युनिकोड ते साऊंडकोड
– लेख 29 – मुक्या
अक्षरांतून संगीताच्या नादरम्यतेकडे
बस मधून उतरलो. बस निघून गेली. आता रस्ता कॉस करून घरी जायचे होते. ह्ल्ली दोन्ही
बाजुंनी सुसाट भरधाव वेगाने धावणारे ट्रक, बसेस आणि गाड्यांमुळे रस्ता कॉस करणे
महामुश्कील झाले आहे. खांद्याला अडकवलेली बॅग सांभाळत, ट्रॅफीक कमी होऊन रस्ता कॉस
करायची संधी केव्हा मिळते याची वाट बघत होतो. पंधरा-वीस फुटांवर एक तरूण मुलगी उभी
होती. अरेऽ, पण तिच्या हातात आंधळ्यांची काठी होती. तिच्या चांगल्या पोशाखातील
सडसडीत बांध्याकडे पाहून तिने ती काठी हातात गंमत म्हणून घेतलेली असावी, असे
वाटले. नाही म्हणजे, तिला अंधत्व नको अशी ती
माझ्या मनातील सुप्त इच्छा असावी. पण तिच्या एकूण शारीरिक हालचालींवरून आणि काठीने
रस्त्यालाही जणू ममतेने हळूवारपणे गोंजारण्याच्या क्रियेतून ती खरोखरच आंधळी
असल्याचे निश्चित झाले.
रस्त्यावरचा ट्रॅफीक तसाच भरमसाठ वेगाने वहात होता. मला काय वाटले कोणास ठाऊक,
मी डोळे बंद करून ट्रॅफिक पाहण्याचा (!) प्रयत्न करू लागलो. आता मला ट्रक, बस, कार
यांच्या भरधाव वेगातील आवाजांचा भिन्नपणा जाणवत असल्याचा नवा साक्षात्कार झाला !
आपण आपल्या डोळ्यांवर इतके अवलंबून असतो की बाकीच्या पंचोद्रियांतून येणार्या
असंख्य प्रतिसादांना सादच देत नाही. आजुबाजुच्या परिस्थितीशी डोळ्यांशी होणारा
संवाद थांबवला म्हणून आवाजातून प्राप्त होऊ शकणार्या संवादाशी मी जास्त एकरूप होऊ
लागलो. वाऽ, एक नवा प्रत्यय मला आला!
रस्त्यावरचा ट्रॅफीक तसाच कायम होता. पुन्हा मला नवी कल्पना सुचली, मी कानात
बोटे घालून ऐकु येणार्या ध्वनीला थोपविण्याचा प्रयत्न केला. आता मला भरवेगाने
जाणार्या अवजड ट्रकमुळे कंपीत होणार्या रस्त्याचे अंतरंग कळू लागले. डोळे पूर्ण
व कान काहीसे बंद ठेऊनही वजनदार ट्रक व हलक्या कारमुळे रस्त्याचे होणारे
व्हायब्रेशन कसे बदलते ते अनुभवले. होय, अक्षरशः नव्याने अनुभवले. त्या आंधळ्या
मुलीला ध्वनीतील बारकावे आणि रस्त्याची कंपने आपल्यापेक्षा बरीच जास्त आणि
उत्तमपणे नक्की कळत असतील याची खात्री पटली.
मी रस्त्यावर लांबवर नजर टाकली. काही ट्रक व कार नंतर कोणतेच वाहन येत
नसल्याचे दिसले. त्यावेळी रस्ता कॉस करायला हवा होता. मला त्या मुलीला मदत करावीशी
वाटली. मी पटापट तिच्या जवळ गेलो. तिला नक्कीच चाहूल लागलेली असणार. कारण तिची मान
माझ्या बाजूला वळली होती. मी जास्त विचार न करता तिचा डावा हात हातात घेतला आणि
रस्ता कॉस करण्याच्या तयारीत राहीलो. तिने सुद्धा उजव्या हातातील काठीने रस्त्याला
गोंजारण्याचे सोडलेले दिसले. हाताच्या स्पर्शातून तिने माझ्याशी एक प्रकारच्या
विश्वासाचा संवाद साधला. तिच्या हाताला थोडे खेचल्यासारखे करत मी न बोलता तिला
चालायचा संकेत दिला. तिचा हात घट्ट धरून मी रस्ता कॉस करू लागलो. उजव्या हातातील
काठी रस्त्याला स्पर्श न करता हवेत तरंगती ठेवत तिने माझ्याबरोबर रस्ता क्रॉस
केला. मी नीटपणे रस्ता कॉस करून देईन इतपत आमची गट्टी जमली होती. रस्ता क्रॉस करून
झाल्यावर मी हात सोडला.
