बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Tuesday, 11 March 2014

युनीकोड ते साउंडकोड – लेख 31 – मृत्युशय्येवरच्या मायमराठीची हाकाटी (लेख - एक-वेलांटी एक-उकारातून)



युनीकोड ते साउंडकोड लेख 31 – मृत्युशय्येवरच्या मायमराठीची हाकाटी
(लेखातून केवळ एक-वेलांटी एक-उकार वापरलेला आहे.)

'संस्कृत ही देवभाषा आहे', असे ज्यांना वाटते त्यांनी देव बनुन ती भाषा वापरावी! मानव असुनही त्यांना जर तसेच वाटत असेल तर त्यांनी मराठीचा त्याग करुन संस्कृत मधुन बोलायला व लीहायला सुरवात करावी. भारतभरच्या कोणत्याही राज्यात, रस्त्यावर वा ऑफीसात संस्कृत बोलली व वापरली जात नाही. म्हणजेच 'संस्कृतला देव भाषा' मानणार्‍या व्यक्तींना संस्कृतच्या प्रसारासाठी बरेच काम करता येण्यासारखे आहे! मराठी भाषेतुन आयुष्य जगताना 'पैसा, नोकरी, घरदार, मुलेबाळे, आपुलकी, नातीगोती, कुटुंब, . . ' अशा जीवनावश्यक गरजांसाठी संस्कृत-भाषा कीती कामी आली? देवापुढे हात जोडून मागणे वा गार्‍हाणे जर मराठीतुन मागीतलेत तर देवाला ते कळणार नाही, असे वाटते का? जर तुमच्या देवालाही मराठी कळते तर मराठी ही सुद्धा देव-भाषाच ठरते ना?

भाषा म्हणून संस्कृतपेक्षा मराठी कीतीतरी पटीने क्षेष्ठ आहे. पण लहानपणापासून 'संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे' असे पढवले गेले. जगातील सर्वात जुनी आणी अनेक पीढ्यांनी स्वतःहुन केलेली ही जाहीरात ठरते! गीनीज-वर्ड-रेकॉर्ड मध्ये याची जरुर नोंद झाली पाहीजे!

वेद हे संस्कृतमधुन लीहीले गेले. त्या साडेतीन हजार वर्षापुर्वी भारताने असंख्य शोध लावले. संस्कृतची पाठराखण करण्याच्याच एकमेव उद्देशाने हजारो वर्षे प्रसारीत केलेली आणखी एक संस्कृत-प्रचुर जाहीरात ऐका, 'सर्व ज्ञान वेदात आहे'. संस्कृत-भाषा आहे कशी?, याचे सामान्य ज्ञानही नसताना, अशा जाहीरातींमुळे, 'संस्कृतला नावे ठेवलीत तर पाप लागेल, देव तुम्हाला नरकात पाठवेल' असाच प्रकारची मानसीकता समाजात नीर्माण झाली.

संस्कृतबाबतच्या अशा दहशती व भीतीपोटी काय घडले? मराठी वीचारवंत, मान्यवर, प्रतीष्ठीतांपासुन सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वजण, पुजापाठ करताना भटजींनी म्हटलेल्या संस्कृत मंत्रातील 'शुन्यसुद्धा कळत नसताना' गुपचुप हात जोडुन, डोळे मीटुन, अंधश्रद्धेने वागत होते आणी अजुनही वागत आहेत. आधुनीक काळातील सर्व इंग्रजीपणातील सुधारणा महाराष्ट्रातील घराघरातील व्यक्तींच्या आचरणात आणल्या जातात पण जेव्हा पाप, श्रद्धा, पुण्य सामोरे येते तेव्हा मात्र संस्कृतची आठवण येते. चर्चने जगभर त्या त्या भाषेतुन आपल्या प्रार्थना सांगीतल्या व प्रसार केला. आता केवळ 'भटजींना संस्कृत मंत्राचा अर्थ सांगा', एवढेच सांगीतले जाते. जर हे मंत्रांचे सुत्र मराठीतुनच म्हटले वा सांगीतले गेले तर ती पुजा ठरणार नाही, त्यातुन पवीत्रता नीर्माण होणार नाही, त्यातुन शांतता, स्थैर्य, सुखशांती लाभणार नाही, त्यातुन देव पावणार नाही, असेच समाजाला अजुनही वाटते! समाजाच्या मनामनात दडलेला हा मराठी-भाषेबाबतचा एकप्रकारे अवीश्वास, परकेपणा व तीरस्कार ठरतो.

