बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Monday, 27 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 16 – संगीतातील 'सारेगमपधनि' नोटेशन अक्षरांना जोडत टाईप करणारा मराठीचा युनिकोड-फॉण्ट उपलब्ध



 ‘युनिकोड ते साऊंडकोड’ याच्या व्याप्तीची ओळख एका नव्या क्षितीजापर्यंत या लेखातून पोचणार आहे. अशी अनेक क्षितीजे काबीज करण्याची क्षमता व धमक मराठीत आहे. अत्याधुनिक सहजसुलभ पद्धतीतून शास्त्रीय संगीताचे मराठीतून शिक्षण या छोट्या लेखातून केवळ मराठीचीच नव्हे तर मानवी भाषांच्या शिक्षणाची परीभाषाच बदलणार आहे. होय, ज्ञानेश्श्वरांची मायमराठी ‘सुक्ष्मतेकडून भव्यतेकडे’ किती दूर दूरवर झेप घेऊ शकते याचा अजुन जगाला थांगपत्ताही नाही. पण आता आपण एकत्रीतपणे मराठीतून ‘ध्वनी, कागद आणि संगणक’ या तिन्ही माध्यमांचा वापर करून, मानवी जीवनाला उपयुक्त ठरेल अशा नवनवीन गोष्टी आणणार आहोत.

प्रत्येक भाषेत ‘गद्य, पद्य व संगीत’ असतेच. प्रत्येक भाषेच्या ‘गद्य, पद्य व संगीत’ यातून अक्षर वावरते. ‘अक्षर’ बघून-वाचून अर्थ उमगण्याची प्रक्रिया सवयीमुळे सोप्पी वाटते पण संगीतातील सुरांबाबतचे नोटेशन सामान्य मराठी व्यक्तीला अगम्य, अनाकलनीय ठरते. आपल्याला जशी इंग्रजी, फ्रेंच, जपानी भाषा शिकायची असेल तर त्या त्या भाषेतील चिन्हे सुद्धा शिकावी लागतात. तसेच मराठीत ‘सा-रे-ग-म-प-ध-नि’ हे सप्तसूर असले तरी संगीत शिकताना मात्र संगीताच्या नोटेशन शिकाव्या लागतात. याचा परिणाम पुढीलप्रमाणे झालेला दिसून येतो.

1)         शाळाशाळांतून लहानपणापासून कविता शिकवल्या जातात. म्हणजेच लहानपणापासून गद्य व पद्य याच दोन गोष्टींची मराठीतून ओळख मुलांना होते. ‘संगीत’ या क्षेत्रातल्या मराठी परंपरेची साधी ओळखही करून दिली जात नाही.

2)         पालकांना, शिक्षकांना म्हणजेच समाजाला ‘संगीत’ शिकणे हे आयुष्यात पुढे केव्हा तरी आवड म्हणून जोपासायचा छंद ठरतो. म्हणजेच जणू काही ‘गद्य-पद्य’ या गोष्टी मराठीचे ‘‘‘सख्खे नातलग’’’ ठरतात. त्यामानाने संगीत मात्र ‘‘‘चुलत नातलग’’’ ठरतात. मराठीच्या पारंपारीक संगीताची ओळखच न झाल्याने आणि इंग्रजीचा सहवास आता महाराष्ट्रभर मुबलकपणे लाभत असल्याने, ‘युरोपीयन व अमेरीकन प्रकारचे म्युझीक’ म्हणजेच मराठीचे ‘संगीत’ ठरू लागले आहे. त्यामानाने शास्त्रीय-संगीत म्हणजे तर ‘‘‘चुलत नातलग’’’ सुद्धा नसून केवळ थोडीफार ओळख असलेले ‘शेजारचे-पाजारचे’ ठरू लागले आहेत!

3)         टिव्ही चॅनलच्या ‘सारेगम’ सारख्या प्रोग्रॅम्सने परदेशी संगीताबरोबरच, भारतीय संगीताची ओळख पुढील पिढीत आवडीने निर्माण होत आहे. अशा कार्यक्रमांतून कामधंदा, नोकरी, पैसा व मानसन्मान मिळु लागल्यामुळे भारतीय संगीताची जोपासना होण्यास मदत झाली आहे. पण यात भाग घेणार्‍या कलाकारांना संगीताचे शिक्षण शाळेतून मिळालेले नसून वैयक्तीक पातळीवर कुटूंबातून वा क्लास मधून वा संगीत शिक्षकांकडून प्राप्त करून घ्यावे लागल्याचे निदर्शनास येते.

संगीत शिक्षणाच्या क्लास मध्ये मुलांना ‘सा-रे-ग-म-प-ध-नि’ याच रितीने संगीताच्या सुरांची ओळख करून दिली जाते. यात व्यक्त केलेले सात सूर हे मराठीच्या अक्षरांचीच चिन्हे आहेत. यातील ‘सारे’ याचा अर्थ ‘सगळे’ असा होत नाही! यातील ‘सा’ आणि ‘रे’ हे सूर ठरतात. ‘अक्षर’ या संकल्पनेतील ‘सा’ हे भाषेतील अक्षर कधी? व ‘सा’ हे संगीतातल्या सुरासाठी वापरलेले नोटेशन कधी? हे पटकन ओळखता आले तर?

