बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Friday, 10 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड - 8



युनिकोड ते साऊंडकोड - 8
स्वराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत वाढवता येतो. पण असा लांबलचक उच्चार आपण शब्दातील अक्षरात वापरत नाही. बोलताना त्यातील अक्षरातल्या उच्चार वेळेत कळत नकळत बदल होतो. पण लेखनात मात्र आपण स्वरासाठीच्या अक्षराला (अ, आ, . . . वगैरे) आणि व्यंजनाला त्यानंतर स्वर जोडून अक्षर बनवताना वापरलेल्या चिन्हाला (काना, वेलांटी, उकार, मात्रा, . . . वगैरे) उच्चारासाठी नक्की किती वेळ द्यायचा ते सांगत नाही. म्हणजेच लिखीत स्वर-अक्षराला (अ, आ, . . . वगैरे) आणि बाराखडीतील स्वर-चिन्हांतून (काना, वेलांटी, उकार, मात्रा, . . . वगैरे) उच्चारासाठी घ्यायचा वेळ सांगायचा नसतो. म्हणजेच यातून एक गोष्ट नक्की होते. गद्यासाठीच्या लेखनात आपल्याला उच्चारातील कालावधी मांडण्याची गरज भासत नाही.

मराठीने शेकडो वर्षे जेव्हा मोडीलिपी वापरली तेव्हा याचे अचूकतेने पालन केले. जेव्हा मोडी मोडीत काढून मराठीने देवनागरी चिन्हांचा स्विकार केला तेव्हा संस्कृत प्रमाणेच ‘ई’ व ‘ऊ’ या दोन चिन्हांचा स्विकार मराठीने गद्यात केला आहे असे ठरविण्यात आले. संस्कृतने गद्यातही ‘ई’ व ‘ऊ’ स्विकारले आहेत. तशा उच्चारातून म्हणजेच ‘इ आणि ई’ तसेच ‘उ आणि ऊ’ यांच्या उच्चारातील फरकातून संस्कृतच्या व्याकरणाच्या दृष्टीकोनातून शब्दाचा अर्थ बदलतो.

संस्कृत भाषेत केवळ 2115 धातु आहेत. (मराठीत धातु ही संकल्पनाच नाही.) प्रथम, चतुर्थ, षष्ठ व दशमगणाचे मिळुन 1876 धातु आहेत. बाकी गणांचे मिळुन 239 धातु आहेत. धातु पदातून (शब्दातून) वापरायची मुभा संस्कृतने दिलेली नाही. धातुंना गण व विकरण लावून संस्कृतची पदे (शब्द) बनतात. पदे बनताना संस्कृत मध्ये ती प्रथमा ते सप्तमी आणि संबोधन अशा आठ भागातून प्रत्यय जोडून ‘चालवली’ जातात. त्या ‘चालवल्या’ जाणार्‍या पदांचे  ‘अकारान्त पुलिंगी’(प्रथमा - देवः, देवौ, देवाः), ‘अकारान्त नपुसकलिंगी’ (प्रथमा – वनम्, वने, वनानि), ‘आकारान्त स्त्रिलिंगी’ (प्रथमा – शाला, शाले, शालाः) , ‘इकारान्त पुलिंगी’ (प्रथमा – कविः, कवी, कवयः), ‘इकारान्त स्त्रिलिंगी’ (प्रथमा – मतिः, मती, मतयः), ‘इकारान्त नपुसकलिंगी’ (प्रथमा – वारि, वारिणी, वारीणि), ‘ईकारान्त स्त्रिलिंगी’ (प्रथमा – नदी, नद्यौ, नद्यः), ‘उकारान्त पुलिंगी’ (प्रथमा – भानुः, भानू, भानवः), ‘उकारान्त स्त्रिलिंगी’ (प्रथमा – धेनुः, धेनू, धेनवः), ‘उकारान्त नपुसकलिंगी’ (प्रथमा – मधु, मधुनी, मधूनि), . . . वगैरे प्रकार आहेत. यातील प्रत्येक शब्द व त्याचे ‘चालवणे’ भिन्न असते, हे कंसात दिलेल्या त्यांच्या प्रथमेच्या उदाहरणातून कळेल.