भाषा म्हणजे संवादाचे साधन. यापेक्षा भाषेलाच जर मोठेपण दिले तर मानवाची बुद्धी व वीचार-शक्तीच गहाण टाकल्यासारखे होते. भारतात संस्कृत-भाषेबाबतच्या वरील अनेक दहशतवादी घोषणांमुळे समाजाने आपली बुद्धी आणी वीचारक्षमताच गेली कीत्येक हजार वर्षे गहाण टाकल्याचे दीसते. संस्कृतसोडुन इतर कोणतीही भारतीय भाषा वापरुन अध्ययन करणे भारताने सोडुन दीले होते.

'अध्ययन' या शब्दाचा अर्थ, '''''वेद-उपनीषदे-पुराण शीकणे, पुजाअर्चा यातुन वापरले जाणारे मंत्र-ऋचा-श्लोक तोंडपाठ करणे, छत्तीस हजार देवांच्या वैयक्तीक गोष्टींबाबत जास्तीतजास्त माहीती मीळवणे (त्यांची वाहने कोणती?, पत्नी-मुले-नातलग कोणते?, त्यांना आवडणारे पदार्थ कोणते?, त्यांच्या पुजेसाठीचा योग्य काळ कोणता?, . . . वगैरे वगैरे असंख्य अगणीत!), रामायण-महाभारत तसेच भगवत-गीता यांचे दररोज पठण करणे, सकाळी अंगणात रांगोळी काढण्यापासुन ते सायंकाळच्या भजनांपर्यंतच्या अनेक गोष्टींची पारायणे करणे, रामरक्षा-मारुतीस्त्रोत्र-शनीमहात्म्य अशा काव्यांचे आवर्तन करणे, काय काय आणी कीती कीती'''', एवढ्यापुरताच मर्यादीत राहीला.

त्यातुन भारतात काय घडले? गेल्या हजारो वर्षांतील मानवी शोध भारतात लागले नाहीत. ते लागले युरोपात व अमेरीकेत! भारतात केवळ संस्कृत भाषेतुन ज्ञान प्राप्त होते, असे वाटल्याने हे घडले असावे का? नाहीतर भारतीय बुद्धी गेली हजारो वर्षे 'कोणती केळी खात होती?'! इंग्रजी भाषा भारतात आली आणी भारतातील प्रादेशीक भाषेतुन संशोधन केल्यास संस्कृत-भाषेचा राक्षस खायला येईल, त्यापेक्षा युरोपीयन भाषा वापरुन आपण आपली बुद्धी वापरु, त्यातुन भारतीय देवांचे अरीष्ट टळेल, असेच जणु बुद्धीवादी व्यक्तींना कळत नकळत वाटले असावे!

आजही मराठीतुन कोणत्याही संशोधनाच्या वाटचाली होत नाहीत कारण आत्ताच्या मराठी-भाषेतही पुन्हा संस्कृतची ढवळढवळ आहेच. मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करुन मराठी-भाषेचेच व्याकरण लीहीण्याची मुभा मराठीला मीळालीच नाही. संस्कृतचे व्याकरण मराठीत जास्तीतजास्त घुसडण्यासाठी मराठीची मराठीतच 'तत्सम' व 'तत्भव' अशी फाळणी केली गेली! मराठीच्या अंतरंगाची अशी चीरफाड सर्व मराठीप्रेमी खुशाल बघत राहीले! कुठे गेला ज्ञानेश्वरांनी संस्कृतपासुन मराठीला अलीप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न? कुठे गेली राज्यकारभारात मनसोक्तपणे मराठी वापरलेली शीवाजी महाराज आणी पेशवे यांची मोडी-लीपी? जर खरोखरच ज्ञानेश्वरांचा, शिवाजीचा, पेशव्यांचा आदर असेल तर त्यांच्या वेळच्या मराठीला जसेच्यातसे जगवण्यासाठी तुम्ही काय केलेत? काहीही नाही.

आता मराठीने देवनागरीतुन प्रवास केला तरी गद्यातुन मोडी प्रमाणे एक-वेलांटी एक-उकार गद्यातुन वापरले गेले की झाले. मराठीला या साध्यासोप्या सहजसुलभ उपायातुन काय घडेल? आत्ताचे चुकीचे पुस्तकी व्याकरण आणी शुद्धलेखन नीयमावली नेस्तनाबुत होतील. मराठी पुन्हा स्वतंत्र, स्वावलंबी, स्वयंपुर्ण होईल. होय, हे खरोखरच सहज शक्य आहे. यातुन काय घडेल? मोडी-लीपीच्या वेळच्या मराठीला जसे शुद्धलेखनाच्या नियमांची आवश्यकता भासली नाही तशी यापुढेही ती मराठीला भासणार नाही. कारण शुद्धलेखन नीयमावली खास करून बनलीच केवळ दोन-वेलांट्या आणी दोन-उकार यात लेखनातुन प्रमाणता आणण्यासाठी! मराठीच्या उपजत मुलभुतपणाला लागलेला हा रोगच नष्ट झाला की त्यावरची ही फसवी उपाययोजना आपोआपच नष्ट होते. समाजाचा याबाबतचा खात्रीशीर होकार आला की त्यातुन लोकाश्रय मीळेल आणी राजाश्रय सहजतेने प्राप्त होईल. सरकारलाही संस्कृतप्रचुर व्यक्ती काय म्हणतील? समाजाला हे पटेल का? नीवडणुकीतील आपली मते या कारणाने कमी तर होणार नाहीत ना? त्यापेक्षा प्रस्थापीत व्यवस्थेलाच थोडी मदत होईल असे घडवता आले तर? याच विचारातुन मराठीचा संगणकासाठीचा 'स्पेल चेकर' आणला गेला.