तिने पटकन माझ्याकडे बघितल्यासारखे केले. इतर कोणी मला अशा स्थितीत बघू नये
असेच मला वाटत असावे. तिला रस्ता क्रॉस करून देताना, तिचा हात घट्ट धरला होता,
तेव्हा असे का वाटले नाही? संशयीतांच्या नजरेचे काटे आपल्याला बोचतात कारण आपल्याच
रक्तातील कणाकणातून त्याच विचारांची वहाने वहात असतात! माणुसकीच्या व्यवहाराशी असा
तुटकपणे घटस्फोट आपण का घेतो? माझा मलाच प्रश्न पडला. तिची आंधळी काठी पुन्हा
रस्त्याला गोंजारू लागली. काहीही न बोलता मीही घरी परतलो.
वरील चार परिच्छेद वाचून तुम्ही काय अनुभवलेत? तिच्या हाताचा तो आंधळा
विश्वासपूर्ण स्पर्श तुम्ही सुद्धा अनुभवलात ना? रस्त्यावरून वेगाने जाणार्या
ट्रकचा हेवी-ड्युटी व कारचा त्यामानाने नाजूक असलेल्या कंपनांचा अनुभव तुम्हालाही
घेता आला ना? तरूणाने तरूणीकडे बघायच्या नैसर्गिक नजरेतील संवेदना तुम्ही सुद्धा
अनुभवलीत ना? माणूस या नात्याने आपुलकीच्या नात्यातला काही वेळापुरता परस्पर
संबंधही तुम्ही उपभोगलात ना?
माझा हात हातात घेतल्यावर तिला त्यातील पुरूषीपणा कळलाच नसेल का? 'मीच का बरे
आंधळी?' असा स्वतःच्याच पाचवीला पुंजलेला तिच्या मनातील राग काही प्रमाणात तरी का
होईना पुन्हा उफाळला नसेलच का? रस्ता क्रॉस केल्यानंतर आणखी मदत मिळावी, असा मोह
तिला झालाच नसेल का? माणूसकीच्या नात्याने मिळालेल्या मदतीचे आभार प्रदर्शन
करण्याची तिला वा हात सोडताना 'बाय' म्हणण्याची मला गरज का भासली नाही? माणूसकीचा
व्यवहार मीच पार केला असे जणू सांगण्याचा मदमस्त भाव त्यात होता का? मी डोळस
असल्याचा तिला किती मत्सर वाटला असेल? भावभावनांचे असे गुंतवळे मनात बराचवेळ उगाचच
पिंगा घालत होते. यातून एक नक्की कळते, 'काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर' या षड् रिपुंचे कमी अधिक प्रमाणातील सानिध्य
म्हणजेच सजीवता होय.
असा मनातील विचार मांडणे, असे संवाद साधणे, हे सारे घडते ते शब्दातल्या
अक्षरांच्या सानिध्याने. शब्दांना दिलेल्या भाषीक अर्थातून वावरण्याची आपल्याला
इतकी सवय होते की भाषेतील अक्षर आणखी काही करू शकते याचे भानच हरवून जाते. 'शब्द
विश्वव्यापी असतो' असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण सागरावरील अनेक वर्षांच्या
सानिध्यात, निश्चल नीरव शांततेच्या परिसरात, 'मराठी अक्षर विश्वव्यापी' आहे याची
अनोखी अद् भूत जाणीव झाली. नव्हे जणू
याचा प्रत्यय, प्रचिती व साक्षात्कार झाला असेच म्हणता येईल.
