ‘कंप-ध्वनी+स्फोट-ध्वनी’ वा
‘स्फोट-ध्वनी+कंप-ध्वनी+स्फोट-ध्वनी’ असा
निर्माण होत नाही. निसर्गाशी तादात्म्य पाळल्याने नव्या युगातील संगणकीय ‘बायनरी’,
म्हणजे द्विदल पद्धतीचा वापर मराठी भाषेला ‘ध्वनी, कागद आणि संगणक’ या तिन्ही
माध्यमातून अचूकतेने करता येतो. संस्कृतला ते कदापी शक्य नाही. ‘कविता-आस्वाद आणि
गझल-आस्वाद’ या जगावेगळ्या सॉफ्टवेअर मधून 2005 साली जगातील कोणत्याही भाषेतील
अनंत कविता आणि अनंत गझल यातील लयतालविचारांची गणिते संगणक उलगडून दाखवतो, हे
भारतीय पातळीवर म्हैसूर येथे केंद्र-सरकारच्या अधिपत्याखाली सादर केले. या
सॉफ्टवेअर मध्ये मराठीत मजकूर टाईप केला की त्यातील कविता विभागातून 1171 वृत्ते,
591 जाती, 83 छंद आणि गझल विभागात सर्व 19 सालीम-छंद, 255 उपछंद संगणक नावानिशी
ओळखून दाखवतो आणि त्याच्या रिपोर्टची प्रिंटही घेता येते. जगातील इतर भाषांतील
काव्यामधला लयतालविचार केवळ मराठीचा फिल्टर लावून यातून तपासता येतो. अशा पस्तीस
वर्षांच्या संशोधनातून मानवी संस्कृतीतील साडेतीन हजार वर्षांतील कोणत्याही
काव्याचा आस्वाद घेऊ शकणार्या सॉफ्टवेअरच्या निर्मितीतून निश्चितपणे सिद्ध झालेले
विचार येथे मांडत आहे.
उदाहरण – स्वर हे
तटस्थपणे उच्चारता येतात म्हणून ते अक्षर ठरतात. मराठीत बारा स्वरांची बाराखडी
आहे. तसेच त्याच बारा स्वरांची चिन्हे चौतीस व्यंजनांना वापरून मराठीत ‘व्यंजन+स्वर’ अशा रितीने
बाराखड्या लिहील्या जातात. सर्व मराठी अक्षरे शिकविण्याची सर्वोत्तम सोय मराठीतून
अत्यंत विस्मयकारी, सहजसोप्या, विलक्षण आणि अनोख्या स्वरूपातून प्राप्त होते.
संस्कृतमध्ये ‘स्वर+व्यंजन’ (अच्, उत्) आणि ‘व्यंजन+स्वर+व्यंजन’ (सत्, वाक्) अशी अक्षरेही आहेत. मराठीत हे असले प्रकार नाहीत.
5) शब्दांचा स्विकार –
संस्कृतला पाणिनींनी
स्विकारलेल्या 2115 धातुंमधूनच, पद (शब्द) निर्माण करता येतात. संस्कृतमध्ये
धातुंचे दहा गण (समुह) आहेत. प्रत्येक गणाचे विकरण (खुण) ठरलेले आहे. हे विकरण
धातुला लागुन धातुचे ‘अंग’ तयार होते. ह्या ‘अंगा’ला प्रत्यय लावून क्रियापदे
बनतात. तसेच धातुंपासुन नाम, वीशेषणे, अव्यये बनतात. धातुचा उपयोग वाक्यात करता
येत नाही. कोणताही नवा धातु स्विकारण्याची परवानगी अधिकृतपणे संस्कृतला मिळत नाही.
मराठीला कोणताही नवा शब्द स्विकारण्याची पूर्णपणे अधिकृत मुभा मिळते. तसेच जुन्या
शब्दांना नवा अर्थही सहजतेने प्रदान करता येतो. संस्कृतला मात्र परंपरेतील
शब्दांना त्याच जुन्या वळणांतून बळजबरीने वापरावे, उगाळत बसावे, लागते.
अक्षरांच्या संधी नियमात अडकलेल्या संस्कृतला बरेच शब्द मुळीच स्विकारता येत
नाहीत. संस्कृतला मराठीतील ‘आई’ शब्द स्विकारता येत नाही कारण ‘‘‘अ किंवा आ + इ किंवा ई = ए’’’ असा स्वर-संधी नियम
आहे. म्हणजे ‘आई’ हा शब्द संस्कृतला ‘ए’ असा लिहावा लागेल, मग बसा संधी नियमातून
त्याची फोड करत. संस्कृतला कधी तरी ‘आई’ सापडेल का?