मुक्तपणे हसत खेळत वावरणार्‍या मराठीच्या लीहीत्या हातांना पडल्या आहेत, शुद्धलेखन जाणकारांच्या बेड्या. अहो, मुलांना नीबंध, लेखकांना कथा-कादंबर्‍या, पत्रकारांना लेख, संशोधकांना प्रबंध तर सोडाच पण तुमच्या मुलांच्या लग्नाची पत्रीकाही तुमची तुम्हाला मराठीतुन शुद्धपणे लीहीता येत नाही! अहो बघता काय, बादलीभर पाण्यात मराठीचे वीसर्जन तरी करा! संस्कृत-भाषा येत नाही आणी मराठी वापरता येत नाही. मग 'संस्कृतचे शीव्याशाप न लागता', 'मराठीतील न पाळता येणारे व्याकरण व शुद्धलेखन-नीयमावलीचा अडथळा न येता' आमचे जीवन जगायचे तरी कसे? याच विचारातुन घराघरातुन आता इंग्रजीचा पुरस्कार होत आहे.

'मराठी वाचवा', 'मराठी असे आमुची मायबोली', 'मराठी शाळा बंद करु नका', अशा घोषणा म्हणजे भरल्यापोटी घेतलेले उखाणे ठरतात. या घोषणा ''भाषणातल्या टाळ्या, नीवडणुकीतील मते, वीद्वत्तेचा दीखावा, साहीत्यसम्मेलनातील गदारोळ, चर्चासत्रातील चहा-बीस्कीटांपुर्वीचा सुखकर काळ'', एवढ्यापुरत्याच मर्यादीत राहतात.

संस्कृतच्या पदरात गहाण टाकलेल्या मराठीला चुकीच्या पुस्तकी-व्याकरणाच्या आणी शुद्धलेखन नीयमावलीच्या जाचातुन सोडवीण्याचा मार्ग म्हणुन, संगणकाच्या कुबड्या घेत, 'मराठी स्पेलचेकर' आणण्याचा उपद्व्यापही घडवला जात आहे. पुस्तकी-व्याकरण आणी शुद्धलेखन नीयमावली नेस्तनाबुत करुन, मुलभुत उपजत मराठीचे स्वैर उधळु शकणारे पाय, तीचे तीला परत देता येत असताना, त्यावर संस्कृत-प्रचुर भाटांना काय वाटेल? या धास्तीने मराठीला जमेल तेवढे आणखी काही दीवस 'कोमा'त जगत ठेवत, ऋग्णालयात दाखल करुन, संगणकातुन 'मराठी स्पेलचेकर'चे सलाइन देणे आता सुरु होत आहे. अशाप्रकारे मराठीला संगणकीय इलेक्टॉनीक वैद्यकीय सेवा देऊन आपण तीला कायमचे रोगी बनवत आहोत, हे जाणकारांनी लक्षात घ्यावे.

आजची मायमराठी काय म्हणत आहे?

थकलेल्या पायांच्या मी झीजलेल्या वहाणा ।।

औषधाला सुद्धा नाही कुणी सत्यवादी,
आपापल्या स्वार्थासाठी गौतम आणी गांधी,
सत्तेचा लोभ करी मैत्रीचा बहाणा . . . . .

सदाचारी, शीलवान, शब्द ठरतात खोटे,
संपत्तीच्या घरी मारी समानता खेटे,
इथे चाले राजकारण तोडा-मारा-हाणा . . . . .

पुढार्‍यांची मने जुळती सहभोजनाने,
मरु टेकल्या मराठीचे दुःख कोण जाणे?
भरल्या पोटांच्या ओठी त्यागाचा उखाणा . . . . .

मराठीचा मराठीसाठी मराठीपुरताच मराठीपणातुन वीचार करणारी कोणी व्यक्ती शील्लक आहे का?

असल्यास कृपया संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
मोबाइल – 9833102727  इमेल – Shubhanan.gangal@gmail.com

No comments:

Post a Comment