डोके थंड व शांत
ठेऊन, प्रामाणीकपणे विचार करून, वास्तवतेला दृष्टीसमोर ठेऊन, शास्त्रीयतेने चर्चा
करून, आपण मायमराठीच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार्या गोष्टींचा विचार केला असता, '''' मायमराठीच्या
अधोगतीला कारणीभूत ठरणारा रोग व वाळवी म्हणजे पुस्तकी व्याकरण व शुद्धलेखन
नियमावली'''' याच निकषापर्यंत आपण येऊन ठेपतो. या लेखात
मुद्देसुदपणे याची चर्चा केलेली आहे.
मराठी भाषा म्हणजे नक्की काय व कोणती? –
प्रत्येक भाषा तटस्थ असते तरच तिला भाषा
म्हणतात. प्रत्येक भाषेला व्याकरण असतेच. भाषेतील उच्चाराचा आणि चिन्हांचा संबंध
अर्थाशी कसा लावला जातो ते व्याकरणातून कळते. 'उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन, अर्थ'
या पाच गोष्टींच्या एकत्रीत समन्वयातून, एकजूटीतून, संलग्नतेतून मायमराठी शेकडो
वर्षे वावरली.
मराठीने गद्यासाठी 'मोडी-लिपी' आणि
पद्यासाठी 'बाळबोध-लिपी' वापरली. गद्य आणि पद्य यांसाठी दोन भिन्न लिपी वापरणारी
मराठी ही जगातील एकमेव भाषा आहे.
गद्य आणि पद्य हे दोन भिन्न अर्थ असणारे
दोन विभक्त शब्द का ठरतात? हे जगात केवळ मराठीने ओळखले व भाषा-जीवनातील आचरणात
उत्तमपणे स्विकारले होते.
मायमराठीचे उपजत आणि मूलभूत अस्तित्व, गद्यासाठी
'मोडी-लिपी' आणि पद्यासाठी 'बाळबोध-लिपी' यांच्या वापरातून सामोरे येते. याचा अर्थ
आता मराठीने गद्यासाठी 'मोडी-लिपी' आणि पद्यासाठी 'बाळबोध-लिपी' वापरावी असा होत
नाही.
गद्यासाठी वापरल्या जाणार्या 'मोडी-लिपी'त
केवळ एक-वेलांटी व एक-उकार होता. पद्यासाठी वापरल्या जाणार्या 'बाळबोध-लिपी'त दोन-वेलांट्या
व दोन-उकार होते. अशा रितीने मराठी-भाषा 'पुस्तकी-व्याकरणा'शिवाय व 'शुद्धलेखन
नियमावली'शिवाय शेकडो वर्षे वावरली.
गद्यासाठीची 'मोडी-लिपी' आणि पद्यासाठीची
'बाळबोध-लिपी' या केवळ, निव्वळ व फक्त मायमराठीच्याच लिप्या होत्या. गद्यासाठी
'मोडी-लिपी' आणि पद्यासाठी 'बाळबोध-लिपी' वापरण्याच्या खोल व सुक्ष्म विचारातून,
मराठीची तटस्थ, स्वावलंबी, स्वतंत्र आणि शास्त्रीय जडणघडण सहज कळून येते. ही आहे
खरीखूरी, उपजत आणि मूलभूत मायमराठी.
मराठी भाषेसाठी देवनागरी चिन्हांचा स्विकार
करताना मराठी-व्याकरणकारांनी काय लक्षात घेतले नाही? –
मराठीला बदलण्याचा अधिकार मराठीने
कोणालाही दिलेला नाही. व्याकरण म्हणजे भाषेत काय, कसे, किती, कुठे आहे ते ओळखून
भाषेला त्याप्रमाणे वावरण्याची संधी देणे होय.