उदाहरण – मराठीत रेल्वे,
बिल्डींग, रोड, प्लेन असे अनेक शब्द आले व स्थिरावले आहेत. संस्कृतला ते शब्द
अधिकृतपणे स्विकारता येणार नाहीत कारण त्यासाठीचा धातुच संस्कृतमध्ये नसल्याने तो
शब्द ‘चालवायचा कसा’ ते व्याकरणात घालून निश्चित करण्याचा अधिकार कोणालाही घेता
येत नाही. ‘माल’ म्हणजे ‘वस्तू’ या शब्दाला कॉलेज तरूण-तरूणींमध्ये वेगळाच
तरूणाईचा अर्थ मिळालेला आहे. आजी-आजोबांच्या काळातील सौंदर्यवती, आई-बाबांच्या
काळात सुंदरी, तर आजच्या तरूणाईत कंडा, सेक्सी शब्दातून व्यक्त होत आहे. कॉलेजात
जाणारा नातू जर आजोबांना म्हणाला, ‘आजोबा आज मला सौंदर्यवती भेटली’ तर आजोबांना ‘नातवाची
तब्येत ठिक आहे ना?’ असेच चटकन वाटेल. नव्यापिढीने नव्यापिढीतील शब्द वापरावेत हे
आजी-आजोबाही सहजतेने मान्य करतात. हे आहे मराठीचे अखंड अबाधित राहणारे ओघवते
साम्राज्य! संस्कृत ही कुपमंडीत व बंदिस्त तर मराठी ही अस्मानी क्षितिजे गाठणारी
ठरते.
6) अक्षरांच्या संधी –
संस्कृत मध्ये संधी
नियमांचा सुळसूळाट आहे. स्वर-संधी, व्यंजन-संधी, विसर्ग-संधी या नियमांनी संस्कृत
पोखरलेले आहे. बघावे तिथे संधी केली जाते. ‘शब्द हे अर्थ स्वरूप असून सर्व जग
व्यापते’ हे मराठीसाठी योग्य ठरते पण संस्कृतसाठी ‘संधी नियमात अडकलेल्या
शब्दांच्या गुंतवळ्याला सोडवता सोडवता नाकी नऊ येतात’ असेच म्हणावे लागते. यातून
शब्दातील अर्थ तटस्थपणे सामोरा येण्याला जणू मज्जाव केला जातो. मराठी भाषा शब्दांना
स्विकारते ‘धातु’तून बनवत नाही. विज्ञानाने अणु-रेणू मांडले. ते सर्व निसर्गासाठी
समान धोरण घेऊन सामोरे येतात. ‘धातु’ शब्दाला जरी असा वास देण्याचा प्रयत्न
संस्कृतने केला तरी हे स्वघोषीत ‘धातु’ केवळ संस्कृतपुरतेच संकूचीत, मर्यादीत,
कुपमंडीत ठरतात. केवळ 2115 धातुंतून असंख्य शब्द निर्माण व्हावेत आणि जास्तीतजास्त
अर्थांना शब्दांकीत करता यावे यासाठी ‘अक्षरांचे संधी नियम’ आखलेले दिसतात. पण
बेडकीला फुगून फुगून किती फुगता येईल?, होय अगदी तोच प्रकार संस्कृतच्या बाबतीत
घडला आहे. अडीच हजार वर्षांपुर्वीच्या मानवी गरजांसाठी त्यावेळी संस्कृत भाषा
योग्यता देणारे ठरत असेल पण आता आधुनिक युगात ती कुचकामी ठरते. जर संस्कृत तेवढीच
गरजेची, अत्यावश्यक, उपयोगाची ठरत असती तर भारतभर सर्व ठिकाणी केवळ, निव्वळ
संस्कृतच सामान्य संवादातून वापरली गेली असती. केवळ पापभिरु वृत्तींना आवाहन करत
पुजाअर्चा, देवळे, वेद-उपनिषदे यांचा अभ्यास, आध्यात्माबाबतची आजवरची संस्कृती असा
भुतकाळातील परीसराशीच केवळ संस्कृतला संपर्क ठेवता आला आहे. शिवाय ‘सर्व ज्ञान
संस्कृतमधल्या वेदात व उपनिषदात आहे’, ‘संस्कृत देवभाषा आहे’ अशा जाहिरातींतून
भारतातील इतर भाषांना गौण ठरविण्यात संस्कृत यशस्वी झाली आणि आधुनिक शोध व संशोधन
भारतातून निर्माण न होता युरोपातून लागले. जर भाषा म्हणून भारतीय भाषा श्रेष्ठ
ठरतात, बुद्धीतही भारतीय व्यक्ति कुठेही कमी पडत नाहीत तर मग हे असे का घडले? याचा
सारासार विचार करता, ‘नको तेवढी संस्कृतची आपुलकी, भिती, दडपण आणि दहशत’ हेच कारण
सामोरे येते. शास्त्रीयतेत संस्कृत सर्वोत्कृष्ट आहे असा उगाचच गैरसमज भारतात
निर्माण झाला आहे. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणी प्रमाणे परदेशी भाषांना
संस्कृत चांगली वाटणे स्वभाविक आहे. पण आता संस्कृतपेक्षाही बरीच वरचढ, अत्यंत
नैसर्गिक आणि शास्त्रीय भाषा मराठी आहे हे मराठीनेच सांगण्याची वेळ आली आहे. कावळ्याच्या
घरट्यातील कोकीळेने आता आपल्या सुरात गावे, बदकांच्या कळपातील राजहंसाने आता मोठे
होत दिमाखाने मिरवावे, असे मला वाटते.
