युनिकोड ते साऊंडकोड – 9
उच्चारात ध्वनी असतो. मानवी भाषांचे उच्चार-शास्त्र कळण्यासाठी उच्चारातील
विराम अचूकतेने कळणे जास्त महत्त्वाचे असते. विराम याची असंख्य रुपे मानव
संवादातून वापरतो. संवादात ग्रहण आणि प्रक्षेपण असते. दोन व्यक्तींमध्ये संवाद होत
असला तर त्यातील जी व्यक्ती बोलते ती ध्वनी प्रक्षेपीत करत असते. त्याचवेळी दुसरी
व्यक्ति संवादात भाग घेत असते म्हणजे ती व्यक्ती विराम प्रक्षेपीत करत असते.
संवादात दुसरी व्यक्ती उपस्थित असते हे ध्वनी प्रक्षेपीत करणार्याला ‘कळणे’
आवश्यक ठरते. हे जे त्याला कळते ते ‘कळणे’ म्हणजेच दुसर्या व्यक्तीने प्रक्षेपीत
केलेला विराम त्याच्यापर्यंत पोचत असतो. हे अत्यंत नैसर्गिक असते. मोबाईलवर
बोलताना पलीकडल्या व्यक्तीचा विराम तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि म्हणून पलीकडील
व्यक्तीने संवादातील त्याचा विराम ‘हुंकार’ देत प्रक्षेपीत करणे भाग पडते.
समोरासमोर संवाद साधताना दुसर्या व्यक्तीच्या शुल्लक हालचालीतून त्याचा विराम
पोचतो.
संवादातील विराम खरे म्हटले तर ध्वनीपेक्षाही बराच जास्त अर्थ प्रक्षेपीत करत
असतो. दुसर्याचे बोलणे रुचले, भावले की त्याज्य वाटले हे त्याच्या छोट्या वा लांबविलेल्या
विरामातून प्रक्षेपीत होते. ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर’ या षडरिपुंच्या
बाबतीत हा विराम अधिक बोलका ठरतो! ‘न बोलताही कळले सारे’, ‘तिच्या डोळ्यांच्या
आज्ञेत मी असतो’, अशा असंख्य संवादात भाषा भाग घेत असते व विराम प्रतिसाद देत
असतो.
संवादात ध्वनी नसतानाही आपल्या जाणीवांना ध्वनीचे अस्तित्व उमगते. समजा एखादी
संगीताची मैफिल सुरू आहे. गायक सुंदर, तान घेऊन समेवर येतो. तबल्याचा व वाद्यांचा
ठेकाही थांबतो. एक दिग्मुढ आनंददायी शांतता जाणवते. ह्या शांततेतील विरामात संगीत
असते. ‘नियमीत अंतरावर पडणार्या पद्याच्या तुकड्यातील’ विरामात काव्य असते.
व्यंजनाच्या व स्वरांच्या मधील अत्यल्प अवधीत, अक्षरांच्या मधील विभक्तपणात,
शब्दांमधील अंतरात, वाक्यामधील विरामात गद्य असते. ध्वनीचे हे विरामातील, अवधीतील,
विभक्तपणातील, अंतरातील आणि शांततेतील रूप संवादाला यश देते. जेव्हा विषयातील गाभा
दुसर्याला समजविण्याची गरज असते वा जेव्हा मतभिन्नता असते, तेव्हाच संवाद घडतो,
असे काहीसे म्हणता येते. देणे-घेणे, आदान-प्रदान, आवक-जावक, अशा संवादातून दोन्ही
व्यक्ती शिक्षक आणि दोन्ही व्यक्ती विद्यार्थी असतात. भाषण, व्याख्यान, आख्यान,
यातून प्रेक्षकांची भूमिका ‘विराम प्रक्षेपीत’ करण्याची असते. पण ‘विराम
प्रक्षेपीत’ करणे हेही फार महत्त्वाचे असते. गायक स्टेजवर उत्तम शास्त्रीय संगीत
गात आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळणारा अबोल प्रतिसाद, म्हणजेच विराम कळतो.