इंग्रजांच्या काळात प्रिंटींग टेक्नॉलॉजी
आली. मोडी-लिपीतील एकाला-एक जोडली जाणारी धावरी चिन्हे, प्रिंटीग टेक्नॉलॉजीला
सुयोग्य ठरत नव्हती. देवनागरी चिन्हांतूनही मराठी-भाषा छापून प्रकाशीत करता येते
असे कळून आले. त्यामुळे मराठी-भाषेची पुस्तके देवनागरीतून छपाई होऊन समाजाला
पुरवली गेली. हस्तलिखीतातून पोथ्या निर्माण करण्याचे युग संपून छापील-पुस्तकी-युग
सुरू झाले. याच्या आनंदात देवनागरी चिन्हांचा वापर मराठीतल्या गद्यासाठी आणि पद्यासाठी
कसा करावा यावर बारकाईने कोणी विचारच केला नाही.
अनेक मराठी पुस्तकांचे प्रकाशन झाले.
त्याकाळी भाषेची ज्ञान-साधना प्रामुख्याने ज्या प्रतिष्ठीत व्यक्तिंच्या हाती होती
त्यांना संस्कृत-भाषा चांगली परिचयाची होती. देवनागरी आणि संस्कृत यांचे समिकरण
जगन्मान्य होते. या तज्ञ व्यक्तिंच्या परिचयातील संस्कृत-प्रचूर देवनागरी त्यांनी
मराठीसाठी वापरली आणि तेव्हापासून मराठीच्या र्हास व अधोगतीची सुरवात झाली.
खेर मंत्रीमंडळाने 1951-52 साली
'मोडी-लिपी' मोडीत काढून 'देवनागरी' चिन्हांचा स्विकार करून मराठीच्या र्हास व
अधोगतीवर सरकारी शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून आजपर्यंत माननीय, तज्ञ, जाणकार,
समंजस, विचारवंत, महनीय मराठी व्यक्तिंनाही मराठीच्या र्हासाची व अधोगतीची खरी
कारणे लक्षातच आली नाही.
शेकडो वर्षे मायमराठीने वापरलेली गद्यासाठीची
'मोडी-लिपी' आणि पद्यासाठीची 'बाळबोध-लिपी' ही मराठीची खरी संस्कृती ठरते. 1951
सालापासून स्विकारलेल्या, देवनागरीच्या अयोग्य वापरातून निर्माण झालेल्या,
'चुकीच्या पुस्तकी व्याकरणाची' आणि 'अनावश्यक शुद्धलेखन नियमावलीची' लादली गेलेली
साठ वर्षांची वाटचाल, म्हणजे मराठीच्या आयुष्यात आलेला 'संस्कृतच्या आक्रमणाचा
कालखंड' ठरतो. यापुढे मराठीने देवनागरी चिन्हातूनच प्रवास करावा पण तो मराठीच्या
मोडी आणि बाळबोध लिपीच्या संस्कृतीनुसार, देवनागरीतील चिन्हांचा गद्यासाठी
एक-वेलांटी एक-उकार आणि पद्यासाठी दोन्ही-वेलांट्या दोन्ही-उकार स्विकारून, असावा.
'शिक्षणाची भाषा' आणि 'भाषेचे शिक्षण'
यातून मराठी परावृत्त का होत आहे? इंग्रजीचा नको तितका अनावश्यक व अवाजवी प्रसार
समाजात का होत आहे? भाषा म्हणून उच्च दर्जा असणारी मराठी-भाषा समाज का धुडकावून
देत आहे? सहजसुलभ व सोप्पी असणारी मराठी-भाषा आता समाजाला क्लिष्ट व कठीण का वाटत
आहे?
घोडा का अडला? भाकरी का करपली? विड्याची
पाने का सडली? याचे जसे 'न फिरविल्याने' असे एकच उत्तर असते तसे मराठीच्या र्हासाचे
व अधोगतीचे एकच कारण आहे.
'मोडी' आणि 'बाळबोध' यांच्या त्याग करून देवनागरी
चिन्हे मराठीसाठी स्विकारताना केवळ एकच नियम केला असता तर ही स्थिती निर्माण झाली
नसती.