वेलांट्या आणि उकारातून संस्कृतच्या शब्दातील अर्थात होणार बदल आपण समजून घेऊ. 1) वेलांटीबाबतचे उदाहरण - ‘वारि’ या इकारान्त नपुसकलिंगी धातुची प्रथमेची ‘एकवचन, द्धिवचन, बहूवचन’ ही रुपे अनुक्रमे ‘वारि, वारिणी, वारीणि’ आहेत. म्हणजे ‘वारिणी’ असा वेटांट्यातून काढला तर ते प्रथमेचे द्धिवचन ठरते पण जर तोच शब्द ‘वारीणि’ असा लिहीला तर ते प्रथमेचे बहूवचन ठरते. 2) उकाराबाबतचे उदाहरण – धेनु या उकारान्त स्त्रिलिंगी धातुची प्रथमेची ‘एकवचन, द्धिवचन, बहूवचन’ ही रुपे अनुक्रमे ‘धेनुः, धेनू, धेनवः’ आहेत. म्हणजे प्रथमेच्या एकवचनात ‘नु’ असा र्‍हस्व-उकार असतो तर प्रथमेच्या द्विवचनात ‘नू’ असा दीर्घ-उकार असावाच लागतो. 3) वेलांटी आणि उकार यांचे एकत्रीत उदाहरण - ‘मधु’ या उकारान्त स्त्रिलिंगी धातुची प्रथमेची ‘एकवचन, द्धिवचन, बहूवचन’ ही रुपे अनुक्रमे ‘मधु, मधुनी, मधूनि’ असावीच लागतात. म्हणजे प्रथमेच्या द्विवचनातील ‘धुनी’ यात क्रमाने र्‍हस्व-उकार व दीर्घ-वेलांटी असते तर प्रथमेच्या बहूवचनातील ‘धूनि’ यात क्रमाने दीर्घ-उकार व र्‍हस्व-वेलांटी असते. संस्कृतमध्ये जागोजागी शब्दातील उकार व वेलांट्या बदलल्या की त्या शब्दाचा अर्थच बदलतो.

मराठीत असे काहीही नव्हते. व्याकरणकारांनी संस्कृतची नक्कल करून मराठीसाठी बनविलेल्या पुस्तकी-व्याकरणात संस्कृतच्याच धोरणाचा स्विकार केला. खरे म्हटले तर त्यांनी संस्कृतचे व्याकरणीय कातडे मराठीला पांघरण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक भाषा स्वतंत्र असते तरच तिला भाषा म्हणतात आणि प्रत्येक भाषेचे स्वतंत्र व्याकरण असते. मराठीचे स्वतंत्र व्याकरण कोणते?, याचा अभ्यास करता न आल्याने त्यांनी संस्कृतच्या माननीय पाणिनींचे व्याकरण भक्तिपूर्वक स्विकारले. काय हिम्मत होती कोणाची संस्कृतच्या व्याकरणाला नावे ठेवण्याची! याशिवाय ‘संस्कृत ही देव भाषा आहे’, ‘सर्व भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या’ अशा जाहीरातींमुळे मराठीच्या व्याकरणातील अचूकता बाजूला पडून, चुकीच्या व्याकरणाचा स्विकार स्विकारणे मराठीला भाग पडले. आता व्याकरणकार ‘दिन-दीन’, ‘सूत-सुत’ अशा संस्कृतमधून आलेल्या शब्दांची उदाहरणे देऊन जनतेची दिशा भूल करत आहेत. अहो असे शब्दही वाक्यातून जरी ‘दिनदयाळ’ वा ‘दीनदयाळ’ वा ‘सूतकताई’ वा ‘सुतकताई’ असा वापरला तर संभाषणातून योग्य अर्थ प्रत्येकाला नक्कीच कळतो. मराठी भाषा शब्दाला वाक्यातून वापरून अर्थाचा अगदी विरोधी अर्थही काढण्याइतपत लवचीक आहे. ‘’वाट दाखवली’ आणि ‘वाट लावली’ यात खरे पाहीले तर ‘वाट’ शब्दाचीच ‘वाट’ लागत असते! मराठीची हा लवचिक ओघवतेपणा संस्कृतला कसा कळणार? पुस्तकी व्याकरणात व्याकरणकारांनी केलेल्या अक्षम्य चुका आता तरी बदलून मराठीला तिच्या उपजत आणि मूलभूत पणातून जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यायला नको का?

