बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Sunday, 9 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 30 – मोडी-लिपीच्या अनुषंगाने देवनागरी चिन्हांचा मराठी गद्यासाठी वापर –




युनिकोड ते साऊंडकोड लेख 30 –
मोडी-लिपीच्या अनुषंगाने देवनागरी चिन्हांचा मराठी गद्यासाठी वापर –

इंग्रजांच्या कलकत्त्यातील छापखान्यात मराठी भाषा छापून पुस्तके प्रसिद्ध करायचे ठरले. त्यावेळी व्यवहारातून महाराष्ट्रात आणि देशभर मराठी भाषा गद्य स्वरूपात मोडी-लिपीतून वावरत होती.

कागदावर मोडी लिहीणे सोपे होते. टाक (त्यावेळचे शाईच्या दौतीत बुडवून लिहीणारे पेन) न उचलता भराभरा पूर्ण शब्द कागदावर मोडीतून लिहीता येत. शिवाजी महाराज, पेशवे यांच्या राज्यकारभारात केवळ, निव्वळ, फक्त मोडी वापरली गेली. यात होती केवळ एक-वेलांटी व एक उकार. भारतभरच्या विविध राज्यकर्त्यांनी आर्थिक व्यवहारात, करारनाम्यात, जमीनजुमल्याच्या देवाणघेवणीत, . . . वगैरे सर्व ठिकाणी मोडीचा वापर सर्रास व मुक्तपणे होत होता.

मोडी लिपीचा वापर करत मराठी भाषा गद्यातून केवळ एक-वेलांटी व एक-उकार वापरत होती. हे मराठीचे उपजत मूलभूत अंतरंग अत्यंत नैसर्गिक व शास्त्रीय ठरते. मोडी-लिपीला संस्कृत भक्तांनी उगाचच नावे ठेवली. 'धावरी लिपी' पासून ते 'पिशाच्य लिपी' पर्यंत जणू शिवीगाळ केल्यासारखे मोडीला कमी प्रतीने हिणवले गेले. खरे म्हटले तर व्यंजन व स्वर यांच्या ध्वनीतील कालविरहीत सुक्ष्मक ठरणारा केवळ नाद गद्यातून वापरण्याची ती अत्यंत नैसर्गिक शास्त्रीयता ठरते.

भाषा म्हणून भारतीय राज्यकारभारात संस्कृतला वावरता आले नाही. भारतीय भाषांत ते केवळ मोडीलिपी वापरणार्‍या मराठीला साध्य झाले. हा भाषांच्या राज्यकारभाराचा इतिहास कोणीही पुसू शकणार नाही.

गद्यातून जरी मराठीने एक-वेलांटी एक-उकार असलेली मोडी वापरली तरी पद्यातून वावरताना मात्र मराठी भाषेने शेकडो वर्षे 'बाळबोध' लिपी वापरली. यात दोन-वेलांट्या व दोन-उकार होते. पद्यासाठी दोन-वेलांट्या व दोन-उकार वापरणे अत्यंत नैसर्गिक व शास्त्रीय ठरते कारण पद्यील लयतालविचार हे उच्चाराने घेतलेल्या वेळेवरती अवलंबून असतात. गद्यासाठी उच्चारीत अक्षरातील कालविरहीत सुक्ष्मक ठरणारा नाद आणि पद्यासाठी अक्षराने उच्चारासाठी घेतलेला वेळ याचे निश्चित, विभक्त व भिन्न अस्तित्व केवळ मराठीला उमगलेले आहे. अशी नैसर्गिक शास्त्रीयता मराठीला केवळ उमगली नसून मराठीला ती भाषा म्हणून वापरता आली. त्यातील अशी नैसर्गिक शास्त्रीयता नीटपणे जपली जावी, समाजाला व्यवस्थीतपणे वापरता यावी, कोणत्याही लिखीत पुस्तकी व्याकरणीय नियमांशिवाय मराठीला कायम स्वरूपी वावरता यावे, यासाठी मराठीने गद्यासाठी मोडी आणि पद्यासाठी बाळबोध अशा दोन भिन्न लिप्या वापरल्या.