''''मराठी गद्यासाठी देवनागरीतील केवळ
एक-वेलांटी (र्हस्व-वेलांटी) व एक-उकार (र्हस्व-उकार) वापरावा आणि मराठी पद्यासाठी
देवनागरीतील दोन्ही वेलांट्या (र्हस्व व दीर्घ वेलांट्या) आणि दोन्ही उकार (र्हस्व
व दीर्घ उकार) वापरावेत.''''
देवनागरीतून मराठी भाषेतील गद्यासाठी
एक-वेलांटी व एक-उकार स्विकारले तर काय काय घडले असते?
1) गद्यासाठी मोडी व पद्यासाठी बाळबोध वापरणार्या
मराठीचे उपजत व मूलभूत अस्तित्वाला बाधा आली नसती.
2) मराठीचे तटस्थ, स्वावलंबी, शास्त्रीयता आणि
स्वतंत्रता जपली गेली असती.
3) मराठी व्याकरणातून मराठीची मराठीतच 'तत्सम' आणि
'तत्भव' अशी फाळणी करण्याची गरजच उरली नसती.
4) वेलांटी व उकार यांच्या व्यवस्थेलाच स्थुलमानाने
म्हटले गेलेल्या 'शुद्धलेखन नियमावली'ची गरजच मराठीला पडली नसती.
5) 'सुखी माणसाचा सदरा' आणि 'शुद्धलेखन नियमावली नुसार
मराठी लेखन करणारी व्यक्ती' शोधूनही सापडत नाही, अशी परीस्थीती निर्माण झाली नसती.
6) मराठीतून लेखन केले तर 'शुद्धलेखन नियमावली' पाळता
येणार नाही आणि अशुद्ध लेखन केल्याची नामुश्की पदरात पडेल यामुळे कोणीही मंत्री,
मान्यवर, संस्थाप्रमुख, पुढारी, स्वतः मराठीतून लिहीत नाहीत. त्यांना मुक्तपणे
मराठीतून लिहीता आले असते.
7) इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक अशा ज्या असंख्य
व्यक्तींनी मराठीतून लेखन करण्याचे टाळले त्यांना मराठी लेखनातून नवे ज्ञान समाजापर्यंत
पोचविण्याची इर्षा निर्माण झाली असती.
8) 'शुद्धलेखन जाणकार' नावाचा नवा गट वर्तमानपत्र,
पुस्तके, मासिके, पत्रिका, प्रकाशन, . . . अशा सर्व ठिकाणी निर्माण करण्याची गरज
उरली नसती. संपादकांना अग्रलेख, पत्रकारांना बातम्या, लेखकांना लेख व कादंबर्या,
प्रकाशकांना पुस्तके व साहित्य, आई-वडीलांना स्वतःच्या मुला-मुलींच्या लग्नाच्या
आमंत्रण पत्रिका, . . . 'शुद्धलेखन जाणकार' व्यक्तींचा आधार न घेता स्वतःच स्वताला
लिहीत्या आल्या असत्या. म्हणजेच मराठी समाजाचे लिहीते हात तोडले गेले नसते.
9) शाळेतले निबंध म्हणजे मुल-मुलींना त्यांच्या मनातील
भावना-विचार मांडण्याचे पहिले-वहीले स्वातंत्र्य. स्वतः लेखक बनण्याच्या स्वप्नांचे
मनोरे यातून उभारले जातात. येथे त्यांचे मार्क 'शुद्धलेखन ठिक नाही' म्हणून कापले
जातात. येथून सुरवात होते 'मराठी क्लिष्ट व कठीण' आहे या मानसिकतेची. मराठीपासून
परावृत्त होण्याच्या सवयीची. शिक्षकांना 'निबंधात मार्क का कापले?' याबाबत
पालकांनी विचारले तर, '''निबंधातील विचार व भावना उत्तम आहेत पण शुद्धलेखनातील
चुकांमुळे मार्क कापावे लागले आहेत. आम्हाला सरकारच्या तशा सुचना आहेत''' असे
उत्तर मिळते. जर निबंधात शुद्धलेखनात चुका असल्या तरीही त्या निबंधातील विचार व
भावना शिक्षकांनाही कळतात तर ''''शुद्धलेखनाचा कोणताही संबंध लेखनातील विचार व
भावनांशी नसतो हेच तर सिद्ध होते. निबंधातून म्हणजेच भाषेच्या संवादातून केवळ
आपल्याला विचार व भावनाच तर पोचवायच्या असतात. म्हणजेच शुद्धलेखन नियमावली
अनावश्यक, निरूपयोगी, व विनाकारण निर्माण केलेली ठरते.
