युनिकोड ते साऊंडकोड – लेख 26 –
मराठीच्या उज्वल भवितव्याचा ठोस उपाय
1991 मध्ये झालेल्या जनगणनेच्या नोंदीनुसार भारतात
1576 बोली-भाषांची नोंद झाली आहे. या बोली-भाषाची 114 भाषांमध्ये विभागणी करण्यात
आली आहे. मान्यवर भारतीय भाषा ज्या अधिकृतपणे भाषावार प्रांतरचनेत अग्रणी ठरल्या
त्यांची नावे 'आसामी, बेंगाली, गुजराथी, हिन्दी, कानडी, कोकणी, मल्याळी, नेपाळी,
मणीपुरी, मराठी, ओरीया, पंजाबी, तामीळ, तेलगु, उर्दू' आहेत. त्यानंतर याशिवाय आणखी
काही भाषांचा समावेश यात झाला आहे व होत आहे. भारतात जरी अशा प्रांतवार रचनेतील
भाषा भिन्न असल्या तरी इंग्रजी भाषा सर्व प्रांतातून सरकारी खात्यातून,
अर्थकारणातील व्यवहारात, संस्थांच्या कारभारात, शिक्षणाच्या उपक्रमात, सामाजीक
देवाणघेवाणीत वापरली जाते. विविध प्रांतातील प्राथमीक व माध्यमीक शाळांचा विचार
करता त्यातून प्रांताची भाषा मागे पडून इंग्रजीचा प्रभाव प्रचंड वेगाने वाढत आहे.
महाराष्ट्रात इंग्रजी भाषा कमालीच्या भरमसाठ वेगाने फोफावत आहे.
शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्या कालखंडात मराठी
भाषा भारतातील दिल्ली ते निजाम पर्यंतच्या सर्व राज्यकारभारात वापरली जात होती.
त्याकाळी महाराष्ट्रातील कार्यालये, घरोघरी आणि रस्त्यावरती केवळ मराठी नांदत
होती. पण आता मराठी शाळांना विद्यार्थीच मिळत नाहीत. याचाच अर्थ अंदाजे 80 टक्के
शिक्षण इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रात दिले जाणार आहे. प्रत्येक वर्तमानकाळात
तीन पिढ्या असतात. नव्या पिढीतील 80 टक्के व्यक्ती यापुढे इंग्रजीचा स्विकार करणार
आहेत. म्हणजेच त्यांची मुले सुद्धा इंग्रजीतून प्रवास करणार आहेत. 30 वर्षांपूर्वी
महाराष्ट्रात केवळ ऑफीसेस व कार्यालये यामधून इंग्रजी वापरली जात होती. रस्त्यावर
आणि घरोघरी मराठी वापरली जात होती. 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील ऑफीसेस, कार्यालये
आणि रस्ते यामधून इंग्रजी वापरली जात होती. मराठी भाषा केवळ घरोघरी वापरली जात
होती. आता महाराष्ट्रातील ऑफीसेस, कार्यालये, रस्ते घरोघरी इंग्रजी वापरण्याची
सुरवात होत आहे. यावेगाने गणिती पद्धतीतून पुढील केवळ 20 वर्षांत मराठी भाषा
नामषेश होईल असे भाकित करता येते का? अर्थात असे घडू नये, यासाठीच्या निश्चित उपाययोजना
सांगणाराच हा लेख आहे.
भाषा प्रेमापोटी टिकत नाही. ज्या भाषेतून समाजाला 'शिक्षण,
नोकरी, कामधंदा, मानसन्मान व पैसा' मिळेल तीच आधुनिक युगात टिकणार आहे. हा नव्या
युगाचा भाषीक सिद्धांत ठरतो. याला आपण 'भाषीक-पंचेंद्रिये' असे नाव देऊ. भाषा म्हणून
जरी इंग्रजी शास्त्रीय नसली तरी ती ही सारी 'भाषीक-पंचेंद्रिये' व्यापक प्रमाणात पुर्ण
करत आहे. असे का घडत आहे? याची कारणे शोधून भारतीय भाषांना सक्षम बनवणे हा विचार समाजाने
करायचा नसतो. भाषेतून समाजाला 'भाषीक-पंचेंद्रिये' परीपूर्ण करण्याची सोय निर्माण
केली गेली तरच प्रत्येक भारतीय-भाषा टिकणार आहे.