मानवाच्या प्रत्येक भाषेत गद्य व पद्य असते. गद्य व पद्य यातून दोन भिन्न अर्थ साकारतात. ध्वनीतल्या गुणधर्मांतील असे कोणते भाग मानवाला गद्यात आणि पद्यात वापरावे लागतात? याबाबतचे स्पष्टीकरण विवेचनात्मक व वर्णनात्मक रित्या भाषेच्या व्याकरणातून देणे यापेक्षा गद्यातील लिपीतून (मोडीतून) आपोआप गद्यासाठीचे ध्वनीतील नैसर्गिक गुणधर्म आपोआप पाळले जातील आणि तसेच पद्यासाठीच्या लिपीतून लयतालविचारांना उपयुक्त ठरणारे ध्वनीतील नैसर्गिक गुणधर्म आपोआप पाळले जातील हे मराठीने घडवले.

यामुळेच कोणत्याही पुस्तकी व्याकरणाची गरज न लागता मराठी जनमानसात मुक्तपणे वावरत होती. गद्यासाठी तिला कोणत्याही 'शुद्धलेखन नियमावली'ची गरज भासली नाही. समाजातील कोणीही मोडीतून लिहीलेले मराठी आपोआपच प्रमाण बद्ध ठरत होते. मराठीतील कोणत्याही बोलीने वापरलेले उच्चारीत अक्षर कागदावर चिन्ह स्वरूपातून उमटताना त्यात निश्चित खात्रीलायकपणे आपोआप प्रमाणीकरण साधले जात होते. हा सारी अद् भूतता, अद्वितीयता, अनोखेपण मराठीने गमावले कारण मराठीवर देवनागरी लिपीचा वापर संस्कृतसारखा करायची जबरदस्ती केली गेली.

समजा तुम्ही आणि मी, भारतात इंग्रजांनी प्रिंटीग टेक्नॉलॉजी आणली त्याकाळात म्हणजे 1800 सालात वावरत आहोत! छपाईसाठी मोडी-लिपी त्याज्य ठरते असे नक्की समजले आहे. त्यामुळे मराठीने यापुढे देवनागरीतून वावरण्याची गरज सुद्धा सर्वांनी मान्य केली आहे. तर आपण देवनागरीतील कोणती चिन्हे मराठीने मोडी-लिपीच्या अनुषंगाने गद्यासाठी वापरावीत असे ठरवले असते?

अहो अगदी सोपे आहे. 'मोडी लिपीप्रमाणेच देवनागरी चिन्हांतील एक-वेलांटी व एक-उकार गद्यातून' आणि 'बाळबोध लिपीप्रमाणे दोन्ही-वेलांट्या दोन्ही-उकार पद्यातून' मराठीने वापरणे अत्यंत स्वाभाविक ठरले असते. होय ना? किती साधा सुलभ विचार आहे हा.

पण असे घडले नाही. जर असे घडले असते तर . . .

1) कोणत्याही बोलीतील मराठी अक्षर आपोआप प्रमाणभूत ठरले असते आणि त्यापाठोपाठ विविध बोलीतले शब्द मराठीत सहजतेने येऊन मराठीचे वैभव वाढले असते. 'पाणी' आणि 'पानी' या दोन्ही शब्दांना मान्यता मिळाली असती. कोणता तरी एक शुद्ध (उच्चप्रतीचा) व दुसरा अशुद्ध (नीचप्रतीचा) ठरला नसता.

2) मराठीला 'शुद्धलेखन नियमावली'ची गरज भासलीच नसती. वर्तमानपत्रे, मासिके, प्रकाशने, इतकेच काय मंत्र्यांपासून शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना स्वतःचे मराठी स्वतःच लिहीता आले असते. कथा, कादंबरी, बातमी व अग्रलेख यांच्या मजकूरातील शुद्धलेखनात कधी चुकाच घडल्या नसत्या. निबंधातील विचार व भावना यांना मार्क मिळाले असते, शुद्धलेखनासाठीचे मार्क कापावे लागले नसते.