उदाहरण – (1) व्यंजनातील
संधी (संस्कृतच्या ‘चाणक्य’ मधला ‘च’ उच्चार = मराठीतला ‘च्यायला’ मधला ‘च्य’ उच्चार), (2) स्वरातील संधी
(अ किंवा आ + इ किंवा ई = ए असे संस्कृतचे धोरण
तर मराठीत ‘ए’ हा अखंड अलिप्त व एकसंध स्वर ठरतो), (3) शब्दात संधी (संस्कृतने
ईश्वर+इच्छा = ईश्वरेच्छा असे शब्द
स्विकारते, मराठी मात्र सामान्यपणे ‘ईश्वराची इच्छा’ वा ‘ईश्वरीइच्छा’ म्हणते), (4)
दोन शब्दात संधी (‘मुलगी इश्श म्हणाली’ यातील ‘मुलगी+इश्श’ याचे संस्कृतच्या
‘‘इ किंवा ई + इ किंवा ई खेरीज
कोणताही स्वर आल्यास ‘य + तो-स्वर’ अशी संधी होते’’ या संधी नियमानुसार ‘मुलग्यीश्श’ होते. म्हणजे ते
वाक्य ‘मुलग्यीश्श म्हणाली’ असे होते. अशा संधीचे वर्णन करायचे मराठीत करायचे तर
‘काय कटकट आहे’ असेच म्हणावे लागेल. ‘इश्श’ शब्दातला अर्थच इथे चुरगाळला जातो,
अपघात होऊन चक्काचूर झालेला वाटतो. अक्षरांच्या ‘संधी’ मुळे अगदी तसेच सर्व ठिकाणी
घडते पण ‘आलीया भोगासी असावे सादर’ असे म्हणण्याशिवाय संस्कृतही काही करू शकणार
नाही! मराठीतील प्रत्येक अक्षर स्वतःचे अस्तित्व तसे कायम टिकवते आणि दिमाखाने
वावरण्याला मुभा देते.
7) शब्दांच्या
व्युत्पत्तीचे धोरण –
संस्कृत मधील प्रत्येक
शब्द हा केवळ, फक्त आणि निव्वळ धातु-विकरण-गण या चाचणीतूनच बनत असल्याने कोणत्याही
शब्दाची ‘व्युत्पत्ती’ शोधत बसायची ‘आपत्ती’ संस्कृतवर येऊन ठेपते. मराठीत शब्द ही
संकल्पना अर्थाचा प्रस्ताव घेऊन येते आणि शब्द स्थिरावतो. मराठी शब्दाला ‘संधिवात’
झालेला नसतो.