त्यातून गायकाला गाता-गाता आपले गाणे मनोरंजक व चित्तवेधक ठरत आहे की नाही हे
कळते. याचा परीणाम त्याच्या त्या गाण्यावर कळत नकळत होतो. गाणे उत्तम जमणे यात
श्रोत्यांचा सहभागही ‘विराम प्रक्षेपीत’ करण्यातून महत्त्वाची भुमिका बजावतो. शाळेत
शिकविण्यार्या शिक्षकांना, लेक्चर देणार्या प्राध्यापकांना, भाषण देणार्या
पुढार्यांना, किर्तन करणार्या किर्तनकारांना, या ‘विरामा’तून प्रतिसाद मिळतो.
समजा दोन मित्र गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर भेटले
आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्यांच्या आजूबाजूला असंख्य लोक असतात.
त्यांच्यातही संवाद सुरू असतो. पण त्या दोन मित्रांच्या संवादातील वाक्यात असलेले
शब्द सुरळीतपणे दुसर्यापर्यंत पोचतात. त्यात प्लॅटफॉर्मवर असलेल्या इतरांच्या
उच्चारीत ध्वनीचा समावेश होत नाही तरच तो संवाद घडतो. इतरांचे उच्चारीत संवाद जरी
कानावर पडले तरी ते विरामात विरून नेण्याची क्षमता मानवात असते म्हणून अशा
गर्दीच्या ठिकाणीही संवाद साधता येतो.
लहानपणी आई सकाळी स्वैपाकासाठी फुरफुर्या स्टो सुरू करायची. त्याच्या आवाजात
घरातील सर्व व्यवहार व संवाद पार पडायचे. जेव्हा आई स्टो बंद करत असे तेव्हा त्या
स्टोचा आवाज येत होता याचा नवा साक्षात्कार होत असे. आवाज नाहीसा झाल्यावर त्याची
जाणीव होणे म्हणजेच त्याआधी त्या आवाजाला स्वतःपुरते विरामात स्थान दिल्यासारखे ठरते.
विरामाच्या अशा भिन्न ओळखींची जाणीव देण्याची किमया निसर्गाने मानवावर लादलेली
आहे.
‘दोन ओळींमधला अर्थ’, ‘शब्दांच्या पलीकडले’ अशा वाक्यरचना ध्वनी-क्षितीजा पलीकडल्या
अर्थांकडे बोट दाखवत असतो. अनुभवाची कोठारे जितकी जास्त भरतील तितक्या प्रघल्भतेने
विरामाचा अर्थ कळू लागतो. विराम म्हणजेच ध्वनी नसलेल्या शुन्याचा अर्थ नसून विराम
म्हणजे विरून गेलेला आपल्यासाठी अस्तंगत झालेला पण अस्तीत्व असलेला ध्वनी होय.
संवादातील विराम किती, कुठे, कसा व केवढा असतो? हे जाणण्यासाठी आपण निसर्गातील
भौतिक-विराम जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दोन वस्तुत आघात झाला आणि त्या ठिकाणी
हवेची उपस्थिती असली तर ध्वनी निर्माण होतो. ध्वनी ही उर्जा आहे. हवेत तरंगणार्या
सुक्ष्म वस्तुत्वामार्फत (धुळी कणांमार्फत) ही उर्जा एकाकडून दुसर्याला मिळत जाते
आणि ध्वनी एकीकडून दुसरीकडे पोचतो. हवेत तरंगणार्या सुक्ष्म वस्तुत्वांमधले अंतर
किती असते? हे आपल्याला सांगता येत नाही. पण हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते.
थंडीत दूरवरचा आवाज लांबवर पोचतो याचे प्रत्यंतर येते. थंडीच्या दिवसात हवा थंड
म्हणजेच आकुंचीत झालेली असते हेही उमगते. मग उन्हाळ्यातील हवेचे प्रसरण आणि
थंडीतील हवेचे आकुंचीत होणे यातील तफावत किती? याची निश्चित माहीती आपल्याला नसते.