बर्याच अनोख्या गोष्टींचा उलगडा महासागरावरील शांततेमुळे झाला. त्यातील
महत्त्वाच्या काही गोष्टी, ''''मराठी अक्षराच्या सुरवातीला व शेवटी नेमका,
निश्चित, समान व सारखा विराम येतो कारण प्रत्येक मराठी अक्षराचा शेवट स्वराने
होतो. त्यामुळेच अक्षराचा उच्चार र्हस्व वा दिर्घ असला तरी तो शब्दातील
अक्षराच्या क्रमवार स्थानाप्रमाणे 'नियमीत, लांबडा वा तोडका' असा स्वाभाविकपणे
'खास शिक्षण न घेताही प्रत्येक मराठी व्यक्तीला' उच्चारता येतो. संगीतातील सुक्ष्म
कालमापनात वावरण्याची सहज सुंदरता यामुळे मराठीला प्राप्त होते.''' अशा मांडता
येतात.
भाषेतील शब्द बदलतो. शब्दातील त्याच अर्थासाठी नवा शब्द येऊ शकतो. उदा - मराठीत
वेळ यासाठी सर्रास टाईम शब्द वापरला जात आहे. त्याच शब्दाला नवा अर्थ सुद्धा
प्राप्त होऊ शकतो. उदा - मामा हा 'नात्याची ओळख देणारा शब्द', जेव्हा आपण 'त्याचा
अगदी मामा झाला' असे म्हणतो, यात तोच शब्द कोणते नाते सांगतो?! 'वाट दाखवली' आणि
'वाट लावली' यात आपण 'वाट' शब्दाचीच 'वाट' लावतो!
साडेतीन हजार वर्षांपूर्वी संस्कृत भाषेतून वेद-उपनिषदे निर्माण झाली.
त्यानंतर हजार वर्षांनी माननीय पाणिनींना संस्कृत भाषेतील शब्द बदलत चालल्याचे
लक्षात आले. पाणिनिंनी 'संस्कृतला बदलण्याची संधीच मिळणार नाही' या एकमेव
तत्त्वावर संस्कृतचे व्याकरण 'धातु' या संज्ञे भोवती गुरफटून निर्माण केले. 'धातुं'ना
विकरण व गण लावून संस्कृतचे शब्द बनतात. पाणिनींनी 2115 धातुंमधून संपूर्ण संस्कृत
भाषेचे व्याकरण निर्माण केले. संस्कृतने 'शब्द' ही भाषेतील व्यवस्था सुक्ष्म मानली.
त्यामुळे शब्दालाच बदलण्याची संधी द्यायची नाही या तत्त्वावर संस्कृत जपली गेली.
शब्द याहून ध्वनीच्या सुक्ष्मतेत संस्कृतला पोचता आलेले नाही.
व्यंजनाचे उदाहरण – संस्कृतने 'चाणक्य' मधल्या 'च्य' उच्चाराचा स्विकार व्यंजन
म्हणून केला. जोडाक्षर ठरू शकणार्या उच्चारालाच व्यंजन मानणार्या संस्कृतला
ध्वनीची सुक्ष्मता कळली आहे असे म्हणता येत नाही. मराठीने 'चमचा' मधला 'च' व्यंजन
म्हणून स्विकारला आहे कारण त्यात सुरवातीपासून शेवटपर्यंत एकच अखंडीत ध्वनी ऐकू
येतो.
स्वराचे उदाहरण – संस्कृतने 'ए' हा स्वर संयुक्त मानला आहे. 'अ+इ' वा 'अ+ई' वा 'आ+इ' वा 'आ+ई' म्हणजे 'ए' असे संस्कृतचे
व्याकरण मानते. जगात कोणीही 'ए' स्वर उच्चारून बघावा तो सुरवातीपासून शेवटपर्यंत एकाच
अखंड ध्वनीतून ऐकू येतो. मराठीसाठी 'ए' हा स्वर संयुक्त ठरत नाही.