उदाहरण – अचूक व परखडपणे अर्थ सामोरा यावा यासाठी
कमी-दर्जाची ठरत असली तरी पुढील उदाहरणे देत आहे. मराठीत ‘कामसुत्र’ या शब्दाला
नक्की अर्थ मिळाला आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती आपल्या लेखनात, ‘इंजिनिअरींगच्या
आणि डॉक्टरकीच्या अभ्यासातील कामसुत्र वेगळे असते’ असा वाक्यप्रयोग करताना दिसत
नाही! ‘कामसुत्र’ या शब्दाला जरी मराठीत अर्थ मिळालेला असला तरी यातील ‘काम’
शब्दाचा विवक्षीत अर्थ सामान्य मराठी माणसाला कळलेला असतोच असे नाही. म्हणजे ‘काम’
शब्दाचा तसा अर्थ माहीत नसतानाही मराठी भाषा ‘कामसुत्र’ शब्दाला सुयोग्य अर्थ
प्रदान करू शकते व योग्यपणे वापरते. म्हणजे त्यातल्या शब्दांची व्युत्पत्ती शोधायची
गरज मराठीला नसते. मराठीत ‘रमेशा’ हे मुलाचे नाव असू शकते. मराठीला जर
संस्कृतसारखा ‘संधीवात’ झाला असता तर ‘रमा’ आणि ‘ईषा’ या दोन स्त्रिया एकत्र आल्या
की ‘रमेशा’ हा पुरूष बनतो, असे वाटले असते! महाराष्ट्रात घरोघरी स्त्रिया परकर
वापरतात. त्यांना जर ‘पर (दुसर्याचा) + कर (हात) = दुसर्याचा हात’ अशी फोड सांगितलीत तर ‘परकर वापरण्यावर’
न्यायालयातून बंदी आणावी लागेल! शब्दाच्या व्युत्पत्तीची आपत्ती मराठीत असती तर
‘अनवाणी’ शब्दाचा अर्थ ‘ज्याला बोलता येत नाही तो’ असा झाला असता! नवीन भाषांतील
मराठीत आलेल्या शब्दांनाही ‘व्युत्पत्तीची आपत्ती’ भोगावी लागली असती, ‘आमलेट’
म्हणजे ‘उशीरा आलेला आंबा’ ठरला असता! आता असे उरलेले असंख्य शब्द तुम्हीच मांडा!
8) वाक्यातील अनेक
शब्दांच्या संधी –
वाक्यातील शब्दांची संधी
करणे हा संस्कृतचा सामान्य नियम आहे, मराठीतील एक शब्द दुसर्या शब्दापासून वेगळाच
लिहीला जातो कारण तरच तो शब्द ठरतो. संस्कृतच्या व्याकरणाच्या प्रत्येक पुस्तकात ‘संधी’
या संकल्पनेबाबत पुढील उल्लेख असतो, ‘‘‘संहितैकपदे नित्या नित्या धातूपसर्गयोः ।
नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षामपेक्षते ।।’’’. यामुळे वाक्यातील शब्दांच्या
संधी करून वाक्य बनवणे संस्कृतला त्याज्य नसते. दोन शब्दांमध्ये विराम न ठेवता ते
जोडून वाक्याला किचकट बनविण्यापलीकडे यातून काहीही साध्य होत नाही हे संस्कृतला का
कळले नाही? संस्कृत मध्ये शब्दाला प्रदान केलेला आणि शब्दकोषातून मांडलेला भाषीक
अर्थ, तो ठराविक शब्द वाक्यातून वापरताना अर्थासकट तसाच राहतो. पण मराठीत असे घडत
नाही. ‘वाट लावली’ आणि ‘वाट दाखवली’ अशा वाक्य रचनांतून ‘वाट’ शब्दाचीच ‘वाट’
लागते! संस्कृत मध्ये वाक्यातील शब्दांना नेमका, शेलकी, ठरावीक आणि तेवढाच अर्थ
असल्यामुळे संवादातून विचार आणि भावनांच्या विविध छटा शब्दातून प्रदर्शित करण्यावर
मर्यादा येतात. मराठीने मुक्त स्वैरपणे शब्दांच्या अर्थांना वावरण्याची संधी
वाक्यातून उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे मनसोक्त, स्वच्छंदी, स्वैरपणे मराठी वाक्य
अर्थांच्या विविध छटांतून वावरते आणि संवादातून मनामनातला अभिप्रेत अर्थ गाठायला
मदत करते.
उदाहरण – ‘निर्भरनिद्रासुखिन्’ म्हणजे ‘गाढ झोपेचे सुख
घेणारा’ असा अर्थ होतो. ‘चोरस्तस्माद्धनिकादूद्रव्यमपाहरत् ।’ या वाक्याचा अर्थ तर
सोडाच पण साधा त्याचा उच्चार नीट करता येतो का? ते तुमच्या मित्र-मैत्रिणींना
विचारा. दर महिन्याच्या एक तारखेला या वाक्याचा अर्थ शोधलास का? हे त्यांना
विचारायला विसरू नका. हे असे आहे संस्कृत! या उलट मराठी ठरते साधेसोपे सहजसुलभ.