3) भाषेचे व्याकरण प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकवण्या ऐवजी, 'प्राथमिक शाळेतून मराठीच्या अक्षराची जडणघडण' आणि 'माध्यमिक शाळेतून मराठी शब्दांचे व्यवस्थापन' शिकवून भागले असते. व्याकरणातील कोणते प्रकरण आणि शुद्धलेखन नियमातल्या अठरा नियमांपैकी कोणते नियम कोणत्या इयत्तेला शिकवावेत? असा प्रश्नच उपस्थीत झाला नसता. मुलांना मराठीतून त्यांच्या प्रज्ञा व प्रतिभांना फुलवता आले असते. चुकीच्या पुस्तकी व्याकरणातून व शुद्धलेखन नियमांमुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' या म्हणीप्रमाणे 'मराठी नको पण व्याकरण-शुद्धलेखन आवर' असे म्हणण्याची वेळ आली नसती.

4) 'अहो, जगातील सर्व भाषांना व्याकरण असते. तसेच मराठीचे व्याकरण तुम्ही शिका. मराठीची शुद्धलेखन नियमावली पाळा' अशी सक्ती करावी लागली नसती. चुकीचे पुस्तकी व्याकरण आणि त्यातून काढावे लागलेले अयोग्य शुद्धलेखन नियमावली यामुळे मराठीचे लिहीते हातच कापले गेले आहेत. साधीसोपी मराठी भाषा क्लिष्ट व कठीण बनवली गेली आहे तिची अशी विटंबना कधीच झाली नसती.

जगातील इतर सर्व भाषा लहानपणापासून व्याकरण शिकवतात म्हणून मराठीनेही तसेच केले पाहीजे असे नाही. जगातील इतर भाषा, अगदी संस्कृत धरून सर्व भाषा, मराठी इतक्या नैसर्गिक व शास्त्रीय नसल्याने त्यांना स्वभाविकपणे वावरता येत नाही. अशा कृत्रीम व अनैसर्गिकपणावर अवलंबून असणार्‍या भाषांना त्यातील व्याकरण शिकवण्याची गरज भासतेच.

इंग्रजी कालखंडात प्रिंटीग टेक्नॉलॉजीला मोडीची चिन्हे बनवून, त्याची जुळणी करणे, यात बरेच अडथळे यऊ लागले. कारण त्या टाईप केलेल्या मजकूरातील पूर्ण शब्दाचे लेखन जणू सलग रितीने झाल्याचे दिसावे यासाठी परिश्रम, वेळ व खर्च प्रचंड येत होता. यातूनही टाईप झालेला मजकूर मोडीच्या हस्त-लिखीतासारख्या वळणदार दर्जाचा येत नव्हता. मराठी भाषेला इंग्रजी रोमन वा संस्कृतच्या देवनागरी लिपीतून वावरता येते, हे सर्वांच्या लक्षात आले. इंग्रजी रोमन लिपीपेक्षा भारतीय मान्यवर संस्कृत लिपीतून बर्‍याच व्यक्ती मराठीचे लेखन करीत असल्याचे लक्षात आले. देवनागरी लिपीतील प्रत्येक अक्षर तटस्थ असून ते दुसर्‍या अक्षराला जोडलेले नसते. त्यामुळे मराठी भाषेतील पुस्तकांची छपाई देवनागरीतून होऊ लागली.

