बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Tuesday, 25 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 34 – चला शिकुया कविता करायला.



युनिकोड ते साऊंडकोड लेख 34 –

चला शिकुया कविता करायला.

कविता ही वृत्त, जाती आणि छंद अशा तीन प्रकारात कशी करायची याचे शिक्षण घेऊ.
आज आपण यातील केवळ 'छंद' या प्रकाराची प्राथमीक ओळख करून घेणार आहोत.

1)       प्राण्यांची व पक्षांची नावे लिहा –
घोडा, गाढव, हत्ती, उंट, बगळा, कोल्हा, माकड, वानर, कुत्रा, मांजर, बोका, साप, अजगर, पोपट, चिमणी, कबुतर, कावळा, घार, घुबड, बैल, गाय, कोकीळा, हरण, करकोचा,

2)       त्या नावांतील शेवट समान अक्षर असलेले शब्द निवडा –
समजा आपण पुढीलप्रमाणे समान अक्षराने शेवट होणारे शब्द निवडले.
1. वानर, मांजर,
2. कबुतर, अजगर,
3. बगळा, कावळा,
आता समजा आपण यातील कबुतर, अजगर ही जोडी निवडली.
या शब्दांना शेवटी ठेऊन कवितेच्या दोन ओळी आपण आता लिहू.
ते शब्द शेवटी ठेऊन आपल्याला त्याच्या आधीचे शब्द निवडायचे आहेत.
. . . . . . . . . . . . . . . . . कबुतर
. . . . . . . . . . . . . . . . . अजगर

3)       किती अक्षरांची प्रत्येक ओळ असलेली कविता करायची ते ठरवा –
समजा या कवितेत दोन्ही ओळींची अक्षर संख्या आपण समान ठेवणार आहोत.
त्यासाठी समजा आपण 12 संख्या निवडली.
म्हणजे आपण प्रत्येक ओळीतील अक्षर-संख्या 12 ठेवणार आहोत.

4)       निवडलेल्या अक्षरांमागे दुसर्‍या प्राण्यांची व पक्षांची नावे लिहा –
समजा आता पहील्या ओळीत 'कबुतर' शब्दाच्या मागे 'कुत्रा, माकड, वानर' अशी तीन नावे निवडलीत.
आणि दुसर्‍या ओळीत 'अजगर' शब्दाच्या मागे 'घोडा, गाढव, मांजर' अशी तीन नावे निवडलीत.
तर त्या दोन ओळी पुढीलप्रमाणे बनतील.

कुत्रा, माकड, वानर, कबुतर
घोडा, गाढव, मांजर, अजगर

बस्स, झाल्या की कवितेच्या दोन ओळी!

आता त्या लिहीलेल्या ओळी तालात म्हणा.
याला म्हणतात 'छंद' पद्धतीतली कविता.
यातील बारकावे शिकायची ही वेळ नाही.

हा आहे कविता करायचा पहीला धडा!

समजा यात तुम्ही 'बगळा, कावळा' हे दोन शब्द निवडले असतेत तर . . . .
वरीलप्रमाणेच कदाचीत पुढीलप्रमाणे कविता झाली असती!

कुत्रा, माकड, वानर, बगळा
घोडा, गाढव, मांजर, कावळा
काय, होय की नाही?!

आता जर त्याला थोडी अधिक अर्थपूर्णता द्यायची असली तर . . . .

शुभ्र असतो बगळा
काळा असतो कावळा

अशी सुद्धा बनवता येईल, होय ना?

यात आपण केवळ अक्षर-संख्या समान ठेवत आहोत.
अशा कवितेत लघु-गुरू अशा गोष्टी लक्षात घ्यायची गरज नाही.
त्या सार्‍या गोष्टींचा बाऊ आत्ताच करू नका.

समजा आपण 'आई, अंगाई' असे दोन शब्द निवडले.

. . . . . . . . आई
. . . . . . . . अंगाई

अशा पहील्या दोन ओळी होतील.

मुलांना 'आई' बाबतचे शब्द तुम्हीच सुचवा वा त्यांना सांगायला सांगा.
मग त्यातुन कोणत्या शब्दांची निवड ओळींसाठी करायची याचे मार्गदर्शन करा.

समजा आता त्यामागे पहील्या ओळीत 'सुंदर प्रेमळ माझी' असे शब्द टाकलेत तर त्या ओळीतील अक्षर संख्या होते दहा आणि नंतर 'नेहमी गाते गोड' हे शब्द दुसर्‍या ओळीत 'अंगाई' शब्दामागे टाकलेत की  त्या बनतात पुढीलप्रमाणे . . .

सुंदर प्रेमळ माझी आई
नेहमी गाते गोड अंगाई

काहीशी गळ्यावर म्हणता येईल, ताल व ठेका साध्य होईल असे साधे रूप आहे ना अशा कवितांना?
मग अशा प्रकारे असंख्य कविता शाळेतून व घराघरातून लहान मुलांना शिकवता येतील ना?

तरूणांनी आपल्या प्रेयसीच्या नावातील शेवटच्या अक्षराशी यमक जुळवेल असा छानसा शब्द निवडावा.
त्यासाठी 'रंभा, अप्सरा, परी, सुंदर, कोमल, शहाणी, छान, मस्त, . . . .' असे काय काय आणि कित्ती कित्ती शब्द तुम्हाला सुचतील!

वर दिल्याप्रमाणे त्याच्या दोन ओळी आधी जुळवा. मग तशाच 10-12 ओळींची छानशी कविता करा.

तुमच्या मनातील भावनांना शब्दांतून रंगवा.

सुज्ञास अधिक सांगणे नलगे ! ! !

सहजसुलभपणे सर्वांना शिकता येईल, अशा रितीने कवितांची ओळख निर्माण करूया.

कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.

आपला, शुभानन गांगल    मोबाईल – 9833102727   ईमेल – gangal@gmx.com   वेबसाईट - www.gangals.com

No comments:

Post a Comment