9) लिंगभेदाचा स्विकार –
संस्कृतने ‘अ’ स्वराने शेवट
होणारे नाव पुरूषी आणि ‘आ’ स्वराने शेवट होणारे नाव स्त्री ठरवले आहे. मराठीत असले
कोणतेही अनैसर्गिक नियम नाहीत. मराठीत ‘गोविंदा, रामा, मिलींदा, रमेशा, वशा, . .’ नावे
पुरूषी ठरतात. संस्कृतला हे अमान्य आहे. मराठी मुक्त ओघवती भाषा आहे. मराठीला
कोणताही नवा शब्द पुरूषी म्हणून स्विकारता येतो. शिरीन, काजल, गुलाब, ही
संस्कृतच्या दृष्टीने पुरुषांची नावे ठरतात. संस्कृतचे हे धोरण पूर्णपणे अनैसर्गिक
म्हणावेच लागते.
उदाहरण – प्रसिद्ध
पैलवानाचे ‘रंधावा’ हे संस्कृतच्या दृष्टीने स्त्रीचे नाव ठरते! तसेच संस्कृतमध्ये
‘गोविंदा, रामा, मिलींदा, . .’ नावे स्त्रियांची ठरतात. मराठीत शब्दाचा शेवट कोणत्याही स्वराने झाला तरी
त्या शब्दाला कोणतेही लिंग प्रदान करता येते. तुम्हीच सांगा निसर्गाने मानवी
भाषेसाठी असे बंधन घातले आहे का? म्हणजेच मराठी संस्कृतपेक्षा सर्वसमावेशक ठरते
ना?
10) वचनभेदांचा स्विकार –
संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन
आणि बहूवचन आहे. संस्कृतचे सर्व शब्द याप्रमाणे चालतात. मराठीत केवळ एकवचन आणि अनेकवचन
अशी दोन वचने आहेत. प्रत्येक शब्दांना द्विवचनी रूप देऊन संस्कृत भाषेतून शब्द
‘चालवले’ जातात व तसेच वापरावे लागतात. शब्दांना द्विवचनी रूप न देताही ते भाषेतून
व्यक्त करता येते. संवाद हा मनातल्या मनात स्वतःशी वा इतरांशी साधता येतो. या इतर
शब्दात एका व्यक्तिपासून अनेक व्यक्तिंचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे तुला,
तुम्हाला अशी सर्वनामे वापरून मराठी सहजपणे आणि अचूकतेने भाषेतील व्यवहार
सांभाळते. संस्कृतने मात्र द्विवचनाचा फाफटपसारा उगाचच घातला आहे आणि स्वतःला
क्लिष्ट करून घेतले आहे. निसर्गाने वचनांबाबत सहजपणे जाणवता येणारे धोरण आखले आहे,
त्याला ‘जाती आणि व्यक्ती’ असे नाव देता येते. ‘वचन’ या निसर्गाने मानवावर
लादलेल्या वृत्तीची जोपासना भाषेतून करताना सर्वांच्या मनामनातील स्वाभाविक
अर्थाला पुर्णत्व देणे मराठीने स्विकारलेल्या ‘एकवचन आणि अनेकवचन’ या सोप्या पद्धतीतून
सहजपणे साकारते.
उदाहरण – पृथ्वी ही
‘जाती’ आणि त्यातील आशिया, युरोप, आफ्रिका, आस्ट्रेलिया ‘व्यक्ती’ ठरतात. त्यातील
आशिया ही ‘जाती’ आणि भारत, बांगला देश, सिलोन या ‘व्यक्ती’ ठरतात. आता भारत ही
‘जाती’ आणि महाराष्ट्र, गुजरात, केरळ या व्यक्ती ठरतात. मग महाराष्ट्र हि ‘जाती’
आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण या व्यक्ती ठरतात. संस्कृतच्या ‘एकवचन, द्विवचन आणि बहूवचन’
या तीन वचनांपैकी ‘द्विवचन आणि बहूवचन’ हे मराठीच्या केवळ एकाच ‘अनेकवचन’ यात
समाविष्ट होतात आणि सर्व मानवी संवादांना अभिप्रेत अर्थापर्यंत नेऊन सोडतात. येथे
मला ‘सर न्युटन’ बाबतची गोष्ट नेहमी आठवते. ‘‘‘विद्वान सर न्युटनला त्याची मांजर
सारखी दारात येऊन दार उघडायला लावत असे. दार उघडल्यावर मांजर तिच्या पिल्लांसह आत
येत असे. संशोधनात यातून अडथळा येऊ नये म्हणून ‘सर न्युटन’ने भिंतीला दोन भोके
पाडली, एक मोठे भोक (मांजरीसाठी) आणि दुसरे छोटे भोक (पिल्लांसाठी). जेव्हा त्याला
दिसले की मांजरी मागोमाग तिची पिल्लेही त्याच मोठ्या भोकातून आत शिरू शकतात,
तेव्हा त्याला स्वतःचीच कीव आली.’’’ मराठीच्या ‘अनेकवचनात’, संस्कृतच्या ‘बहूवचना’ची
मांजर तिच्या छोट्या ‘द्विवचन’ भावंडासह सहज भाषेत शिरकाव घेऊ शकते! होय ना?