'भाषीक-पंचेंद्रिये' परीपूर्ण करण्यासाठी आधुनिक
युगात भाषेला, ध्वनी (बोलणे-ऐकणे), कागद (लिहीणे-वाचणे), संगणक (टाईप करणे – संग्रह
करणे व प्रसारीत करणे) या तिन्ही माध्यमातून 'सहजसुलभ, स्वतंत्र, तटस्थ, मनसोक्त व
मोफत' वावरता येणे गरजेचे आहे. हा ठरतो भाषेच्या आधुनिक माध्यमांचा सिद्धांत. याला
नाव देऊ या 'ससतमम'. मराठीला ध्वनी व कागद ही दोन माध्यमे समाजापर्यंत ठिकपणे
पोचवता आली असे म्हणता येते. 'ज्याला लिहीता वाचता येते तो साक्षर' अशी आपल्याकडे
'साक्षरते'ची व्याख्या होती. आता आधुनिक युगातील साक्षरतेची व्याख्या बदललेली आहे.
साक्षरतेच्या नव्या व्याख्येचे दोन भाग पडतात. 1) ज्या भाषेला संगणकातून 'सहजसुलभ,
स्वतंत्र, तटस्थ, मनसोक्त व मोफत' वावरता येते ती 'भाषा-साक्षर' होय. 2) ज्या
व्यक्तीला संगणकातून 'सहजसुलभ, स्वतंत्र, तटस्थ, मनसोक्त व मोफत' वावरता येते ती
व्यक्ती साक्षर होय. हा आहे आधुनिक युगातील 'भाषा-साक्षरता' सिद्धांत.
आधुनिक युगातील प्रत्येक व्यक्ती 'शिक्षण, नोकरी,
कामधंदा, मानसन्मान व पैसा' ही 'भाषीक-पंचेंद्रिये' परीपूर्णतेने सफल-संपूर्ण करणारी
भाषा निवडणार आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येक व्यक्ती, 'ज्या भाषेला
संगणकातून 'सहजसुलभ, स्वतंत्र, तटस्थ, मनसोक्त व मोफत' वावरता येते' ती भाषा
निवडणार आहे.
मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेची केवळ दोन महत्त्वाची
कारणे आहेत.
1) आजमितीस मराठीला संगणकातून 'सहजसुलभ, स्वतंत्र, तटस्थ,
मनसोक्त व मोफत' वावरता येत नाही.
2) 'चुकीचे पुस्तकी व्याकरण' आणि 'शुद्धलेखन
नियमावली' यामुळे मराठीचे लिखीत हात कापले गेले आहेत.
आणि म्हणून मराठी भाषा 'भाषेचे शिक्षण' आणि
'शिक्षणाची भाषा' या दोन्ही ठिकाणी कमकुवत ठरत आहे.
या दोन्ही आघाडींवर एकाचवेळी साकल्याने आणि
सातत्याने 'शोध मराठीचा' संशोधन कार्य करत आहे. या दोन्ही विभागांसाठी आम्ही
'संगणकीय मायमराठी' आणि 'उपजत मूलभूत मायमराठीचे व्याकरण' अशा दोन आघाड्या निर्माण
केल्या आहेत.
या दोन्ही विभागातून संशोधनात्मक कार्य पूर्ण झाले
असून त्याच्या प्रसार-प्रचाराचे काम शिल्लक आहे.
मराठीचा विकास व उन्नत्ती साधण्यासाठी याच दोन आघाड्यांवर
कार्य करून, मराठी-भाषेला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला संगणकातून 'सहजसुलभ, स्वतंत्र,
तटस्थ, मनसोक्त व मोफत' वावरता येण्याची सोय आम्ही संशोधनातून निर्माण केली आहे.
''काय घडावे?'' याची आम्ही भाषणे देत नसून त्यावरील
अचूक तोडगा व उपाययोजना मांडून, मोफत उपलब्ध केली आहे. सरकार, साहित्य सम्मेलने,
मान्यवर आणि सरकार यांच्याकडे दुसरा तोडगा वा उपाययोजना आहे का? समाजाने, साहित्य
सम्मेलनांनी, संस्थांनी, मान्यवरांनी आणि सरकारने यात विविधप्रकारे मदत करून याच्या
प्रसार-प्रचारात भाग घ्यावा ही कळकळीची विनंती.
‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
आपला,
शुभानन गांगल
No comments:
Post a Comment