खरे म्हटले तर शेकडो वर्षांच्या मराठीच्या इतिहासात मोडीलिपीचा वापर होताना गद्यासाठी मराठीने केवळ ‘इ’ व ‘उ’ हेच केवळ स्विकारले होते. काव्यासाठी उच्चारातील कालमापन महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय ओळीतील लयतालविचाराला लेखनातून मांडणे शक्य नसते. यासाठी ‘बाळबोध’ लिपीतून मराठीने केलेले शेकडो वर्षांतील काव्याची सुत्रातून ‘ई’ व ‘ऊ’ हेही वापरले गेले. इतिहासात दिल्ली-तख्तापासून, निजामशाहीपर्यंत, झाशीच्या राणीपासून टिपूसुलतानापर्यंत, शिवाजीपासून पेशव्यांपर्यंत सर्वांनी राज्यकारभारात मोडीचा मनसोक्त वापर केला. करारनामे, खलिते, जमिनीचे व संपत्तीचे व्यवहार, सारे सारे हिशोब, असे सर्वकाही केवळ मोडीलिपीतून केले गेले. गद्यातील वाक्यातून साजरा होणारा मराठीचा भाषीक अर्थ केवळ एक-वेलांटी व एक-उकार यातून मांडला, वापरला, उमगला, जाणला जातो.

मोडीलिपीतील म्हणजेच मराठी गद्यात वापरल्या जाणार्‍या स्वर आणि व्यंजने यांची माहीतीचे हजारो पुरावे उपलब्ध आहेत. आजच्या संगणकीय युगात सर्वांना पटकन इंटरनेटवरून उपलब्ध होणारा पुरावा http://www.omniglot.com/writing/modi.htm या लिंकवरून कोणालाही बघता येईल. तो चित्रमय स्वरूपातून देत आहे. मूलभूत मराठीच्या मोडीलिपीत ‘ऋ’ आणि ‘ॠ’ नव्हते. अलिकडील बर्‍याच संस्थांनी प्रसिद्ध केलेली मोडीबाबतची माहिती चुकीची आणि अपूर्ण आहे. मोडीलिपीत आणि तिच्यातील फॉण्टमध्ये ‘ऋ’ व ‘ॠ’ देऊन चुकीचा पायंडा पाडला जात आहे. तसेच आता मराठीत असलेले ‘अॅ’ व ‘ऑ’ मोडीलिपीत म्हणजेच मराठीत नव्हते. मराठी भाषा मुक्त ओघवती असल्याचा हा भक्कम पुरावा ठरतो. संस्कृतला ‘अॅ’ व ‘ऑ’ कधीही अधिकृतपणे घेता येणार नाहीत कारण त्यासाठीचे धातुच संस्कृत मध्ये नाहीत. पाणिनींच्या संस्कृत व्याकरणाने केवळ 2115 धातुच स्विकारले आहेत. थोडक्यात म्हणजे ‘कॅट’ वा ‘जॉर्ज’ शब्द धातु म्हणून स्विकारण्याची परवानगी कोण देणार? ‘देवः, देवौ, देवाः’ सारखे ‘कॅट’ वा ‘जॉर्ज’ धातु ‘अकारान्त पुल्लींगी’ समजून चालवले तर? ‘कॅटः, कॅटौ, कॅटाः’, ‘जॉर्जः, जॉर्जौ, जॉर्जाः’ असे ते वापरून चालतील, हे कोण ठरविणार? संस्कृतच्या व्याकरणातून अधिकृतपणे त्यांचा समावेश करता येईल का? संस्कृतमधून बातम्या सांगितल्या जातात. त्या ऐका म्हणजे यातील गंमत कळेल! मराठीत मात्र जगातील कोणत्याही भाषेच्या शब्दाबाबत असे प्रश्न निर्माण होऊ शकत नाही इतकी मराठी भाषा सर्वसमावेशक आहे, हे यातून सिद्ध होते का?


1 comment:

  1. Thank you so much to share this .Khup khup dhanyavad aplyala Chatrapatinche Shivkalin patra vachnyachi eccha ata purn hoil.

    ReplyDelete