11) संगीतातील ध्वनीचा
स्विकार –
अनुस्वार म्हणजे नाकातून
होणारा उच्चार होय. सगळेच उच्चार नाकातून काढणार्या कोकणी व्यक्तींनी अक्षरांवर
दिलेले अनुस्वार, त्यांना आणि इतरांना वेगळेपणातून कळतील का? असा प्रश्न निर्माण
होतो. तसेच भाषेतल्या ‘गद्यातील अक्षर उच्चारांना’ आधीच सुरांतून उच्चारून त्यांना
‘विवक्षीत गद्यातील अर्थ’ प्रदान केला असेल तर त्या अक्षरांचा उच्चार भाषेच्या
संगीतात आणि संगीतातील सप्तकातून सादर होणार्या भिन्न रागिण्या आणि श्रृतींच्या
कल्पकतेत किती ढवळाढवळ करतील? असा प्रश्न निर्माण होतो. मराठीने अक्षराच्या
उच्चाराला फ्रिक्वेन्सीची जोड दिलेली नाही. संस्कृतने मात्र शब्दातील अक्षरांतून
वापरल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सीला भाषीक गद्य-स्वरूपी अर्थ प्रदान केला आहे.
उदाहरण – संस्कृतने उदात्त
(High pitch), अनुदात्त (Low pitch) आणि स्वरीता (Falling pitch) असेही फ्रिक्वेन्सीवर आधारलेले
शब्दातल्या अक्षरांचे उच्चार सुद्धा स्विकारले आहेत. ‘इंद्रशत्रु’ हा शब्द जर
अन्तोदात्त वापरला तर तो तत्पुरुष समास होऊन त्याचा अर्थ ‘इन्द्राला मारणारा’ असा
होतो. पण तोच ‘इंद्रशत्रु’ शब्द जर आद्युदात्त वापरला तर तो बहुव्रीही समास होऊन
त्याचा अर्थ ‘इन्द्र ज्याला मारणार आहे’ असा होतो. अर्थात मराठीच्याच काय जगातील
इतर कोणत्याही भाषेच्या आकलना पलीकडील क्लिष्ट व किचकट आहे. पण हे संस्कृत मध्ये
आहे, त्याला कोण काय करणार? ‘दोन किंवा जास्त शब्द एकत्र जोडून जो शब्द तयार होतो
त्याला संस्कृत भाषेच्या व्याकरणात महत्त्वाचे स्थान असून त्याला ‘समास’ म्हणतात.
संस्कृत मध्ये द्वन्द्व, ततपुरुष, बहुव्रीहि आणि अव्ययीभाव असे महत्त्वाचे चार भाग
पडतात. वरील ‘इंद्रशत्रु’ शब्द हा अशा संस्कृतने स्वतःपुरत्या निर्माण केलेल्या
विचित्र पद्धतीचा गुलाम ठरतो. याची खरच गरज भाषेला असते का? मराठीने गद्यासाठी
वापरल्या जाणार्या शब्दातील अक्षरांना फ्रिक्वेन्सीची जोड देऊन अर्थाशी त्याचा
संबंध जोडलेला नाही. त्यामुळे मराठी अक्षरांना कोणतीही फ्रिक्वेन्सी जोडून त्याचा
संगीतात मनसोक्त मनमुराद वापर करून आनंद मिळवता येतो.
12) गद्य आणि पद्य यातील
ध्वनीचा स्विकार –
मराठी व्यंजनांचा उच्चार
क्षणभर टिकतो आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंडीतपणे केवळ एकच ध्वनी ऐकू येतो.
यातील ‘क्षणभर टिकणे’ ही जर व्यंजनाची ओळख ठरत असती तर सर्व व्यंजनांचे उच्चार
समान ठरले असते! व्यंजनांची ओळख उच्चारातील वेळेवर अवलंबून नसते. तसेच मराठी
स्वरांचा उच्चार श्वास टिकेपर्यंत टिकतो. यातील ‘श्वास टिकेपर्यंत’ ही जर स्वराची
ओळख ठरत असती तर सर्व स्वरांचे उच्चार समान ठरले असते! स्वरांची ओळख उच्चारातील
वेळेवर अवलंबून नसते. यासाठी मराठीने अक्षरांची केवळ ओळख दाखविणार्याच अक्षरांचा
समावेश गद्यासाठी वापरल्या जाणार्या मोडीलिपीत केला आणि शेकडो वर्षे
परिणामकारकरित्या वापरला. मराठीने त्यावेळी गद्यासाठी केवळ ‘अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ,
औ’ एवढेच आठ स्वर वापरले. इंग्रजांच्या काळापासून त्यात ‘अॅ, ऑ’ स्वरांची भर पडली.