अत्यंत जलदगतीने पुस्तकांची होऊ लागलेली निर्मिती म्हणजे नवे आधुनिक युगाचा उदय ठरला होता. हस्तलिखीत पुस्तकांना लागणार्‍या वेळेशी याची तुलनाही करता येत नव्हती. सर्व मान्यवर, प्रतिष्ठीत व विद्वान या पुस्तक-छपाईच्या नव्या गतीमान विश्वाकडे अचंब्याने पाहू लागले. भारतातील प्रत्येक भाषेला यात सहभागी होण्याची घाई लागली होती. त्या कालखंडात 'पुस्तकांची भाषेतून छपाई' याच विषयाला प्राधान्य मिळाले. त्यामुळे सर्व देवनागरी चिन्हांचा स्विकार मराठीतल्या गद्यात केल्यामुळे होऊ शकणार्‍या विपरीत परीणामांचा विचारच कोणाला करण्याचे भान राहीले नाही. प्रसिद्ध होऊन समाजात वितरीत होणारे मराठीचे प्रत्येक पुस्तक मराठी भाषेला उध्वस्त करत असल्याचे लक्षात आले तेव्हा फार प्रचंड काळ निघून गेला होता. छपाईतून बाहेर पडणार्‍या मराठी पुस्तकांचा प्रचंड वेग मराठीवर त्याच गतीने संस्कृत भाषेचे मांडलीकत्व स्विकारायला भाग पाडत होता. याची भारतातील छपाईला वेगवान गती देण्याची किमया, माननीय विल्यम केरी या इंग्रजी गृहस्थाने केली असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

पुस्तके छापण्याचे गतीमान युग स्थिरस्थावर होता होताना मराठीची अतोनात हानी घडून आली होती. कारण मराठीला संस्कृतच्या व्याकरणाचे कातडे घालण्याचाच प्रयत्न कळत नकळत झाला होता, घडला होता. त्यावर 1951 साली, (म्हणजे माननीय विल्यम केरी यांनी मराठीचे पहीले छापील व्याकरण 'A grammar of the Mahratta language' 1805 साली आणल्यापासून, अंदाजे दिडशे वर्षांनंतर !) खेर मंत्रीमंडळाने मोडी-लिपीला मोडीत काढून अधिकृतपणे देवनागरीचा स्विकार केला तेव्हा शिक्कामोर्तब झाले.

त्या दिडशे वर्षांच्या कालखंडाला 'मराठीवर झालेले संस्कृतचे आक्रमण' म्हणता येते. 1951 पासून आजपर्यंतचा कालखंड हा 'मराठीची व्याकरणातून केलेली 'तत्सम' व 'तत्भव' या फाळणीचा काळ' ठरतो. पाकिस्तान भारतापासून वेगळे होण्याच्या फाळणीत जो आकांत घडला तो स्वाभाविकपणे दिसणारा होता. मराठीच्या 'तत्सम' व 'तत्भव' या फाळणीचे असेच वर्णन करता येते. प्रिंटिग टेक्नॉलॉजीच्या उदयात संस्कृतच्या देवनागरी चिन्हांतील दोन्ही-वेलांट्या आणि दोन्ही-उकार जसेच्या तसे, गद्यात व पद्यात दोन्ही ठिकाणी, स्विकारले गेले. आणि त्यातून पुढे संस्कृतच्या कागदी चिन्हांच्या कातड्यात पांघरल्या गेलेल्या मराठीची व्याकरणीय स्वरूपासाठी 'तत्सम' व 'तत्भव' अशी छिलके पाडावी लागली. त्यासाठीची उपाययोजना म्हणून कोणते कारण द्यावे? '''संस्कृतमधील बरेच शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत''' असे कारण पुढे केले गेले! अहो, जगातील कोणती तरी भाषा दुसर्‍या भाषेतील शब्द जसेच्या तसे स्विकारत नाही हे सार्‍या दुनियेला माहित असले तरी ते कारण अजूनही आपल्या पुस्तकी व्याकरणात समाविष्ट आहे. ज्या मराठीला मोडी-लिपीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत 'शुद्धलेखन नियमांवली'ची गरज भासली नाही, तिला चुकीच्या पुस्तकी व्याकरणामुळे 'शुद्धलेखन नियमांवली'ची आवश्यकता भासली. हरणाच्या डौलाने मुक्त स्वैरपणे कागदावर वावरणार्‍या मराठीला गद्यातून खेकड्याच्या तिरक्या चालीने चालण्यासाठी लेखन-नियम लादावे लागले. सर्व बोली भाषांना सहजपणे एकत्रीत आणू शकणार्‍या मोडी-लिपीचा त्याग करून, देवनागरीत मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरता विचार न करता, 'प्रमाणीत भाषा' या नावाखाली प्रतिष्ठीत व्यक्तींच्या पुणे परीसरातील शब्द मराठीला स्विकारण्यास भाग पाडले जात आहे. भाषेला मुक्तपणे वावरण्याची संधी देऊन त्यात आपोआप लेखनीय प्रमाणीकरण मोडी-लिपीतून साधले जात होते. कोसाकोसावर बदलत जाणार्‍या भारतीय भाषांनी 'भाषावार प्रांत रचने'पर्यंतचा प्रवास सहजतेने केला. त्याचप्रमाणे गतीमान प्रवासातील संवादांच्या आदानप्रदानातून त्या त्या भाषेचे-प्रमाणीकरण काळाच्या ओघात सहजतेने घडणार आहे. मराठीने आपला मराठमोळेपणा सोडून संस्कृत प्रचूर व्हावे यासाठी चाललेला अट्टाहास महाराष्ट्रातील मराठीला समाजापासून दुरावत नेत आहे. जर समाजच मराठी-भाषा सोडून दुसर्‍या भाषेच्या आहारी गेला तर संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषा रसातळाला जाणार आहेत. जर मराठी टिकली तरच महाराष्ट्रात संस्कृत टिकणार आहे. त्यासाठी मराठीने यापुढे आपल्या लिपीला 'मराठमोळी' नाव देऊन, संस्कृतपासून फारकत घेऊन, स्वतंत्र होण्याची नितांत आवश्यकता आहे.