व्यंजन आणि स्वर यांच्यातलाच सुक्ष्मपणा संस्कृतला जपता आलेला नाही. त्यामुळे
अक्षर या संज्ञेपर्यंत पोचणे संस्कृतला शक्य झालेले नाही. धातु भोवतीच
गुरफटल्यामुळे संस्कृत भाषेला नवे शब्द संस्कृतला स्विकारता येत नाहीत. नवे संशोधन
म्हणजे नवा विचार होय. नवा विचार नवे शब्द घेऊन येतो. नव्या शब्दांचा जन्मच मुक्त
व मुबलकपणे संस्कृतमधून होत नाही. त्यामुळेच वेद-उपनिषदे यांच्यातून लागलेल्या
शोधांनंतर गेल्या दोन हजार वर्षांत कोणताही शोध संस्कृत भाषेतून लावता आला नाही. संस्कृत
म्हणजे 'देव भाषा' अशी जाहीरात झाल्याने इतर भारतीय भाषा संस्कृतच्या मांडलीक
म्हणून वावरत राहील्या. वेद-उपनिषदे यानंतर गेल्या हजारो वर्षात भारतात नवे शोध
लागलेच नाहीत, त्यानंतरचे सर्व शोध युरोप अमेरीकेत लागले!
अक्षर ही भाषेतील व्यवस्था सर्वात सुक्ष्म असल्याचे मराठीला निश्चितपणे कळलेले
असून त्याचा शास्त्रीयतेने भाषेत वापर करणे जमले आहे. मानवाच्या भाषांना समान
पातळीवर आणण्याचे काम केवळ मराठी भाषाच करू शकते कारण मराठीतील अक्षर ही संकल्पना
भाषांच्या जागतिकीकरणात सर्वसमावेशक ठरते. कोणत्याही मानवी भाषेतील अक्षर-उच्चार
मराठीतून मांडता येतो. विविध भाषांच्या उच्चारात जरी भिन्नता असली तरी उच्चारातील
'व्यंजन' व 'स्वर' यांची ओळख मराठी अक्षरातून समान राहते. उदाहरण – 'फादर' या
इंग्रजी उच्चारातील 'फ' आणि 'फणस' या मराठी उच्चारातील 'फ' भिन्न असले तरी त्यांचे
उच्चारीत व्यंजन 'प, ग, न, . . .' असे कोणतेही इतर ठरत नाही, ते 'फ' असेच ठरते.
भव्यतेकडे पोचता येणारा प्रवास सुक्ष्मतेतूनच सुरू होतो. फिजिक्स मध्ये
वस्तूमान व उर्जा यांची सुक्ष्म रुपे अणु आणि क्वान्टम शोधता आला म्हणून मानवाची
एवढी प्रगती झाली. अणूतून रेणू बनतात व त्यातून वस्तूमान साकारते. मराठीतील व्यंजन
व स्वर हे मानवाचे भाषीक अणू ठरतात. त्यांच्या संयोगातून अक्षर बनते व त्यातून
शब्द साकारतात. हायड्रोजन आणि ऑक्सीजन हे अणू आहेत. त्यांच्या संयोगातून (H2O) पाणी बनते. व्यंजनाला
त्यानंतर स्वर जोडून (व्यंजन+स्वर) मराठीतील बाराखडीतून
शिकवले जाणारे अक्षर बनते. मराठी ही अशी अचूक नैसर्गिकपणावर अवलंबून आहे.
संस्कृतचे अक्षर बाराखडी या माध्यमातून शिकवले जात नाही.
निसर्ग मानवाला भाषेतून काय देऊ शकतो आणि भाषेने त्यातील काय, कसे, कुठे व
किती घेतले आहे हे मांडता आले तरच भाषांचे जागतिकीकरण पूर्ण होईल. भाषेतील ध्वनीचे
सुक्ष्मरूप ओळखण्यासाठी ध्वनीच्या विरामाची निश्चित जाणीव होणे गरजेचे आहे.
मराठीने स्विकारलेली व्यंजन, स्वर, अक्षर यातील सुक्ष्मतम भूमिका कशामुळे साध्य
करता आली याचा कित्येक वर्षे सखोल अभ्यास करताना '''मराठीला विरामाचे अस्तीत्व
सर्वोत्तम रितीने उमगल्याचे''' लक्षात आले.
आपल्याला सामान्यपणे कळणारा विराम म्हणजे 'ध्वनी नसलेली शांतता' कशी व कितपत
जाणवते यावर थोडी चर्चा करू. मुंबईतील चिराबाजार व मसजिद येथे राहणार्यांना दादर
व माटूंगा येथे जास्त शांतता जाणवते. शहरी माणसाला खेडेगावात शांतता जाणवते.