10) गद्यात मराठीने एक-वेलांटी एक-उकार वापरले तर यातून
मराठीचे लेखनासाठीचे प्रमाणीकरण समाजाला झेपेल, रुचेल, कळेल, उमगेल अशा रितीने
परीपूर्ण होते. मराठी भाषेचा शेकडो वर्षांच्या पारंपरेचा वारसा सहजतेने हसतखेळत
खेळीमेळीने मराठमोळ्या पद्धतीतून जपता येईल. यातून मराठी भाषा सहजसुलभ साधीसोप्पी
आहे याची खात्री समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात जोपासली गेली असती.
11) 'दिन-दीन, सुर-सूर, सुत-सूत' अशा वेलांटी व उकार
यातून भीन्न अर्थ साकारणार्या शब्दांचे काय करायचे? हा प्रश्न व्याकरणकार पुढे
आणतात. याचे उत्तर आहे, ''''मराठी भाषा वाक्यातून शब्द वापरताना सुयोग्य अर्थच
आपोआप प्रस्थापीत होतो'''. 'त्याने दीन-दुबळ्याला मदत केली' वा ''त्याने दिन-दुबळ्याला
मदत केली' या दोन्ही वाक्यातून निश्चित अर्थ मराठीत कळतो. 'गांधीजी सुत कताई करीत'
वा 'गांधी सूत कताई करीत' या दोन्ही वाक्यातून निश्चित अर्थ मराठीत कळतो. संस्कृत
भाषेतील असंख्य, अगणीत, जागोजागी, येणार्या शब्दांचे अर्थ वेलांटी व उकार यांमुळे
बदलतात, ते सारे शब्द योग्य वेलांट्या व योग्य उकार यातून लिहीण्याशिवाय संस्कृतला
गत्यंतर नसते. मराठीत तसे नाही.
मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरताच
विचार करणे आपण शिकले पाहीजे आणि तसेच धोरण व्याकरणातून अवलंबून 'शुद्धलेखन
नियमावली' नेस्तनाबूत केली पाहीजे. हे आपण सर्वांनी मिळून केले तरच मराठीला उज्वल
भवितव्य प्राप्त होणार आहे. यासाठीचा आधी लोकाश्रय मिळाला की मग राजाश्रय सहज
मिळेल. जागतीक मराठी दिनापासून मराठीसाठीची ही 'उपजत मुलभूत शास्त्रीय भाषा
क्रांती'ची सुरवात आपण करूया. संस्कृतच्या जोखडातून मराठीला ज्ञानेश्वरांनी मुक्त
केले आणि इंग्रजांच्या काळात व्याकरणकारांनी मायमराठीला पुन्हा संस्कृतच्या
गोठ्यात बंदीस्त केले. चला मराठीला 'चुकीच्या पुस्तकी व्याकरणा'तून आणि 'शुद्धलेखन
नियमावली'तून कायमची मुक्तता देऊया.
जागतिक मराठी दिनापासून मराठीने घराघरातल्या
संगणकात मुक्तपणे वावरावे, असे तुम्हाला वाटते का? प्रत्येक मराठी भाषकाला याबाबत स्वतःचे मत
नोंदवण्याचा अधिकार आहे. आपला
विचार जरूर कळवा.
‘युनिकोड ते
साऊंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया
‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
No comments:
Post a Comment