मराठीने यापुढे देवनागरी चिन्हांचाच वापर करून, 'मोडी-लिपीच्या अनुषंगाने देवनागरी चिन्हांचा मराठी गद्यासाठी वापर' कसा करावा? त्यातील शास्त्रीयता व्यंजने, स्वर, अक्षरे आणि जोडाक्षरे यांबाबतचे वास्तववादी अचूक विश्लेषण 'मराठीची जडणघडण, व्यवस्थापन व व्याकरण' या ब्लॉगवरून करणार आहे.

मायमराठीच्या विकासात तुम्ही भाग घेणार ना?


आपला,  शुभानन गांगल
मोबाईल – 9833102727   ईमेल shubhanan.gangal@gmail.com  वेबसाईट - www.gangals.com

माननीय विल्यम केरी यांच्याबाबत आणि त्या अनुरोधाने त्याकाळात बदलत जाणार्‍या मराठीबाबतची थोडीशी माहिती –

इतिहासाने केलेल्या पुढील नोंदीतून याचे गांभीर्य लक्षात येईल. '''The Serampore Mission Press was established in Serampore, in the Hooghly district of Bengal, in 1800 by William Carey, William Ward and other British Baptist missionaries as an auxiliary of the Serampore Mission. The press produced 212,000 books between 1800 and 1832.'''

याचवेळी इंग्रजांना मराठी भाषेच्या व्याकरणाची गरज भासू लागली. राज्यकारभार ज्या भाषेतल्या व्यक्तींवर करायचा त्यांची भाषा येणे इंग्रजांसाठी फार महत्त्वाचे होते. मराठीला या काळापर्यंत कधी पुस्तकी व्याकरणाची गरज भासली नाही. मराठीच्या पुस्तकी व्याकरणाची गरज भासली ती इंग्रजांना! मराठीचे पहिले मान्यवर पुस्तकी व्याकरण लिहीले ते इंग्रजी अधिकारी सर कॅरी या गृहस्थाने!

तुम्ही इंटरनेटवर 'First Marathi Grammar book' असे टाईप केल्यास याबाबतच्या बर्‍याच (अंदाजे पन्नास हजार) नोंदी दिसतील. यातील विकीपिडीयातील पुढील इंग्रजीतील नोंद बघा.

'''The grammar of the Marathi language shares similarities with other modern Indo-Aryan languages such as Hindi, Gujarati, Punjabi, etc. The first modern book exclusively on Marathi Grammar was printed in 1805 by 'William Kerry'.'''