संगीताचा प्रसार होण्यासाठी जगभर विविध फॉण्ट मोफत प्रसारीत झालेले आहेत. पाच समांतर रेषांच्या ओळींतून संगीताच्या खास खुणा टाईप होण्याची संधी त्यातून मिळते. सिनेमा, नाटक, गाणे, जलसा, वगैरे ठिकाणी संगीतकारांतर्फे त्यांच्या वाद्यवृंदांना याच नोटेशन मधून सूरावट छापून दिली जाते. म्हणजेच तुम्ही कोणतेही वाद्य शिकायचे म्हटले तरी आधी तुम्हाला या संगीत-नोटेशन शिकणे गरजेचे ठरते. यातून काय घडते? ती सगळी नोटेशन सामान्यांना चिनी-जपानी-आफ्रिकन भाषांच्या चिन्हांएवढीच अगम्य भासतात. पण जर मराठीच्या पुस्तकातून धड्यासारखे याचे प्रसारन करता आले तर?

पुर्वी पहाटे जात्यावरच्या ओव्यांपासून ते सांयकाळच्या भजनांपर्यंत संगीताचे शिक्षण गावागावातल्या घराघरात मिळत असे. परंपरेचे हे देणे आता वास्तव्यात साकारले जात नाही व यापुढेही त्या परंपरागत रितीने पोचणार नाही. म्हणजेच आजच्या जीवन पद्धतीमुळे पुढच्या पिढीला तो संगीताचा वारसा देणारा संगीताचा ‘कान’ मिळतो का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागते. इंग्रजी-शिक्षण-पद्धतीशी सं-लग्न झाल्यामुळे मराठीने आपल्याला अशी ‘कानपिळी’ प्रदान केली आहे! संगीताचा घरोघरी आपसूकपणे मराठीतून मिळणारा ‘कान’ आपण गमावला आहे! संगीताचे शिक्षण हे मराठी शाळांच्या क्षेत्रफळाच्या बाहेरील घटना ठरली आहे. जर हे गावागावातल्या शाळेतून नव्या पिढीला शिकवणे सोपे झाले तर?

आहे त्या परिस्थितीलाच सामोरे जात त्यात जास्तीतजास्त परंपरा कशी जपता येईल की ज्यामुळे मराठी शिक्षणातच ‘गद्य-पद्य’ याप्रमाणेच संगीताचा प्राथमिक स्वरूपातून शिरकाव होईल, याचा विचार ‘शोध मराठीचा’ संशोधनाने केला आहे. आता संगणकाचे युग सुरू आहे. युनिकोडच्या फॉण्टमधून मराठीचा वावर झाल्याने युनिकोड मधून मराठीत टाईप केलेल्या ‘अक्षरा’लाच संगीत सप्तकातील सुरांपैकी ‘सा-रे-ग-म-प-ध-नि’ जोडता आले आणि ती अक्षरे नसून सुरांसाठीच्या नोटेशनची चिन्हे आहेत हे कळत गेले तर?

सुरांच्या आंदोलनांतून कंपनांची देवाण-घेवाण साधून ‘संगीतोपचार’ करण्याच्या अत्याधुनिक शास्त्राचे शिक्षण देणे यातून अधिक सुलभ होणार आहे. वैद्यकिय-शास्त्राची ‘संगीतोपचार’ अशी बॅच निर्माण करून मराठीतून त्याचा अभ्यास करणे शक्य होईल. आजपर्यंत ‘भाषेचे शिक्षण’ आणि ‘शिक्षणाची भाषा’ मराठी होण्यासाठी इंग्रजीने अनुसरलेली धोरणे मराठीत समाविष्ट करण्याकडे मराठीची सर्व ताकद जणू आपण पणास लावत आहोत. खास मराठमोळेपणातून जगाला देता येण्यासारखे फारसे निर्माण होत नाही. याला या ‘संगीत शिक्षणासाठीचे मराठी फॉण्ट’ यातून नवी दिशा मिळेल. खरच असा युनिकोडचा फॉण्ट मराठीत आला तर?

हे ‘जर-तर’ चे प्रवचन नसून, संगीतासाठीचा यासाठीचा पहिला फॉण्ट ‘‘‘Sangeet-U-Gangal201’’’ आजपासून मुक्त मुबलक मोफतपणे उपलब्ध करत आहे. ज्या व्यक्ती ‘जलद सोप्पी मराठी’ हे मराठी टायपिंगचे मोफत सॉफ्टवेअर वापरतात त्यांनाच केवळ या नव्या फॉण्टचा वापर करता येणार आहे. ज्यांना हा फॉण्ट हवा आहे त्यांनी कृपया तशी मागणी माझ्या ईमेलवर करा.

‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे स्पष्टीकरण देणारी चित्रे http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर बघा.

आपला, शुभानन गांगल  मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com


No comments:

Post a Comment