मोडीलिपीत ‘ई’ आणि ‘ऊ’ स्वर नव्हते. मराठीने गद्याचा प्रवास ‘ई’ आणि ‘ऊ’ या
स्वरांशिवाय अतिशय यशस्वीपणे केला. जेव्हा 1950 साली खेर मंत्रीमंडळाने मोडीलिपी
मोडीत काढून देवनागरीचा स्विकार केला तेव्हा मराठी गद्यातून देवनागरीची कोणती
चिन्हे वापरली जावी हा विचारच केला गेला नाही. संस्कृत भाषेने गद्य आणि पद्य या
दोन्ही ठिकाणी ‘इ, ई, उ, ऊ’ वापरले तसेच मराठीवर वापरण्याची सक्ती व्याकरणकारांनी
केली. त्यासाठी ‘संस्कृतचे बरेच शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत’ अशी पुस्ती
जोडली. जेव्हा मराठी भाषा शेकडो वर्षे मोडीलिपी वापरत होती तेव्हा तिला शुद्धलेखन
नियमावलीची गरज भासली नाही कारण त्यात ‘ई’ आणि ‘ऊ’ नव्हते. संस्कृतप्रमाणेच
मराठीवर ‘ई’ आणि ‘ऊ’ स्वर गद्यातून वापरण्याची सक्ती केल्याने शुद्धलेखन
नियमावलीचा जन्म झाला. शुद्धलेखन नियमावलीची सुरवातच मुळी, ‘अनुस्वार, र्हस्व व
दीर्घ यांच्या व्यवस्थेलाच स्थूलमानाने शुद्धलेखन हा शब्द योजला जातो’ अशी केलेली
आहे. म्हणजे आधी मराठीवर ‘ई’ आणि ‘ऊ’ स्वर घेण्याची सक्ती करायची आणि मग मराठीच्या
उपजत मूलभूत वृत्तीतून स्विकारले जाणार नाहीत म्हणून शुद्धलेखन नियमावली लादायची
असी घोर विटंबना मराठीची झाली आहे. पद्य म्हणजे वाक्याऐवजी ओळीतून साकारणारा
लयतालविचार होय. सन्माननीय प्रा. माधव त्रिं. पटवर्धन (माधव ज्युलियन) यांनी
त्यांच्या ‘छन्दोरचना’ ग्रंथात ‘पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय’ अशी छान
आटोपशीर व्याख्या दिली आहे. गद्यातल्या वाक्यातला शब्दातील अर्थ पद्याच्या ओळींतून
वावरतो पण त्याचवेळी सामान्यपणे गद्यात नसलेला लयतालविचार मात्र पद्यात असावाच
लागतो. म्हणजेच ‘गद्य = वाक्यातून ओघवणारा शब्दातील अर्थ’ आणि ‘पद्य = (वाक्यातून ओघवणारा शब्दातील अर्थ) + (लयतालविचार)’ होय.
‘वाक्यातून ओघवणारा शब्दातील अर्थ’ गद्यातून ध्वनीतल्या फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस वा
कालमापन या गुणधर्मातून वावरत नाही. तो वावरतो त्या ध्वनी गुणधर्माला
‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणतात. ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणजे ध्वनीतील ऐकू येणार्या
निव्वळ व निखळ आवाजाची ओळख होय. ‘प्, क्, न्, . . .’ अशी व्यंजने आणि ‘अ, आ, ओ, .
. असे स्वर यांच्या उच्चारातील वापरलेला वेळ, फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस कोणताही असला
तरी त्यांची जी नक्की ओळख आपल्याला ऐकू ये त्याला ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणतात. गद्य,
पद्य, संगीतातील मराठीचे अलौकीक श्रेष्ठत्व तिने भाषेतून स्विकारलेल्या आणि
वापरलेल्या ध्वनी गुणधर्मांमुळे घडून आले आहे.
संस्कृतला हे कळले नाही
आणि त्यामुळे भाषेतून वापरताही आलेले नाही. त्यामुळे संस्कृतच्या अक्षरांचा म्हणजे
ध्वनी-एककांचा उच्चार ‘लघु, गुरू, प्लुत व काकपाद’ अशा चार प्रकारातून मांडावा
लागला आहे. हे उच्चार संस्कृत भाषीकांनाही नीटपणे उच्चारता येत नाहीत हे प्रसिद्ध
संस्कृत व्याकरणकार पतंजली (पाणिनींनंतरचा संस्कृत व्याकरणकार) यानेच लिहून ठेवले
आहे. संस्कृत व्याकरणातलेच प्लुत उच्चाराचे विवेचन इतके किचकट आहे की व्याकरणकार
पतजलीच प्रांजळपणे सांगतो की, ‘‘सर्वः प्लुतः साहसमनिच्छता विभाषा वक्तव्यः ।’’.