तसेच http://mr.wikipedia.org/wiki या ठिकाणी जाऊन तेथे 'मराठी व्याकरण' असे लिहून सर्च केल्यास पुढील भाग दिसेल.

'''१८०५मध्ये 'मराठी भाषेचे व्याकरण' यावर पहिले छापील पुस्तक विल्यम केरी यांनी प्रसिद्ध केले'''.

याहीपेक्षा आता गुगलने इंटरनेटवर मुक्त मोफत उपलब्ध केलेल्या पुढील तीन खास पुस्तकांचे डाऊनलोड माझ्या गुगल-ड्राइव्हच्या पुढील लिंक्स वरून करून देत आहे. यातील योग्यता, चुका आणि तृटी हा वेगळा विषय ठरतो, हे कृपया लक्षात घ्या. परकीय भाषेत वावरणार्‍या एखाद्या व्यक्तीला मराठी-भाषा किती समजेल?, त्यावर इंग्रजी, संस्कृत आणि इतर भाषांच्या त्याने केलेल्या अभ्यासाचा त्या काळानुसार किती व कसा परिणाम झाला आहे?, अशा असंख्य गोष्टी अभ्यासाचा भाग ठरतात. मराठीच्या इतिहासाचा अभ्यास करताना यांची खूप मदत होते, एवढे मात्र इथे नमूद करणे योग्य ठरेल.

1) A dictionary of the Mahratta language (देवनागरीचा वापर करून सन 1810 ला प्रकाशीत झालेले.), यासाठीची माझ्या गुगुल ड्राइव्हची लिंक – https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2WGQ1aWdRU0Vwa1E/edit?usp=sharing

2) A grammar of the Mahratta language (मोडीचा वापर करून सन 1839 ला प्रकाशीत झालेले.), यासाठीची माझ्या गुगुल ड्राइव्हची लिंक – https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2N0hVcEZpU2Z4RkE/edit?usp=sharing

3) The Principles of Murathee Grammar (देवनागरीचा वापर करून सन 1843 ला प्रकाशीत झालेले.), यासाठीची माझ्या गुगुल ड्राइव्हची लिंक – https://drive.google.com/file/d/0B-t9q1BYFBJ2R3hqeWF1bGtCRk0/edit?usp=sharing

अशा बर्‍याच जुन्या ग्रंथांच्या व पुस्तकांच्या प्रती इंटरनेटवरून प्राप्त होऊ शकतात.

Willam Carey यांच्या कार्याचा आढावा घेताना त्याबाबतच्या असंख्य नोंदीच्या ठळक गोष्टींची केवळ यादी चौदा पानांची आहे. सन 1805 ते 1830 या पंचवीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी केलेल्या बहूमुल्य कामाची उजळणी – '''His philological contributions to Oriental literature were immense. In 1805 he published his Grammar of the Mahratta language, which reached a second edition (8vo). This was followed by the Sungskrit Grammar, 4to. 1806 and 1808. Ramayuna of Valmeeki in the original Sungskrit with a prose translation and explanatory notes ; in conjunction with Dr. Marshmau, 4 vols. 4to. 1806 to 1810. Mahratta Dictionary, 8vo. r8io. Punjabee Grammar, 8vo. 1812. Telinga Grammar, 8vo. 1814. Bengalee Dictionary, 3 vols. 4to. 1818. ad ed. 1825. Bengalee Dictionary, a vols. 8vo. 1827 to 1830. The first volume consists of an abridgement of the 4to edition ; the second vol. is a dictionary English and Bengalee by Mr. J. C. Marshman. Bengalee Grammar, 4th ed. Colloquies in English and Bengalee, 3d ed. . . .  वगैरे'''.

विशेष म्हणजे ही सर्व कामे त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या क्षेत्रफळाबाहेर जाऊन स्वतःच्या हिकमतीवर, ब्रिटीश सत्तेच्या अधिकाराचा व पैसाचा वापर न करता, घडवून आणली.

No comments:

Post a Comment