खेडेगावातील माणसाला रानात शांतता जाणवते. याहीपेक्षा दाही दिशांना जणू सजीवताच
नसलेली अचल शांतता केवळ महासागरात अनुभवता येते. लहानपणी फुरफुर्या स्टोच्या
आवाजात एकीकडे स्वैपाक होत असताना, सकाळचे सर्व व्यवहार घरातून पार पडायचे. त्या
फुरफुर्या स्टोच्या आवाजाचे अस्तित्वच विसरले जायचे. तो स्टो बंद झाला की त्या
बंद झालेल्या आवाजाचा साक्षात्कार 'अरे आवाज होता वाटतं' असा नव्याने होत असे. रेल्वे
स्टेशनवर मी माझ्या मित्राशी बोलत असताना आजुबाजुला असंख्य शब्द व अनंत ध्वनी हवेत
घुटमळत असतात. पण त्यासर्वांकडे आपोआप दुर्लक्ष करत मला मित्राशी संवाद साधता
येतो. जणू रेल्वे स्टेशनवरील गदारोळात केवळ आम्ही दोघेच ध्वनी-निर्मिती करत असतो
(!) इतकी इतर सर्व ध्वनींकडे पाठ फिरवता येते. ते ध्वनी कानावर पडतात पण ऐकू येत
नाहीत. म्हणजेच असंख्य ध्वनींना आपण आपल्या शांततेत सामावून घेतो. कानावर पडत
असतात पण ऐकू येत नाहीत असे किती ध्वनी आहेत? आपण किती ध्वनींना आपल्या शांततेत
स्थान दिले आहे? असा शोध घ्यायचा प्रयत्न केल्यास 'शांततेचा आवाज' ऐकू येऊ लागतो!
जन्म झाल्यावर ध्वनीचा उपजतपणे जो अर्थ कळतो तो केवळ संगीतमय अर्थ असतो. सर्व
सजीव प्राण्यांच्या आयुष्यात ध्वनीतील हे भावनीक गुणधर्म जणू समान पातळीवर येतात.
कुत्र्याला दुखापत झाली की त्याने मारलेली किंचाळी इतर प्राणी ऐकतात व त्यांना
कुत्र्याला दुखापत झाली आहे याचे नक्की ज्ञान होते. हसताना वा रडताना उमटणार्या
ध्वनीतून प्राण्यांची भाषा वावरत नसून जणू सजीवता ओघवत असते. शब्दांच्या
व्याप्तीतून प्रत्येक मानवी भाषा जरी भिन्न असल्या तरी 'सजीवतेला उमगणारी व
फ्रिक्वेन्सीतून साकारणारी' अशी भावनीक भाषा 'अक्षराला संगीताचे सूर लावून'
प्रत्यक्षात आणता येते. कारण शब्दाला असतो तसा भाषीक अर्थ अक्षराला नसतो व
त्यामुळे केवळ संगीताच्या सुरांची भाषा अक्षरातून स्वच्छदी मुक्तपणे वावरू शकते.
जणू यालाच आपण 'शास्त्रीय संगीत' अशा नावाने ओळखतो. 'अक्षर'च्या निर्मितीत 'अक्षर'
उच्चाराच्या भाषीकपणालाच फ्रिक्वेन्सीची जोड संस्कृतने दिलेली आहे. संस्कृत
अक्षरातील स्वराचा उच्चार उदात्त (High pitch),
अनुदात्त (Low pitch) आणि स्वरिता (Falling pitch) असाही होतो आणि त्यामुळे
संस्कृत शब्दाचा भाषीक अर्थ बदलतो. उदा – 'इंद्रशत्रु' याच शब्दाचा उच्चार उदात्त
ऐवजी अनुदात्त केला तर त्या शब्दाचा भाषीक अर्थ 'इंद्राला मारणारा' याऐवजी 'इंद्र
ज्याला मारणार आहे तो' असा होतो. मराठीसाठी हे सारे अगम्य, अनोखे व विचित्र आहे.