याचा सरळ अर्थ, ‘ज्यांना प्लुत स्वर उच्चाराचे धाडस करायचे नसेल त्यांनी ते उच्चार
वैकल्पीत मानावेत (स्वतःच्या इच्छेनुसार करायचे वा नाहीत ते ठरवावे, म्हणजेच ऑपशनला
सोडावेत!)’. पण याचवेळी वाक्याच्या शेवटचा स्वराचे प्लुत उच्चारण केव्हा, कोणी आणि
कोणत्या अर्थाने करावेत याचे नियम संस्कृतने आखले आणि त्यांचे पालन करण्याचा
नियमही बनवला.
उदाहरण – संस्कृत भाषेचा
उगम पृथ्वीतलावर निबिड अरण्ये असताना झाला हे विसरून चालणार नाही. त्याकाळी भाषेला
केवळ ध्वनी हेच माध्यम पूर्णपणे अवगत होते. त्यामुळे ध्वनीचा अभ्यास करून त्यातील
फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस, जातीगुणवैशिष्ट्य आणि कालमापन या सर्व गुणधर्मांचा वापर
संस्कृतने केला. यातून आपल्या पुर्वजांची प्रगल्भता लक्षात येते. याच संस्कृतमधून
वेद व उपनिषदे यांची निर्मिती साडेतीन हजार वर्षांपुर्वी केली गेली. त्याकाळी केवळ
सृष्टीचे अवलेकन करून, खडतर जीवनाशी संघर्ष करताना, निर्माण केलेली प्रचंड
ज्ञानाची कोठारे कायम स्वरूपी पुढील सर्व पिढ्यांपर्यंत पोचावीत यासाठी भाषेतल्या
शब्दांना बदलण्याची संधीच न देणारे जगावेगळे व्याकरण पाणिनींनी निर्माण केले. त्या
संस्कृत भाषेला आणि तिच्या व्याकरणकार पाणिनींना कोटी कोटी धन्यवाद प्रत्येक
भारतीय नक्कीच देईल.
आपण सर्वांनी संस्कृतला
जीवापाड जपले पाहीजे. पण याचा अर्थ संस्कृतला मराठीवर अत्याचार करण्याची संधी
द्यावी असा होत नाही. ‘शुद्रांशी, स्त्रियांशी आणि ज्यांना असूया वाटते त्यांच्या
अभिवादनाला प्रत्युतर देताना उच्चार प्लुत करायचा नाही’ असा संस्कृतचा नियम आहे.
सर्वसमावेशकपणे सर्वांशीच आदराने आणि आपुलकीने वागणार्या आणि वावरणार्या आपल्या
मायमराठीसाठी यातील कोणतीही गोष्ट आत्ताच्या आधुनिक युगाच्या आकलनाच्या पलिकडली ठरते.
त्याकाळातील समाजात असलेला चांगुलपणा आणि दोष, या दोन्ही गोष्टी, तिचे वारसदार
म्हणून आपल्यावर येऊन ठेपतात. आता अत्याधुनिक युगात जगाला जिंकण्याची आकांक्षा
मनात रुजवून आपण आपल्या मायमराठीच्या भविष्यातल्या उज्वल प्रगतीची दारे उघडली
पाहीजेत. त्यासाठीचे पहीले पाऊल म्हणजे मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर याही
पुढे करताना स्वतःच्या लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव धारण करावे. यातून संस्कृतच्या
वाईट सवयींचा परिणाम मायमराठीवर होणार नाही.
संस्कृतपेक्षा मराठी
भाषा सर्वार्थाने उत्तम आणि भाषेतल्या जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण अशा प्रत्येक
अंगाने परीपूर्ण, शास्त्रीय आणि अत्याधुनिक आहे.
मराठी व संस्कृत मधील
साम्यखुणांपेक्षा त्यातील फरक जमीन-अस्मानी असा पराकोटीचा आहे.
त्यातील महत्त्वाच्या
मोजक्या बाबींची आटोपशीर चर्चा लेखातून दिली आहे.
हा संपूर्ण लेख http://soundcode.blogspot.in/ या
ब्लॉगवर जरूर वाचा.
No comments:
Post a Comment