पण असे घडते इतपत ज्ञान आपल्या जाणीवांपर्यंत पोचते. अगदी तसेच भाषेतल्या विरामाचे
असते. ‘कळते पण वळत नाही’ या म्हणी ऐवजी येथे ‘वळते पण कळत नाही’ अशी स्थिती
निर्माण होते.
वस्तुत्वातील अणुरेणूचे उदाहरण विरामाची व्याप्ती कळायला खूप उपयोगी पडते. आपण
सायन्स मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे अणू जाणतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जसे
अणू ठरतात तसे मराठी व्यंजन आणि स्वर मानवी भाषांचे अणू ठरतात. हायड्रोजन आणि
ऑक्सिजन यांच्या संयोगातून H2O म्हणजे पाणी
निर्माण होते. तसेच मराठी व्यंजन आणि स्वर यांच्या संयोगातून ‘अक्षर’ निर्माण होते.
जसा H2O हा पाण्याचा रेणू (Molecule) ठरतो तसेच अक्षर हे भाषेतील रेणू ठरते. जसे H2O या संयोगातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यात विभक्तपणा नसतो तसेच अक्षरात भाग
घेणार्या व्यंजन आणि स्वरातील संयोगात विभक्तपणा नसतो. जर असलाच तर तो मानवाला
उच्चारीत ध्वनीतुन कळत नाही. अक्षराच्या अंतरंगातील विभक्तपणा जरी कळला नाही तरी
त्यातील व्यंजन आणि स्वर यांची जाणीव आपल्याला होते. म्हणजेच अक्षरातील अंतरंगात
असलेला ध्वनी-विराम आपल्याला न कळण्या एवढा सुक्ष्म असतो. विरामाचे अस्तित्व ओळखण्याची
सुरवात इथुन होते.
स्वरांच्या अक्षरांचे तुषार, व्यंजन+स्वर अक्षरांचे
झरे, शब्दातील अक्षरांचे ओढे, वाक्यातील अक्षरांच्या नद्या, परिच्छेदातील
अक्षरांची तळी आणि पुस्तकातील अक्षरांचे जलाशय होतात. ग्रंथातील आषयाला बोजड व
क्लिष्ट अशी चव येते असे मानले तर कदाचीत ग्रंथातील अक्षराला सागर म्हणता येईल! पाण्याची
‘वाफ, पाणी आणि बर्फ’ अशी तीन अस्तित्वे आपण जाणतो. झरे, ओढे, नद्या, तळी, जलाशय व
सागर अशी शब्द रचना ‘पाणी’ शब्दातून आपण केली. ‘वाफ’ यातूनही झरे, ओढे, नद्या,
तळी, जलाशय व सागर यांच्या पाण्याची नियमीतपणे होणारी वाफ मांडली तर ती तेवढी
योग्यता देणार नाही. का बरे संवादातून असे घडते? यातून काय नक्की कळते? ज्या
शब्दांशी आपण जास्त निगडीत असतो त्यांचा निश्चित अर्थ मनात कोरलेला असल्याने जवळचा
वाटतो. ज्या गोष्टीच्या अनुभवांचा पडताळा नीटपणे आलेला नसतो त्या संवादाशी जवळकीचे
आमुलकीचे नाते निर्माण होत नाही. म्हणजे आयुष्यात आलेला अनुभव मानवाला अर्थ-स्वरूपी
संलग्नता वा विराम देतो. एस्किमोंची अशीच
रचना ‘बर्फ’ यावर आधारीत असेल, त्यांना झरे, ओढे, नद्या, तळी, जलाशय व सागर यापेक्षा
बर्फाचा पाऊस, बर्फाचे थेंब, बर्फाच्या पागोळ्या, बर्फाचे ओघळ, वगैरे जास्त पटकन
लक्षात येतील.
No comments:
Post a Comment