कारण मराठीने अक्षराला कोणत्याही फ्रिक्वेन्सीवर अवलंबून ठेवलेले नाही. प्रत्येक
मराठी अक्षर कोणत्याही फ्रिक्वेन्सीत उच्चारता येते आणि त्यातून बनणार्या शब्दाचा
भाषीक अर्थ मुळीच बदलत नाही. त्यामुळे मराठीचे अक्षर 'फ्रिक्वेन्सी-विरहीत'पणातून
जन्मलेले आहे असे म्हणता येते.
याच विचाराचे क्षितीज आकाशासारखे विस्तृत होण्यासाठी ध्वनीच्या सुक्ष्मतेतून
भव्यतेकडे प्रयाण करावे लागते. 'गद्य, पद्य व संगीत प्रत्येक भाषेत असते. ध्वनी
(बोलणे-ऐकणे), कागद (लिहीणे-वाचणे), संगणक (टाईप करून त्याचा संग्रह वा प्रक्षेपण
करणे) अशी भाषेची तीन माध्यमे आहेत. प्रत्येक भाषेत शब्द असतात. शब्दात अक्षरे
असतात. अक्षरात व्यंजन-स्वर असतात. 'व्यंजन-स्वर', 'अक्षर', 'शब्द' या गोष्टी
प्रत्येक भाषेला या ना त्या स्वरूपात स्विकाराव्याच लागतात. हे सारे निसर्गाने
मानवावर लादलेले नियम आहेत. याप्रत्येकात समान केवळ एकच गोष्ट असते ते म्हणजे
'अक्षर' होय. मानवाच्या कोणत्याही भाषेतील अक्षराची ओळख करून घेणारे 'अक्षर' मराठी
'अक्षर' आहे. मराठी गद्यातील ध्वनी आणि मानवी संगीतातील ध्वनी यांची तुलना करून
'अक्षर' ही मराठी संकल्पना सर्वव्यापी कशी ठरते ते पाहू.
संगीत-रत्नाकर सारख्या मान्यवर ग्रंथात '''श्रृती म्हणजे संगीतातील ध्वनींची
ओळख होय. श्रृतीचा उच्चार म्हणजे सूर होय.''', असे उत्तमपणे मांडले आहे. पण अशा
संस्कृत ग्रंथातून 'ध्वनी, स्थिरनाद, स्वर आणि वर्णोच्चार' अशा शब्दांचा संबंध
संगीताशी जोडलेला आढळतो. संगीत याचा मूलभूत गाभा हा केवळ ध्वनीतील फ्रिक्वेन्सी
असतो. संस्कृत भाषेच्या हे जरी लक्षात आले तरीही त्याचा संबंध भाषेतील 'ध्वनी,
स्थिर-नाद, स्वर आणि वर्णोच्चार' यांच्याशी कसा जोडायचा ते संस्कृत भाषेला तिच्या
भाषीक मर्यादांमुळे जमले नाही. वर्ण या शब्दात भाषीक ध्वनी एककांची मोळी संस्कृतला
बांधावी लागली कारण व्यंजन व स्वर यांची निश्चित व्याख्या संस्कृतला जमलेली नाही.
'उच्चारीत ध्वनीचा ऐकू येणारा एकक' या सुक्ष्म विचारापर्यंत संस्कृतला पोचता आले
नाही. निसर्गनिर्मित उच्चार सिद्धांताला बगल देऊन संस्कृतमधील अक्षराचा उच्चार
'लघू, गुरू, प्लुत व काकपाद' अशा चार कालमापनातून होतो. 'अ' आणि 'आ' यांचा कमीतकमी
वेळेत करता येणार्या निसर्गदत्त उच्चार-वेळेला अनुसरून अक्षराचा उच्चार लघु व
गुरू पुरताच मर्यादीत ठेवणे मराठीला स्विकारता आले आहे. त्यामुळे गद्य, पद्य व
संगीत यांच्या प्रवासातील सर्वात सुक्ष्म ध्वनी मराठी अक्षर ठरते.
ध्वनीचा 'जातीगुणवैशिष्ट्य' हा गुणधर्म गद्यातून,
'जातीगुणवैशिष्ट्य+उच्चाराचे कालमापन' हे दोन
ध्वनी-गुणधर्म पद्यातून
आणि 'जातीगुणवैशिष्ट्य+उच्चाराचे कालमापन+फ्रिक्वेन्सी' हे तीन ध्वनी-गुणधर्म संगीतातून,
'अक्षर' या एकाच संकल्पनेला लावून मराठी भाषा वावरते.
त्यामुळे संगीत कर्नाटकी वा हिन्दुस्थानी, परदेशी वा शास्त्रीय, गायक वा वादक,
सिनेमा वा नाट्य अशा कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याचा आस्वाद 'अक्षर' याच
संकल्पनेशी संबंधीत ठेऊन घेणे मराठीला शक्य आहे. जशी श्रृती ही नादाची मेंदूत
प्रस्थापीत झालेली ओळख ठरते तसेच मराठीतील 'अक्षर' हे मेंदूत प्रस्थापीत झालेली
ओळख आहे. जसे श्रृतीला दिलेले ध्वनीरूप म्हणजे संगीत-ध्वनीतला सूर ठरतो तसेच
'अक्षराचे' मुखातून केले गेलेले ध्वनी-प्रक्षेपण म्हणजे भाषेतील उच्चार-एकक ठरतो.
मराठीतील 'अक्षर' ही संकल्पना मेंदूशी निगडीत आहे. कागदावर आपण त्याचे ध्वनी-चिन्ह
उमटवतो. त्यामुळेच मराठीला मोडी, देवनागरी प्रमाणेच इंग्रजी लिपीतून वा परदेशातील
इतर लिपीतूनही वावरता येते. अशा सर्वसमावेशक ठरणार्या मराठमोळ्या मुक्या अक्षरातच
त्याच्या उच्चाराला लागणारे मूलभूत कालमापन गोंदवलेले असते. मराठी अक्षराला
संगीतातील प्रत्येक सप्तकातील बारा स्वर जोडून, सर्वांना सहजतेने कळेल अशा
कागदावरती चिन्ह स्वरूपात आणता आले तर जगातील सर्व भाषांतील संगीतापर्यंत मराठी
भाषीक स्वतःच पोचू शकतील.
याच विचाराला आता पुर्णत्व देण्यात यश प्राप्त केले आहे. नुकत्याच सादर
केलेल्या 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' मधून मराठीचे अक्षर संगीताला लागणारे
'जातीगुणवैशिष्ट्य+उच्चाराचे कालमापन+फ्रिक्वेन्सी' हे तीन ध्वनी-गुणधर्म एकत्रीतपणे हाताळू
शकणार आहे.
''कोणत्याही भाषेतील उच्चारीत ध्वनीला मराठी अक्षरातून पेलता व सांभाळता
येते'', ''मराठी अक्षराचा उच्चार केवळ लघू व गुरू या नैसर्गिकपणातून सांभाळला जाऊ
शकतो'' आणि ''मराठीचे अक्षर 'फ्रिक्वेन्सी-विरहीत'पणातून जन्मलेले आहे'' या तीन
महत्त्वाच्या अद्वितीय व अनोख्या गुणधर्मांमुळे मराठी अक्षर, 'मानवी भाषेतील
संगीतासाठी सर्वसमावेशक' ठरू शकते.
कोणत्याही भाषेच्या भाषा तज्ञांनी हे विधान खोडून दाखवावे असा आव्हान आणि आवाहन या लेखातून करत आहे. 'मुक्या अक्षरांतून संगीताच्या नादरम्यतेकडे' जगाला नेण्याची क्षमता मराठी अक्षरात आहे.
कोणत्याही भाषेच्या भाषा तज्ञांनी हे विधान खोडून दाखवावे असा आव्हान आणि आवाहन या लेखातून करत आहे. 'मुक्या अक्षरांतून संगीताच्या नादरम्यतेकडे' जगाला नेण्याची क्षमता मराठी अक्षरात आहे.
चला, भाषांच्या जागतिकीकरणात मराठी अक्षरातून मानवांना
एकत्र आणू आणि जगाला मोठे करू.
मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी ‘सर्वसमावेशक मराठी’
या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर सामिल व्हा.
No comments:
Post a Comment